आजकाल न्यूज चैनेल्सला झालंय तरी काय?
टीव्ही वरच्या बातम्यांना काहीच अर्थ उरलेला नाही कारण अर्थपूर्ण बातम्या जणू गायबच झाल्या आहेत. ओढून ताणून शोधून फक्त नकारात्मक बातम्यांच दाखवल्या जातात आणि त्याही च्युईंगम सारख्या सतत चघळल्या जातात. खून मारामारी अपघात रक्त यांची दृश्ये दाखवण्यासाठी तर न्यूज चैनेल्स मध्ये स्पर्धाच लागलेली असते. पत्रकारितेच्या लिखित आणि अलिखित आचारसंहिता तर कुणीच पाळतांना दिसत नाही.
बातमी बद्दल विश्लेषण तर कुठेच दिसत नाही. जर एखादा माहितीपूर्ण कार्यक्रम असलाच तर अर्ध्या तासात एकच वाक्य परत परत सांगतात आणि मागचा व्हिडिओ एखाद्या चित्रपटातला दाखवतात. अरे, न्यूज सांगत आहात की चित्रपटाची कथा?
तसेच एखादी बातमी बघतांना नीट कळत सुद्धा नाही की चौकोनात दाखवला जाणारा व्हिडिओ हा कोणत्या तारखेचा, कोणत्या वेळेचा आहे? त्यावर तारीख सुद्धा टाकत नाहीत. असे वाटते हे आजच घडत आहे. खरे तर त्यावर "फाईल" असे लिहायचा प्रघात आहे. तारीख नका दाखवू पण "फाईल" तरी लिहा कमीत कमी!
न्यूज चैनेल वरच्या चर्चा (debate) पाहिल्या तर सात आठ लोक एकाच वेळेस बोलतात. कुणीच कुणाचे ऐकत नाही. कुणीच कुणाला बोलूही देत नाहीत. चर्चेचा निष्कर्ष शून्य निघतो.
जर थोडक्यात सगळ्या बातम्या बघायच्या म्हटल्या तर स्पीड न्यूज च्या नावाखाली सगळे चैनेल्स कर्कश्य बैगराउंड म्युझिक लावून न्यूज रीडर च्या मागे कुत्रा लागल्यासारख्या एका पाठोपाठ एक बातम्या वाचतात. कसली एवढी घाई असते यांना ते समजत नाही. एकही बातमी नीट लक्षात राहात नाही आणि नीट ऐकूही येत नाही. काय फायदा त्या स्पीड न्यूज चा?
बीस मिनिट में सौ खबरें? एकाच बातमी मधले दहा वाक्ये वाचून दाखवता आणि म्हणता त्या झाल्या दहा बातम्या? बावळटपणा कळस नुसता!
त्यापेक्षा आपल्या ऑल इंडिया रेडिओ वरच्या पंधरा मिनिटांच्या न्यूज बुलेटिन मधून तरी जास्त बातम्या कळतात.
असे वाटायला लागते की आपली वर्तमानपत्रे आणि आपला बिचारा रेडिओ तरी शंभर पटींनी बरा!
(टीव्ही चैनेल्सवर अस्सल बातम्यांच्या शोधार्थ आपल्यासारखाच भटकणारा)
- निमिष सोनार, पुणे 😀
sonar.nimish@gmail.com

Comments
Post a Comment