किंडलबद्दल बरेच काही!


नियमित पुस्तक वाचन करणाऱ्या मंडळींना एव्हाना किंडल या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसबद्दल माहिती झाली असेलच जे एखाद्या टॅब सारखे दिसते आणि फक्त पुस्तक वाचनासाठीच बनवले गेले आहे. मी पण छापील सोबतच आता किंडलवर मराठी आणि इंग्रजी पुस्तके वाचतो.

बऱ्याच जणांना किंडलची काही वैशिष्ट्ये माहिती नसतात किंवा वापरता येत नाहीत कारण त्यांना टेक्नॉलॉजीबद्दल जास्त माहिती नसते. अशा वाचकांसाठी आणि एकूणच किंडलबद्दल सर्वसमावेशक माहिती मराठी वाचकांना व्हावी हा या लेखाचा हेतू आहे. अर्थात मी असा दावा करत नाही आहे की मला किंडलबद्दल संपूर्ण माहिती आहे, पण आतापर्यंत मी ते जसे वापरले त्यानुसार मला जी माहिती झाली ते इतरांनाही माहिती व्हावे यासाठी हा लेख प्रपंच!

किंडलवर पुस्तक वाचनाचा अनुभव खूपच समृद्ध आहे. बेडवर तिरपे तारपे झोपून, उशीला टेकून, एका कुशीवर झोपून, टॅब स्टँडला किंवा गेम पॅड स्टँडला किंडल अडकवून हव्या त्या अँगलला फिरवून किंडल वर आरामदायक स्थितीत हॅंडस् फ्री वाचता येते. ते प्रवासात घेऊन जाता येते. डोळ्यांना ताण अजिबात जाणवत नाही. किंडल वजनाला खूप हलके असते. किंडलवर पुस्तके वाचल्याने कागद आणि पर्यायाने वृक्षतोड वाचवल्याचे समाधान पण मिळते.

आपल्याला किंडलमध्ये फॉन्टचा आकार हवा तेवढा मोठा करता येतो. फॉन्टचा आकार कमी जास्त केला की आपोआप पुस्तकाच्या पानांची संख्या कमी जास्त होते. इंग्रजी वाचत असल्यास फॉन्टचे प्रकार बदलता येतात, शब्दांचे अर्थ डिक्शनरीत पाहता येतात. त्यासाठी शब्दावर बोट थोडावेळ दाबून धरायचे. सध्या इंग्रजी-मराठी डिक्शनरी नाही, पण इंग्रजी-इंग्रजी आणि इंग्रजी-हिंदी आहे.

किंडल आपण वाचत नसल्यास किंडल बंद होत नाही. स्क्रीनवर कायम एक चित्र (स्क्रीन सेव्हर) दिसत राहाते. त्याऐवजी जर का आपण सध्या वाचत असलेल्या पुस्तकाचे कव्हर हवे असेल तर तशीही सेटिंग करता येते.

"किंडल अनलिमिटेड" या लायब्ररीत वार्षिक वर्गणी भरली की भरपूर पुस्तके फ्री वाचायला मिळतात. एका वेळेस दहा पुस्तके घेता येतात. एखादे वाचून झाले की परत करून त्याऐवजी नवीन पुस्तक घ्यायचे. एखादे पुस्तक कायम संग्रही हवे असेल तर अर्थातच विकत घेता येते. छापीलपेक्षा किंडलवर किंमत नेहमी कमीच असते.

ऍमेझॉनची goodreads dot com नावाची वेबसाईट आहे. त्यावर ऍमेझॉनच्या युझरनेम आणि पासवर्ड ने लॉगिन केले की त्यात आपण किंडलवर वाचलेल्या पुस्तकांची नोंद असते. तेथे आपण पुस्तकाचा review (परीक्षण) लिहू शकतो. तसेच पुस्तक वाचन सुरू कधी केले, संपले कधी ही नोंद ठेवता येते.

आपण छापील पुस्तकात जशा आवडलेल्या वाक्यांखाली पेन्सिलीने खुणा करतो तसेच यातही highlight करता येते आणि ते कायम आणि हवे तेव्हा आपण goodreads dot com या वेबसाईटवर बघू शकतो. आपण वाचत असलेल्या पुस्तकांवर इतरांचे परीक्षण आणि इतरांनी केलेल्या खुणा (highlights) सुद्धा आपल्याला वाचता येतात.

तुम्ही ऍमेझॉन प्राईम मेंबर असाल तर अशी काही पुस्तके जी किंडल लायब्ररीमध्ये (म्हणजे किंडल अनलिमिटेड मध्ये) नसतात, ती "प्राईम रिडींग" मध्ये वाचायला फ्री असतात, हा आणखी एक फायदा.

एकदा तुम्ही लायब्ररीतले किंवा प्राईम मधले किंवा विकत घेतलेले पुस्तकं डाऊनलोड केले की मग ते वाचायला इंटरनेटची गरज लागत नाही.

किंडलवर इंग्रजी पुस्तके तर आहेतच पण मराठी पुस्तकांचे पण भरपूर कलेक्शन आहे. जुने, नवे, ऐतिहासिक, धार्मिक, आधुनिक, अनुवादित, व्यक्तिमत्त्व विकास, माहितीपर, कादंबऱ्या, शालेय, विज्ञान, वेद, पुराणे, विनोदी, रहस्यमय, थरारक, कथासंग्रह वगैरे सगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या आणि बहुतेक सर्वच लेखकांची (पण सगळी पुस्तके नाही) पुस्तके येथे आहेत. अर्थात काही अपवाद आहेत जसे की, मीना प्रभूंचे कोणतेच प्रवासवर्णन पुस्तक किंडल वर नाही, मात्र ऍमेझॉनवरून घरी छापील आवृत्ती मागवू शकतो.

आपल्याजवळ कॉम्प्युटरमध्ये असलेल्या pdf पण किंडलमध्ये वाचता येतात. त्यासाठी, usb केबलने किंडल डिव्हाईस तुमच्या लॅपटॉपला जोडून त्यातील pdf फाईल्स (पुस्तके) किंडलमध्ये कॉपी करायच्या. किंडलमध्ये एका फोल्डरमध्ये त्या फाईल आपोआप दिसतात. पण ते वाचतांना फॉन्ट कमी जास्त केल्यावर त्यानुसार पानांची संख्या कमी जास्त होत नाही, तुम्हाला झूम करून डावीकडे उजवीकडे सरकवत सरकवत वाचावे लागेल. मोबाईलवर pdf वाचतांना करावे लागते तसेच.

किंवा मग तुमच्या जवळच्या pdf फाईल्सना azw3 या फॉरमॅट मध्ये ऑनलाइन कन्व्हर्ट करा. आणि मग त्या azw3 फाईल्स किंडल मध्ये usb केबल द्वारा कॉपी करा. कधी कधी हे conversion (रूपांतरण) नीट होत नाही. जर तुमच्याकडे एखादे पुस्तक txt फॉरमॅट मध्ये असेल तर मात्र त्याचे रूपांतर azw3 मध्ये खूप छान होते आणि किंडलच्या नेहमीच्या पद्धतीनुसार फॉन्ट कमी जास्त करून वगैरे वाचता येतात.

आणि हो! किंडल अँप मोबाईलवर पण टाकता येते. पण मोबाईलवर बॅकलाईट असल्याने डोळ्यांना त्रास होऊ शकतो, पण किंडल जवळ नसेल तर तात्पुरते पुस्तक वाचन पुढे सुरू ठेवण्यासाठी मोबाईल हा पर्याय आहे. किंडलचा स्क्रीनच मुळात व्हाईट असतो जो मोबाईलसारखा आतील लाईटमुळे प्रकाशमान (illuminate) होऊन व्हाईट झालेला नसतो. किंडलच्या व्हाईट स्क्रीनवर ब्लॅक शाई (इलेक्ट्रॉनिक ink) उमटते.

किंडलचा बॅटरी बॅकप अनेक आठवडे चालतो. जेव्हा आपण वाचत नसतो आणि किंडल स्टँड बाय मोडवर असतो तेव्हा बॅटरी लवकर डिस्चार्ज होत नाही. एक महिना तरी बॅटरी चार्ज राहते.

किंडलवर पुस्तक वाचायला (छापील पुस्तकांप्रमाणेच) त्याच्यावर प्रकाश पडायला हवा असतो. मग तो सूर्यप्रकाश किंवा दिवसा घरात असलेला प्रकाश असो किंवा मग बल्ब किंवा LED चा प्रकाश असो! जर अंधारात किंडलवर पुस्तक वाचायचे तर बॅकलाईटची सोय असलेले किंडलचे व्हर्जन घ्यावे लागेल. दिवसा प्रकाशात वाचन करत असलात तर बॅकलाईट शून्य (झिरो) ठेवावा अन्यथा बॅटरी लवकर संपेल.

एकूणच काय तर, सोयीस्कर वाचनासाठी किंडल हाच पर्याय आहे.

ता. क. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे 10 सप्टेंबर 2021 ला किंडलचे नवे सॉफ्टवेअर अपडेट झाले आहे ज्यात त्यातील मेनू अधिक युझर फ्रेंडली झाले आहेत. तसेच समस्त मराठी वाचकांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे इंग्रजी मराठी, मराठी इंग्रजी आणि मराठी मराठी अशा तीन डिक्शनरी पण उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. म्हणजे आता इंग्रजी पुस्तक वाचतांना इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ बघता येणार आहे तसेच मराठी पुस्तक वाचतांना इतर समानार्थी मराठी शब्द तसेच पर्यायी इंग्रजी शब्द लगेच बघता येणार आहे.

किंडल हे ऍमेझॉनचे प्रॉडक्ट असल्याने ते ऍमेझॉन वरून खाली दिलेल्या लिंकवरून खरेदी करू शकता. यात बॅकलाईट पण आहे: https://www.amazon.in/dp/B07FRJTZ4T?ref=ppx_pop_mob_ap_share

मी किंडल वर वाचलेल्या काही पुस्तकांचे review येथे बघू शकता:
https://www.goodreads.com/user/show/83204153-nimish-sonar

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली