टिंगरी येथील श्री क्षेत्र सुवर्ण पिठापुरम


२७ डिसेंबर २०२० ला आमच्या कुलदेवीचे दर्शन घेतल्यानंतर सहकुटुंब टिंगरी येथील दत्त मंदिरात जाण्याचा योग आला. मालेगांव पासून १५ किमी दूर असलेल्या करंजगव्हाण येथील विंध्यवासिनी या देवीच्या मंदिरात दर्शनाला गेलो होतो. आमची कुलदेवी बिजासनी देवीचे हे एक रूप आहे. बिजासनी देवीचे मूळ मंदिर मध्य प्रदेश सीमेवर सेंधवा घाटात आहे. टिंगरी येथील दत्त मंदिरात श्री. अविनाशजी देवरे यांची भेट झाली आणि सहज चर्चेतून मी लेखक असल्याचे त्यांना सांगितले. योगायोग म्हणजे बऱ्याच दिवसांपासून या पवित्र देवस्थानाविषयी माहिती पुस्तिका छापायची त्यांची इच्छा त्यांनी त्यावेळी मला बोलून दाखवली आणि मी तत्काळ होकार दिला. दत्तगुरु महाराजांच्या देवास्थानाविषयी मला पुस्तिका लिहायला मिळणे ही दत्तमहाराजांची कृपा आणि अहोभाग्य! 


मी व सौ आम्ही दोघांनी मंदिरात होम करतांना दत्तगुरु महाराजांना मनापासून आणि भक्तिभावाने विंनती केली होती की आमच्या बजेटमध्ये घर मिळावे कारण आम्ही घराच्या शोधार्थ होतो. पुण्याला परतल्यानंतर आठ दिवसांच्या आत आम्हाला बजेटमध्येच फ्लॅट मिळाला. ही सगळी दत्त महाराजांच्या या जागृत देवस्थानाची कृपा होय, यात शंका नाही! सर्व दत्तभक्तांनी भक्तीभावाने या मंदिराला जरूर भेट द्यावी असे मला मनापासून वाटते!


नंतर मी महाराष्ट्र टाईम्स पुणे आवृत्ती मध्ये सुद्धा या स्थानाविषयी लिहिले ते आपण या आधीच्या पानावर वाचलेच आहे. ही पुस्तिकाही आपणांस आवडेल ही अपेक्षा! यातील इतिहास व मंदिरासंबंधी तथ्ये व माहिती ही वेळोवेळी देवरे कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून संकलित केलेली आहे.


लेखक: निमिष सोनार, पुणे

मोबाईल: 8805042502

ईमेल: sonar.nimish@gmail.com 

श्री गुरुदेव दत्त:

ओळख:

महाराष्टात नाशिक जवळ मालेगांव-कुसुंबा रस्त्यावर २२ किलोमीटर अंतरावर, टिंगरी या गावापासून गाळणे रस्त्याला २ किलोमीटरवर एक जागृत दत्तस्थान आहे. ते २४ सप्टेंबर  २०१५ पासून उदयास आले आहे. 


ज्यांना पिठापूरला जाणे शक्य नसेल, पण श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा असेल त्यांनी टिंगरी येथील ह्या श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थानी जरूर यावे. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी स्वतः घडवून आणलेले हे स्थान आहे. 


याची कथा ऐकून भाविकांच्या मनात अपार श्रद्धा, कृतार्थता, सेवाभाव जागृत होईल. भक्तांना ही जागा परिवर्तनकारक ठरेल, अभक्ताला मात्र हे मृगजळ वाटेल. हे देवस्थान जागृत असून दत्तभक्तांना येथील दर्शनाने अनेक चांगले अनुभव आले आहेत. येथील अनोखे नवग्रह मंदिरही आवर्जून बघण्यासारखे असून त्याबद्दलची माहिती आपल्याला पुढे वाचायला मिळेलच.


या श्रीपाद श्रीवल्लभ मंदिराची पूजा सेवा व अन्नदान सेवा श्री. गोकुळआबा देवरे व त्यांच्या पत्नी सौ. अरुणाताई गोकुळ देवरे (अन्नपूर्णा ताई) हे  करत असतात. 


मंदिराच्या संपूर्ण बांधकामासाठी व मंदिराच्या सेवेसाठी श्री गोकुळआबा देवरे व त्यांचा परिवार (अन्नपूर्णा ताई, पुत्र अविनाश, कन्या मनीषा व जयश्री) हे श्रमदान व दत्तसेवा करत आले आहेत व यापुढेही करत राहणार!


इतिहास:


सदर मंदिराची प्रतिष्ठापना स्वामी त्रिशक्ती यांचे प्रेरणेतून झालेली आहे. स्वामीजी २००९ मध्ये पिठापूरी गेले होते तो दिवस महाशिवरात्रीचा होता! तेथील पादगया क्षेत्रात गोपालबाबा आश्रमात ते मुक्कामास राहिले. 


एकदा स्वामीजी शिव नामस्मरणात तल्लीन होऊन गेले होते. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी भगव्या वस्त्रात १५-१६ वर्षे वयाच्या तरुण रूपात त्यांना दर्शन दिले आणि आदेश दिला. त्या आदेशानुसार स्वामीजींनी श्रीवल्लभ चारितामृताची काही पारायणे केली. पुढे श्रीपादांचे आदेशानुसार स्वामी नाशिक जिल्ह्यात सिन्नर गावी आले आणि नंतर श्री गोकुळआबा देवरे हे त्यांना टिंगरी गावी घेऊन गेले. 


देवरे कुटुंबियांचे पूर्वज हे गिरनार क्षेत्री असलेल्या जुनागड येथील बाभूळवाडी गावात रहात होते, त्यामुळे असा दत्त सेवेचा योग जुळून आला! स्वामीजींनी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आदेशानुसार अनेकदा हवन सेवाही केली. त्याचवेळी श्रींची मूर्ती व मंदिर बाधणेचा आदेश झाला आणि श्री गोकुळ नामदेव देवरे यांच्या मदतीने त्यांनी ते पूर्ण केले. 


कालांतराने स्वामीजींचा स्वर्गवास आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे  दि. १ नोव्हेंबर २०२० या तारखेला झाला आणि त्यांचे पुढील सर्व संकल्प आणि स्वप्न आता श्री गोकुळआबा देवरे यांच्या नेत्तृत्वाखाली पूर्ण करण्यात येत आहेत. 


श्री गोकुळ नामदेव देवरे यांच्या मदतीने स्वामीजींनी मंदिराचे काम कसे पूर्ण केले याची कथा मी आपल्याला पुढे सांगतो. 


मंदिराची कथा:


पूर्वी डॉक्टर शिरीष गुजराती हे आपल्या काही मित्रांसह त्रिशक्ती महाराज (स्वामी) यांना पिठापूर येथे भेटले होते आणि स्वामींच्या भविष्य कथनाचा सत्य अनुभव त्यांना आला होता. कालांतराने जेव्हा देवरे कुटुंबीय सिन्नरला चाळीत रहात होते तेव्हा स्वामीजींना त्या चाळीत डॉक्टर गुजराती यांनी नेहमीकरता राहायला बोलावून एक खोली दिली होती. हे सर्व श्रीपादांच्या आदेशानुसार घडत होते. श्री अविनाश देवरे (श्री गोकुळआबा देवरे यांचे सुपुत्र) यांच्या भगिनी मनीषा तेव्हा लहान होत्या. शाळेत शिकत होत्या. मग देवरे कुटुंबीयांची स्वामीजींशी भेट झाली. स्वामीजींनी मनीषा हिला मुलगी म्हणून दत्तक घेतले व कालौघात तिच्या शिक्षणाचा व पुढे लग्नाचा पूर्ण खर्च केला. 


श्री गोकुळआबा देवरे यांनी अजनाळे गावातील त्यांच्या देवस्थानाबद्द्ल (सात आसरा) स्वामीजींना सांगितले जिथे ते १९७१ सालापासून नित्यनेमाने पूजा करत आहेत. तीच जागा स्वामीजींना सुद्धा स्वप्नात आली असे स्वामीजींनी श्री गोकुळआबा देवरे यांना सांगितले. स्वप्नात स्वामीजींना तिथे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुका दिसल्या. तिथे स्वामीजी गोकुळ आबांसोबत गेले असता ते ठिकाण तर दिसले पण त्या पादुका नव्हत्या. स्वामीजी मात्र तिथे ९ दिवस थांबले. त्या जागेत त्यांना बरेच अनुभव आले. त्या जागेत एके ठिकाणी त्यांना श्रीपाद कृपेने बारा महिने पाणी असलेले एक कुंड सापडले आणि एके रात्री त्या कुंडात चांदण्या दिसल्या. नंतर पुन्हा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि काय आश्चर्य! नंतर त्या पूर्वीच्या जागेवर खरोखर पादुका प्रकटल्या! 


त्या जागी मंदिर निर्मिती नुकतीच सुरु झाली पण दोन सरकारी अधिकाऱ्यांनी त्या जागेवर हक्क सांगून मंदिर बांधण्यास मनाई केली. अजूनही तिथे एक ओटा आणि शेड बांधून त्या पादुका तशाच आहेत. मग श्री गोकुळआबा देवरे यांनी टिंगरी गावात मंदिर बांधायचे ठरवले पण ग्रामपंचायतीने जागेअभावी असमर्थता दर्शविली. 


नंतर मग टिंगरी गावापासून २ किमी अंतरावर गाळणे रस्त्याला (सुवर्ण पिठापूर) एके ठिकाणी श्री गोकुळ देवरे यांनी श्री चोरमुंगे यांची १२ गुंठे जागा विकत घेतली आणि आणखी  १२ गुंठे जागा श्री सुदाम सोनवणे यांनी दान केली. स्वामी त्रिशक्ती महाराज आणि श्री गोकुळ देवरे यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचे भूमिपूजन दि. ९ ऑक्टोबर २०११ रोजी झाले व २०१५ साली बांधकाम पूर्ण झाले. संपूर्ण बांधकाम होत असतांना देवरे कुटुंबातील सर्व सदस्यांनी श्रमदान केले व सेवा दिली. मंदिराच्या मूर्तीचे काम गुरुपौर्णिमेला सुरू झाले. मूर्ती ज्या चित्रापासून बनली ते चित्र आणि मूर्तीचा चेहरा यात कमालीचा फरक आहे. सदर मूर्तीची निर्मिती जयपूर येथे करण्यात आली. सुरुवातीला सदर मूर्तीस लागणारा दगड मिळत नव्हता. 


अखेर श्रीपाद जन्मदिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला एक दगड मिळाला, जो जणू काही केवळ श्रीपादांचे मूर्तीसाठी ५ वर्षांपासून त्या जागी पडून होता आणि मग त्यातून सध्याची अत्यंत नयनमनोहर श्रीपादांची मूर्ती तयार झाली. 


मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना श्रावण नक्षत्र, परिवर्तन एकादशी, २४ सप्टेंबर २०१५ रोजी झाली. ही तारीख स्वामीजींनी दोन वर्षे आधीच ठरवली होती कारण नववा महिना म्हणजे नवदुर्गेचे प्रतिक आहे आणि २०१५ सालची बेरीज आठ येते जे अष्टलक्ष्मीचे प्रतिक आहे. तसेच २४ ही तारीख “दो चौपाती” म्हणजे सिद्ध मंगल स्तोत्रातील उल्लेखानुसार स्वामीजी “दोन चपाती” भिक्षा मागत असत त्याचे प्रतिक आहे. 


प्राणप्रतिष्ठेच्या रात्री पाऊस पडला. मंदिराच्या बाजूला नर्मदा वाळू होती. त्या वाळूचे आपोआप शिवलिंग तयार झाले. हे शिवलिंग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वप्रथम सौ. अरुणाताई देवरे यांना दिसले व त्यांनी ते स्वामीजींना दाखवले. मग स्वामींनी त्या जागेवर “वरुणेश्वर” महादेव मंदिर बांधण्याचा संकल्प केला. शिवलिंग प्रकट होण्याच्याच रात्री म्हणजे प्राणप्रतिष्ठेच्या रात्री देवरे कुटुंबाच्या पाळीव कुत्रीने चार कुत्र्यांना जन्म दिला. या सर्व घटना म्हणजे शुभ संकेत होते! 


शिवलिंगाच्या जागेवर मंदिर बांधण्याच्या संकल्पानुसार त्याचे भूमिपूजन श्री गोकुळआबा देवरे यांच्या नेत्तृत्वाखाली ११ मार्च २०२१ रोजी महाशिवरात्रीला करण्यात आले. स्वामीजींचा स्वर्गवास दि. १ नोव्हेंबर २०२० ला झाला आणि त्यांचे पुढील सर्व संकल्प आणि स्वप्न आता श्री गोकुळआबा देवरे यांच्या नेत्तृत्वाखाली पूर्ण करण्यात येत आहेत. 


मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती प्रतिष्ठापनेला हसत होती. त्यासंदर्भातील फोटो उपलब्ध आहेत असेही देवरे कुटुंबीय सांगतात.  


मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला पिठापूर मधले पुजारी आले होते. गाभाऱ्यात प्रतिष्ठापनेच्या वेळी एक ज्योत मूर्तीच्या भृकुटात प्रकटली. याची खूण म्हणून मूर्तीच्या भृकुटात दत्त भक्तांना तेज दिसतंच. श्री महाराजांच्या प्रदक्षिणा मार्गात श्री बापन्नाचार्यलू, श्री अप्पळराज लक्ष्मी शर्मा यांच्या मूर्त्या आहेत. मंदिर परिसरात एक गोशाळाही आहे. 


सदर मंदिराची बांधणी ही दाक्षिणात्य पद्धतीची आहे. श्रीवल्लभांच्या मूर्ती स्थापनेला १८ नद्या आणि ३ समुद्राचं पाणी आलं. वरुणेश्वर शिवलिंगाच्या डाव्या बाजूला अंतरवाहिनी सुद्धा प्रगटली त्यालाच स्वामींनी गंगा प्रकट झाली असे म्हटले. त्याचीच कथा पुढे मी सांगत आहे.  


आणि गंगा प्रकट झाली:


मंदिर बांधून झाल्यानंतरचा एक अनुभव देवरे कुटुंबीय सांगतात. एवढ्या मोठ्या मंदिर परिसरात म्हणजे काळखडी (सध्याचे सुवर्ण पिठापुर) परिसरात खूप पाण्याची गरज लागणार होती आणि ती गरज कशी भागवणार हा प्रश्न समोर होता! त्या वेळेस दुष्काळ सुद्धा पडायचा. 


स्वामीजींना अशी शक्ती प्राप्त होती की ते श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या मूर्तीसमोर बसून त्यांचेशी संवाद साधू शकत. एकदा असे झाले की, श्री अविनाशजी देवरे श्रीपादांसाठी नैदेद्य घेऊन दुपारी बारा वाजता मंदिरात गेले. 


स्वामीजी आणि अविनाशजी हे पाण्याच्या प्रश्नाबद्दल आणि बोअरवेल लावण्याबद्दल चर्चा करू लागले. त्याच वेळेस मूर्तीच्या हातावरून एक फूल खाली नैवेद्याच्या ताटात पडले. 


ते फूल आणि एक नारळ स्वामीजींनी हातात घेतले आणि ते वरुणेश्वर शिवलिंगाच्या पुढे खाली बसले. डोळे बंद करून स्वामीजी शिवलिंगाच्या डाव्या बाजूला सरकत गेले  व जिथे ते फूल हातातून खाली पडले, तिथे नारळ ठेऊन नंतर त्यांनी तिथे खोद्काम करायला सांगितले आणि काय आश्चर्य! तिथे भरपूर पाणी लागले. 


खरं म्हणजे अशा खडकाळ ठिकाणी जमिनीत पाणी नसते. परंतु इथे भरपूर पाणी तर लागलेच आणि ते सुद्धा गोड! त्यालाच स्वामींनी गंगा प्रकट झाली असे म्हटले. 


मंदिर परिसर आणि आसपासच्या काही गावातील लोक आता येथूनच आपल्या पाण्याची गरज भागवतात. या भागाला आता सुवर्ण पिठापुर असे म्हणतात!


दत्त भक्तांचा अनुभव:


सदर तिर्थक्षेत्री अनेक चमत्कार घडत आहेत. मंदिर परिसर पूर्णपणे जागृत आहे. अनेक भक्तांच्या मनोकामना येथील दर्शनाने पूर्ण झाल्याचे भक्त सांगतात. हा संपूर्ण परिसर आध्यात्मिक स्पंदनांनी भरलेला आहे. 


आपण येथे सकाळी येऊन ध्यान केल्यास आपल्याला ही अनुभूती जरूर येईल. मंदिरात जाण्याआधी सोबत धोतर/सोवळे न्यावे. मंदिरात सगळ्यांना अभिषेक/पालखी सेवा करता येते. येथील श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती पाहून भक्तगण देहभान विसरतात. श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती पाहून भक्तगणांच्या डोळ्यातून प्रेम व श्रद्धेच्या अश्रूधारा वाहात राहतात व भक्त सर्व दुःख विसरून जातो हे मात्र नक्कीच! आपल्यालाही येथे आल्यावर याचा अनुभव येईलच! 


स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे, भक्तांनी मनात इच्छा धरून एक नारळ घेऊन नवग्रह मंदिराला ९ प्रदक्षिणा आणि तेच नारळ घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ मंदिराला ३ प्रदक्षिणा मारून यज्ञकुंडात त्या नारळाची आहुती दिल्यास त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतेच व श्रीपाद श्रीवल्लभ त्या भक्ताचे ग्रहदोष निवारण करतात. याचा अनुभव भक्तांना आलेला आहे. इच्छा पूर्ण झाल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ मंदिराला  १०८ प्रदक्षिणा माराव्यात असेही स्वामींनी सांगितलेले आहे. 


ते शक्य नसल्यास ९, १८, २७ अशा ९ च्या पटीने प्रदक्षिणा मारल्या तरीही चालतील कारण स्वामीजींना ९ हा अंक प्रिय होता, असे श्री अविनाशजी देवरे यांनी सांगितले.


मंदिर आणि परिसर:


येथील परिसराचे मुख्य मंदिर, नवग्रह मंदिर आणि एक यज्ञकुंड असे तीन भाग आहेत. तिथे दररोज दुपारी १२ वाजता नैवेद्य आरती होते आणि दर पौर्णिमेला यज्ञ होतो. दर गुरुवारी आणि प्रत्येक पौर्णिमेला पालखी सोहळा होतो. मंदिरामध्ये सगळ्यांना अभिषेक आणि पालखी सेवा करता येते. 


मुख्य मंदिर तीन मजली आहे. खाली संत आणि दत्तावतार परंपरा यांच्या जिवंत वाटणाऱ्या मूर्ती आहेत. वरच्या मजल्यावर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांची उभी मूर्ती आणि राजराजेश्वरी देवीची मूर्ती आहे. हे मंदिर गुलाबी आणि हिरवा अशा मुख्य दोन रंगात रंगवले आहे. तसेच मंदिराच्या भिंती निळ्या आणि पिवळ्या रंगानी रंगवलेल्या आहेत. छतावर विविध चित्रे काढलेली दिसतात. सगळ्यात वर तिसऱ्या मजल्यावर त्रिमुखी दत्त मंदिर असून त्या मंदिराचा कळस हे शिवलिंग आहे आणि मंदिरासमोर नंदीची मोठी मूर्ती आहे. या नंदीच्या कानात आपली इच्छा बोलून दाखवल्यास ती भगवान शंकरांपर्यंत जरूर पोचते असे भाविक सांगतात. 


नवग्रह मंदिर:


येथील नवग्रह मंदिर एकमेवाद्वितीय आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा १८ मे २०१९ साली झाली. त्यात नवग्रहांच्या सोबत बारा राशी आणि सत्ताविस नक्षत्रे मंदिरावर कोरलेले आहेत. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मनक्षत्र "चित्रा" हे कळसावर कोरलेले आहे. विशेष म्हणजे हे मंदिर सत्ताविस डोंगरांच्या मध्ये वसलेले आहे. 


गोशाळा आणि महाप्रसाद:


या दत्तस्थानी एक गोशाळा आहे. या गोशाळेची सेवा पूर्णपणे श्री गोकुळआबा देवरे करतात. येथे अन्नपूर्णा ताई म्हणून सगळीकडे प्रसिध्द असलेल्या अविनाश यांच्या आई सौ. अरुणाताई देवरे गावाकडचा चुलीवरचा स्वयंपाक बनवून देतात. जास्त जण येत असल्यास येतांना आधी त्यांना फोन करून तशी कल्पना द्यावी. निसर्गरम्य परिसरात जेवण करतांना आनंद काही वेगळाच! येथे महाप्रसाद म्हणून खिचडी, रव्याचा शिरा आणि कढी मिळते. 


मंदिरातील रोजच्या कार्यक्रमांची रूपरेषा:


सकाळी ७ वाजता: पादुका व मूर्ती यांचा अभिषेक

सकाळी ७:३० वाजता: आरती

दुपारी १२ वाजता: नैवेद्य आरती

संध्याकाळी ७ वाजता: आरती 

यज्ञ हवन: दर पौर्णिमेला सकाळी ११ वाजता

पालखी सोहळा: दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला संध्याकाळी आरती नंतर


मंदिराचे वर्षभरातील महत्वाचे कार्यक्रम:


महाशिवरात्री,

राखी पौर्णिमा,

श्रीपाद श्रीवल्लभ जयंती (गणेश चतुर्थी),

दत्त जयंती,

बाळूमामा जयंती.

पत्ता:

गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान,

टिंगरी ते गाळणे रोड (गाळणे शिवार),

सुवर्ण पिठापुरम, गाळणे गांव,

ता. मालेगाव, जि. नाशिक (महाराष्ट्र)

पिन: ४२३२०५.


जवळचे बस स्थानक: मालेगाव आणि धुळे

जवळचे रेल्वे स्टेशन: मनमाड जंक्शन.

येथे कसे यायचे?

(पुणे/नासिक येथून बसने येणाऱ्या भक्तांनी मालेगाव मधील मोसमपूल सर्कलला उतरावे, येथून जवळच असलेल्या शिवाजी पुतळ्यापासून टिंगरी गावाचे रिक्षा, ऑटो मिळतात. सकाळी ६;३०, ७:३० वाजता मालेगाव नवीन बस स्टँड पासून फलाट ९ वरून कुसुंबा रोड च्या बसेस आहेत. सकाळी ८:३० वाजता मालेगाव ते गाळणे बस असून ही मंदिरासमोरच थांबते. सकाळी ९:३०, संध्याकाळी ६ ला मालेगाव ते लुल्ला बस गाळणे फाटा येथे सोडेल, येथून मंदिर अगदी जवळ आहे. मालेगांवहून येथे येतांना रस्त्याने वैतागवाडी, वडगांव, लेंडाणे, करंजगव्हाण, दहिदी अशी गावे पार करत आपण टिंगरी येथे पोहोचतो. रस्त्याने चिंचेची झाडे, द्राक्षाचे मळे, शेवग्याची झाडे, कांदे आणि क्वचित केळीच्या बागा दिसून येतात.)


अधिक माहितीसाठी संपर्क:


श्री गोकुळ नामदेव देवरे (9637460347)

श्री पंकज जगन्नाथ पाटील (9879698920)

श्री.अविनाश गोकुळ देवरे (9623500607)

श्री. गुरुदेव दत्त.


(या श्रीपाद श्रीवल्लभ मंदिराची पूजा सेवा व अन्नदान सेवा श्री. गोकुळआबा देवरे व त्यांच्या पत्नी सौ. अरुणाताई गोकुळ देवरे (अन्नपूर्णा ताई) हे  करत असतात. मंदिराच्या संपूर्ण बांधकामासाठी व मंदिराच्या सेवेसाठी श्री गोकुळआबा देवरे व त्यांचा परिवार म्हणजे अन्नपूर्णा ताई, पुत्र अविनाश, कन्या मनीषा व जयश्री  हे सर्वजण श्रमदान व दत्तसेवा करत आले आहेत व यापुढेही करत राहणार!)










Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली