पुणेकर वाहनचालकांची शपथ


1. छोट्या गल्ली बोळातून वळतांना मी खूप वेगाने वळेन, तसेच हॉर्न मुळीच वाजवणार नाही. समोरून येणाऱ्या लोकांची आणि वाहनांची मी मुळी म्हणजे मुळीच पर्वा करणार नाही.

2. खांदा आणि मानेत मोबाईल अडकवून तिरप्या मानेने बोलत बोलत बाईक भर गर्दीत भर रस्त्यात मी वेगाने चालविण्यास कटिबध्द आहे.

3. ट्राफिक रांग तोडून पुढे जाण्यासाठी मी फुटपाथवर चालणाऱ्या पादचाऱ्यांना ढकलून त्यांना जमिनीवर पाडून अपंग करून फुटपाथवर बाईक वेगाने हॉर्न न वाजवता चालवेन आणि मला असे करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.

4. झेब्रा क्रॉसिंग वरून रस्ता पार करणारे पादचारी हे माझेसाठी शत्रूसमान असून त्यांना रस्ता कधीही पार न करू देण्यासाठी मी माझे जीवन समर्पित करीन.

5. ट्राफिक नियम पाळणारा वाहनचालक म्हणजे वाहतुकीसाठी एक कलंक असून त्यांना धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही. त्याने ट्राफिक नियम तोडावा यासाठी मी सिग्नल लाल असतांना सुद्धा त्याचा कानाचा पडदा फाटेपर्यंत हॉर्न वाजवून हैराण करून सोडीन, इतका की सिग्नलवरून तो सरळ कानाच्या हॉस्पिटलमध्ये गेला पाहीजेल.

6. ट्राफिक नियम हे पाळण्यासाठी नसून तोडण्यासाठी असतात हे ब्रीदवाक्य मी हृदयामध्ये कोरून ठेवले असून माझा प्रत्येक श्वास हा ट्रॅफिक नियम तोडण्यासाठी काय काय करता येईल याविषयी संशोधन करण्यासाठीच घेत राहीन.

7. कुणी जर का मला जर हेल्मेट घालायचे फायदे, सीट बेल्ट लावायचे फायदे सांगितले तर त्याच्याशी मी कुस्ती खेळून भुईसपाट करेन आणि त्याच्या जिभेला गाठ मारीन जेणेकरून तो यापुढे आयुष्यात कुणाला हेल्मेट घाल असे सांगणार नाही.

8. ट्राफिक जाम झाल्यावर जर का मला कुणी जाम सुटावा यासाठी थोडेसे तुझे वाहन इकडे घे तिकडे घे असा फुकटचा सल्ला दिला तर मी त्याचे न ऐकता त्याचेवरच तुटून पडेन आणि त्याला बेदम मारेन.

9. माझ्या रिक्षेत मागे बसलेला माझा कस्टमर उधळून फुटबॉल सारखा रस्त्यावर पडला तरी चालेल पण मी स्पीडब्रेकर वरून रिक्षा वेगाने उडवणार. कस्टमरच्या पोटातील आतडी उलटी पलटी झाली तरीही मला त्याची पर्वा नाही, मला फक्त कमी वेळात जास्तीत जास्त ट्रीपा करायच्यात. जवळचे भाडे घेणे हा माझा अपमान असून जर का एखाद्या कस्टमरने मला जवळच्या ठिकाणी चल असे सांगितले तर मी त्याचा जळजळीत अपमान करीन. दूरच्या भाड्यासाठी मी दीडपट जास्ती भाडे मागीन.

10. पुण्यात पी एम पी बस चालवताना मी चढणारे नीट चढले आहेत की नाहीत तसेच उतरणारे चाकाखाली तर आले नाहीत ना याची पर्वा न करता मी लग्गेच बस  सुरू करून घोडा दामटल्यासारखी पळविन जणू काही मला युद्धाला जायचे आहे.

11. जिथे ट्राफिक जाम झालाय आणि वाहने पुढे जाऊ शकत नाहीत हे माहिती आहे तिथे मात्र मी हॉर्न वाजवून वाजवून माझी संगीतकला सगळ्यांसमोर सादर करीन!!  


Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली