सेमी प्रायव्हेट रूम


अमित जी, तुमची "सेमी प्रायव्हेट रूम" ही कादंबरी वाचली. तुमच्याशी फेसबुकवर मैत्री झाली आणि त्यानंतर मी वाचलेली तुमची ही पहिलीच कादंबरी. तुमची सही असलेली ही आवृत्ती एक वाचक म्हणून आणि एक लेखक म्हणून वाचतांना मला जे वाटले ते मी प्रामाणिकपणे लिहितो आहे.

कादंबरीची मध्यवर्ती संकल्पना खूपच छान आहे. 

ही कादंबरी म्हणजे "सेमी प्रायव्हेट रूम" मध्ये ऍडमिट असलेले दोन पेशंट ज्यांच्या वयात आणि त्यांना झालेल्या रोगात जमीन अस्मानचे अंतर आहे आणि त्यांच्याशी संबंधित इतर नातेवाईक आणि हॉस्पिटल स्टाफ यांची पूर्वायुष्ये तसेच पाच दिवसांत त्यांचा सर्वांचा एकमेकांशी आलेला संबंध आणि त्यामुळे बदलत जाणारी त्यांची आयुष्ये आणि निर्णयप्रक्रिया!

वाचतांना कलर्स वाहिनीवरच्या अनिल कपूरच्या 24 या फक्त चोवीस तासात घडणाऱ्या घटना दाखवणाऱ्या थ्रिलरच्या सिझन दोनची सारखी आठवण येत होती. ती मेडिकल आणि क्राईम थ्रिलर तर तुमची कादंबरी मेडिकल आणि "इमोशनल थ्रिलर". 

इमेशनल थ्रिलर म्हणजे माझ्या मते वाचकांच्या मनातील सगळ्या इमोशन्सला (जास्तकरून दुःखद) वाचतांना अगदी जिवंत करणारी ही कादंबरी. येथे ही कादंबरी 24 x 5 आहे, म्हणजे पाच दिवसांची कहाणी!

अर्थात ही कहाणी ना पूर्ण सुखद शेवट असणारी आहे ना पूर्ण दुःखद. यातील पात्रे सुद्धा संपूर्ण चांगली किंवा संपूर्ण वाईट म्हणता येणार नाहीत. म्हणजेच ग्रे शेड्स असलेली आहेत आणि म्हणूनच ही एक प्रॅक्टिकल कादंबरी म्हणता येईल, आयडियल नाही!

दुर्धर रोग असूनही सहन करणारा लहान मुलगा शांग आणि थोड्याशा त्रासाने हॉस्पिटल डोक्यावर घेणारे वृद्ध नाना, नानांचा कृष्ण आणि शांगचा क्रीश हे सगळे उत्तम रीतीने रंगवले आहे. 

मात्र लेखक म्हणून मला कांदबरी वाचतांना एकच वाटत राहिले की नाना आणि शांग यांच्यातील संवाद आणि त्यांच्यातील interaction (सिनेमाच्या भाषेत - एकत्रित स्क्रीन स्पेस) या गोष्टींना आणखी थोडी जास्त जागा हवी होती कादंबरीत! हीच भावना नाना आणि अण्णाबद्दल वाटते! असो!

गीतेतील दोन श्लोकांचा योग्य ठिकाणी आणि योग्य प्रसंगात वापर केलेला आहे. कादंबरी वाचतांना वाचकसुद्धा नक्की त्या पत्रांसोबत हॉस्पिटलमध्ये पाच दिवस (इमोशनली) ऍडमिट होतो हे या कादंबरीचे यश! हॉस्पिटलचे वातावरण अगदी हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहाते. हॉस्पिटलमध्ये असणारे डॉक्टर्स, स्टाफ, नर्सेस हे रुग्णांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतांना त्यांच्या स्वतःच्या तब्येतीची मात्र बरेचदा हेळसांड होते हे नकळतपणे तुम्ही दाखवून दिले आहे!

यात असलेल्या दोन पात्रांद्वारे अल्कोहोलचे दुष्परिणाम सुद्धा नकळतपणे ही कादंबरी आपल्याला सांगून जाते! शेवटी शेवटी अचानक आलेला एका स्त्री पात्रासोबतचा "तो" अनपेक्षित प्रसंग मला मर्डर मधील मल्लिका शेरावतच्या "त्या" प्रसंगाची किंवा "आस्था" नवीन निश्चल आणि रेखा यांच्यातील प्रसंगाची आठवण नक्की करून देतो. 

कादंबरीतील अनेक वाक्ये आवडली जसे -

"एकवेळ व्यसनी आणि कमी बुद्धीचा माणूस परवडतो पण व्यसनी, निरुद्योगी आणि डोक्याने बुद्धिमान हे कॉम्बिनेशन एकदम घातक!"

"अपयश आणि तऱ्हेवाईकपणा हर मिश्रण एकदम् घातक!"

"किती समज असते मुलांना! आपली नुसती वयं वाढतात, पण आपला अहंकार जात नाही!...फक्त वय वाढलं की आपल्याला जास्त समज आणि शहाणपण येते? की तसं नसतं?"

"रात्री बेडरूमच्या दाराचा पडदा वाऱ्याने हलला तरी बाहेर यम उभा आहे असं त्यांना वाटे!"

"लायकी नसणारे लोक जेव्हा तुमच्या निर्मितीची किंमत ठरवायला लागतात, तेव्हा सगळं अवघड होतं जातं!"

"हे असं यांच्यानंतर आणि त्याच्यानंतर म्हणत आयुष्यात ली मजा कधी उद्यावर ढकलायची नाही, लिव्ह इन प्रेझेन्ट!"

"स्वतःला दूषणं देत जगत राहणं ही आयुष्यातील सगळ्यात भयंकर शिक्षा आहे!"

"म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात...पण ती अवस्था काही येत नाही...त्या पोरासारखी स्वच्छ, निरागस नजर व्हायला पाहिजे असं वाटायला लागलं आहे!"

आणखी इतर अनेक आवडलेली वाक्ये आहेत ज्यावर मी पेन्सिलीने खुणा करून ठेवल्यात!

या कादंबरीवर मराठी चित्रपट नक्की निघणार यात वाद नाही. आपण प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे वडील आणि मुले यांच्या संबंधावर आधारित तुम्ही जी कादंबरी लिहिणार आहात ती लवकर लिहा. मी आतापासून त्याची वाट बघतो आहे!

धन्यवाद!


Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली