पुणेरी शाब्दिक भेळ
एस.टी. च्या खिडकीतून हात काढून मी त्याला बोलावले-
"ए, भेळवाल्या इकडे ये जरा!"
"काय झालं साहेब? देऊ का अजून एक भेळ?"
"अजून भेळ नको. ही माझ्या हातातली आहे ती भेळ तूच दिलीस ना?"
"व्हय. काय झालं? पैसे द्यायचे राहिले का काय? द्या द्या, वीस रुपये!"
"अरे, पैसे दिले मी तुला, थोड्या वेळापूर्वी गाडीत!"
"हा बरं दिले असतील. मग?"
"दिले असतील नाही, दिले आहेत. पण अरे हे जे तू मला कागदात गुंडाळून दिलं त्याला तू भेळ म्हणतोस?"
"होय. आम्ही त्याला भेळच म्हणतो. तुम्हाला काय वाटतंय ते? वडापाव? ठीक आहे. मग वडा पाव समजून खा!"
मी मनातल्या मनात त्याच्या डोक्यावर जोराची टपली मारली आणि खरोखर म्हटलं, "अरे राजा, 90 टक्के मुरमुऱ्या आणि 10 टक्के फरसाण शेव टाकलंय नुसतं. कांदा, कैरी, तिखट, चाट मसाला, मीठ, लिंबू, टमाटे हे कुठाय? याला तू भेळ म्हणतोस?"
"सह्याब, ती सुकी भेळ हाय!"
"अरे पण कमीत कमी कांदा तर टाकायचास?"
"कांदा महागलाय. त्यामुळेतो आम्ही कमीत कमी वापरतो!"
"शाब्दिक कोट्या करतोस, कोटाड्या सॉरी खोटाड्या! अरे पण 90 टक्के मुरमुऱ्या आहेत यात. याला तू भेळ म्हणतो? पन्नास टक्के फारसाण का नाही टाकलं?"
"व्हय, थोडे चवीला शेव फरसाण टाकलंय ना त्यात. गोड मानून खाऊन घ्या ना पटकन! कशाला डोकं खाताय? म्हणे पन्नास टक्के फरसाण पायजे! आले मोठे हेल्दीराम फरसाणवाले! आणि शाब्दिक कोट्या म्हणाल तर भेळ ज्या कागदांवर मी बांधतो ते कागद वाचून वाचून मी शाब्दिक कोट्या शिकलो, काय सांगता!"
"अरे जास्त झालं आता हे! आणि तुझे शेव मुरमुरे मी कसे गोड मानू? सुक्या भेळ मध्ये सुद्धा कमीत कमी कांदा तरी असतोच असतो! चल माफ केलं तुला! मटकी मागत नाही मी, पण कांदा कैरी टमाटे तर हवेच!"
"साहेब, तुम्ही पुण्याचे का?"
"हो पण त्याचा भेळशी काय संबंध?"
"हाये, संबंध हाये. कारण मी बी पुण्याचा हाये. जेव्हा दोन पुण्याचे लोक वाद घालतात तेव्हा लय वेळ वेस्ट जातो आणि मग एक वेळ अशी येते की..."
"कशी वेळ येते रे दीड शहाण्या? ही सुकी भेळ वीस रुपयांची नाही. दहा रुपये परत कर!"
"एक वेळ अशी येते की भेळ खाणाऱ्याची गाडी सुटायची वेळ येते.. आणि मग दहा रुपये भेळवाल्याकडेच राहून जातात!"
"अरे, गाडी सुटायची धमकी कोणाला देतोस रे? उतरू का खाली?
"धमकी नाय हो, सत्य परिस्थिती सांगतोय. तो आला बघा ड्रायव्हर भेळ खाऊन. माझ्याकडचीच भेळ खाल्ली त्यानं. ओली. वाद घालायचा आहे का? उतरा खाली. आपण एक डायरी घेऊ त्यात एका बाजूला सुकी भेळ लिहू आणि दुसऱ्या बाजूला ओली भेळ लिहू आणि मग फरक स्पष्ट करू!"
ड्रायव्हर म्हणाला, "साहेब, घेऊ का गाडी पोलीस स्टेशनमध्ये?"
मी म्हणालो, "आता तुला काय झालं रे बाबा?"
ड्रायव्हर, "नाही, मला वाटलं तुम्हाला पोलीस कंपलेंट करायची असेल भेळवाल्याबद्दल म्हणून म्हटलं!"
तोपर्यंत भेळवाला त्याच्या दुकानात पोहोचला आणि मला हसत हसत डोळे मिचकावत ओरडून बोलला, "बघा, तो ड्रायव्हरपण पुण्याचाच आहे. कसा टोमणे मारतोय बघा!"

Comments
Post a Comment