नाद अनाहताचा
पुस्तक परीक्षण: नाद अनाहताचा
पुस्तकाचे लेखक: वैभव भालडे
पुस्तकाचा प्रकार: अध्यात्मिक लेखांचा संग्रह
प्रकाशक: अनाहत प्रकाशन, पुणे
पुस्तक परीक्षक: निमिष सोनार, पुणे
या भागात अध्यात्माची जोड असलेले तात्विक आणि वैचारिक लेख आहेत. लेखातील विचार पटवून देण्यासाठी लेखक सोबत छोट्या छोट्या गोष्टी किंवा प्रसंग सांगतो ज्यामुळे ते तत्वज्ञान समजण्यास मदत होते. एकूणच या सर्व लेखांचा सारांश मला भगवदगीतेच्या तत्वज्ञानाशी मिळताजुळता वाटतो आणि सर्व लेख हे भगवंतांवर विश्वास न ठेवणाऱ्यांना योग्य मार्गावर आणण्याचे काम नक्की करतील. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील बासरी हे भगवदगीता सांगणाऱ्या भगवंत श्रीकृष्णाचेच तर प्रतीक आहे!!
"स्वीकार" हा पहिलाच लेख आपल्याला न बदलता येणारी परिस्थिती कशी स्वीकारायची ते सांगतो तर "आत्मविश्वास आणि विश्वास" हे लेख आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवतांना शंका आणि बुद्धीचा अतिवापर या गोष्टी कशा मारक ठरतात हे सांगतात. "प्रार्थना" या लेखात लेखक जे तत्वज्ञान मांडतो ते खरोखर उत्तम आहे.
सहेतुक स्तोत्र मंत्र उपासना ही खरी उपासना नाही हे "उपासना" या लेखात आपल्याला कळतं हेच भगवंत श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला गीतेत सांगतात. ते म्हणतात, एखादे तुळशीचे पान मनःपूर्वक श्रद्धेने मला अर्पण कर, मला ते पोहोचते. मात्र काहीतरी व्यावहारिक फळांच्या हेतूने केलेली देवांची उपासना कर्मफल बंधनात अडकवते, त्यायोगे मुक्ती शक्य नाही उलट जन्म मृत्यूची साखळी मात्र वाढत जाते...
आपण नेहमी ऐकत असतो ते "साधना, आराधना" या शब्दांचे नेमके अर्थ आपल्याला त्याच नावांच्या लेखात समजतात. आराधना लेखात तीन समर्पक गोष्टी किंवा उदाहरणे आहेत.
त्यानंतरच्या अनेक लेखांत प्रसन्न मनामुळे काय साधतं आणि "मन प्रसन्न कसे करायचे", सुख आणि समाधान यांच्यातील फरक आणि संबंध कळतो. त्यातील मला एक वाक्य फार आवडलं: "अकारण शंका घेणं, अति चिकित्सा करणं या गोष्टी समाधानाला मारक ठरतात!"
"संयम, स्थितप्रज्ञता आणि कर्मफल" हे तीन लेख भागवद्गीतेतील या तीनही संज्ञा सोप्या करून सांगतात.
"ओढ" मधील मॅग्नेट उपमा आवडली आणि "अनुराग" मधील हे वाक्य आवडले: "मनात ईश्वरप्रेमशिवाय कोणत्याही भावनेला जागा नसावी!!"
"मोगरा फुलला" मध्ये "दान नेमके कशाचे करावे?" हे फार सुंदर रितीने समजावले आहे आणि या लेखाचाच विस्तार म्हणता येईल असा "अपरिग्रह" हा लेख त्यानंतर येतो. दोन्ही लेख अतिशय अप्रतिम!!
अध्यात्मिक उन्नतीसाठी लागणारे आवश्यक घटक आपल्याला सत्संग, सातत्य, आत्मबोध, आत्मनिर्भरता, नामस्मरण, गुरुदेव, गुरुदक्षिणा, कृपा, कृतज्ञता या लेखांत दिसतात...."उत्तरपूजा" हा लेख भागवद्गीतेतील आत्मा अविनाशी आहे या चिरंतन सत्याला अधोरेखित करतो!!
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला परमेश्वर आणि सनातन आत्म्याच्या सत्याची जाणीव करून देणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे!!
ज्यांनी भगवद्गीता वाचली आहे त्यांना तर हे पुस्तक म्हणजे दुधात साखर आहे आणि ज्यांनी नाही वाचली ते नक्कीच या पुस्तकानंतर भगवद्गीतेकडे वळतील...
हे पुस्तक परीक्षण अर्थातच मी भगवंत श्रीकृष्णाला अर्पण करतो!!
|| ईश्वरेच्छा बलियसी | तुझे रूप चित्ती राहो ||
- निमिष सोनार, पुणे

Comments
Post a Comment