वाटचाल प्रगतीशील समाजाच्या दिशेने!
समाज म्हणजे नेमके काय? तर आपल्यासारख्या लोकांनीच समाज तयार होतो. आपण सर्व कोणत्या ना कोणत्या समाजाचा एक भाग आहोत. समाज या शब्दाचा अर्थ तसा सापेक्ष आहे. तथापि, आपल्याला "समाज" या शब्दाचा येथे जो अर्थ अभिप्रेत किंवा अपेक्षित आहे तो असा: विशिष्ट प्रकारच्या जातीसमूहाच्या भारतात आणि भारताबाहेर विखुरलेल्या लोकांचा समूह!
विकास आणि प्रगती ही प्रत्येकाला हवीअसते मग ती स्वत:ची , कुटुंबाची, आपल्या समाजाची असो कि मग राज्यांची आणि देशाची कारण थांबला तो संपला! प्रगती आणि विकास हळूहळू झाले तरी हरकत नाही पण ते थांबायला नको. माणसाने त्याच्या समाजात राहून आणि समाजाने त्याच्या देशात राहून नेहमी प्रगतीशील असले पाहिजे.
संपूर्ण प्रगत झालेला ज्याला यापुढे प्रगतीची गरज नाही असा व्यक्ती, समाज किंवा देश माझ्या मते अस्तित्वातच नसतो. कारण तथाकथित प्रगत समाज हा इतर समाजांच्या तुलनेने प्रगत म्हटला जाऊ शकतो पण त्यातही काही उणीवा असतातच ज्या दूर करण्यासाठी तो समाज प्रयत्नशील असतोच! जो समाज स्वत:ला पूर्ण प्रगत समजून स्वस्थ बसेल, त्याची अधोगतीकडे वाटचाल सुरु होईल. आपली वाटचाल नेहमी प्रगतीशील समाजाच्या दिशेने असली पाहिजे. असा समाज जो सतत प्रगती करतोय!
मग सतत प्रगतीशील राहण्यासाठी समाजाने काय केले पाहिजे? तर समाजातील सर्व घटकांना प्रगत बनवण्यासाठी मदत आणि प्रेरणा दिली पाहिजे आणि वेळप्रसंगी आर्थिक मदत दिली पाहिजे म्हणजे इतर समाजाप्रमाणे आपला समाजसुद्धा या जगात एक वेगळी ओळख निर्माण करू शकेल! विविध शहरातील समाज संघांचे संचालक मंडळ आणि त्या समाज संघातील घटक कुटुंबे यांच्यात एक संवादाचा पूल नेहमी वाहता राहिला पाहिजे. समाजातील या दोन घटकांत दरी पडायला नको. दोघाना एकमेकांवर विश्वास असला पाहिजे आणि तो प्रयत्नपूर्वक एकमेकांनी संपादन केला पाहिजे. त्यासाठी दोन्हीकडून सारखे प्रयत्न हवेत. त्याचप्रमाणे अशा विविध समाज संघांमध्ये सुद्धा एकी, सुसंवाद आणि एकमेकांना मदतीची इच्छा या भावना निर्माण झाल्या पाहिजे.
आपला वैश्य सोनार समाज हा सुद्धा आज विविध मार्गांनी प्रगती करतोय, ही आनंदाची गोष्ट आहे! कधी समाजातील एखाद्या मान्यवर व्यक्तीमुळे समाजाचे नांव मोठे होत असते तर कधी समाजाने केलेल्या उपक्रमांमुळे समाजातील व्यक्तिंना स्वत:चे (आणि पर्यायाने समाजाचेच) नाव मोठे करण्याची संधी मिळत असते. आज आपल्या समाजातील तरुण मंडळी समाजाच्या संचालक मंडळात आहेत आणि कार्यरत आहेत आणि आपल्या समाजाने फार कमी वेळात ऑनलाईन माध्यमांचा वापर करायला शिकून संवादाची दरी आणि वेळ आणखी कमी केला आहे या गोष्टी प्रगतीचं दर्शवतात. आपल्या समाजातील तरुण मंडळींकडे नवनवीन कल्पना आहेत त्या ज्येष्ठ मंडळीनी ऐकून, तसेच तरुणांनी समाजातील अनुभवी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या समाजाची प्रगती "सुवर्णा"क्षरात लिहायला हवी. यासाठी कुटुंबांकुटुंबातील काही मतभेद असतील तर ते सामोपाचाराने मिटवायला हवेत. विशेषतः समाज संघांच्या संचलन मंडळात स्त्रियांनी जास्तीत जास्त भाग घेतला पाहिजे. तसेच आज भारतातील आपल्यापेक्षा प्रगत इतर समाजांप्रमाणे आपणही समाजातील तरुणांसाठी जे नोकरीच्या शोधार्थ शहरात येतात पण ज्याना घरभाडे किंवा इतर होस्टेल मध्ये राहण्याचा खर्च परवडत नाही त्यांच्यासाठी समाजातर्फे मोफत होस्टेल सुरु करत आहोत हे एका मोठ्या प्रगतीचे लक्षण आहे. हेच तरुण नंतर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर समाजाला स्वत:हून आर्थिक मदत करतील यात शंकाच नाही.
तसेच संघांच्या शहरातील (स्थानिक) मेळाव्यात समाजातील मान्यवरांचा सत्कार तसेच विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार आणि शिष्यवृत्ती देण्याची कल्पना पुढे येते आहे ही चांगली गोष्ट आहे. तसेच असे मेळावे (आणि नुकतेच सुरु झालेले ऑनलाईन नोंदणी) वधू वर संशोधनाला एक वरदान ठरत आहेत. आपला समाज असाच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

Comments
Post a Comment