कर्माचा हिशेब आणि माफी
"देवा आज अचानक कसे दर्शन दिलेस मला?"
"हे मानवा, तू मला प्रार्थना करून नेहमी विनंती करतोस की ह्या व्यक्तीला माफ कर, त्या व्यक्तीला माफ कर. असे का?"
"होय देवा, काही व्यक्ती माझ्याशी वाईट वागतात, द्वेष करतात, माझे नुकसान करतात, मला त्रास देतात, कठोर वाणी बोलतात, कसलीच शहानिशा न करता माझ्याबद्दल पूर्वग्रहदूषित वृत्तीने गैरसमज करून घेतात, मला स्वतःला स्पष्टीकरण करण्यासाठी संधीही देत नाहीत. पण तरीही त्यांना माफ कर असे मी तुला विनंती करतो!"
"मानवा, लक्षात ठेव अशी प्रार्थना यापुढे माझ्यापाशी करू नकोस!"
"का देवा?"
"ते तुझ्याशी जसे वागतात त्यासाठी मी त्यांना माफ करावे हे तू मला कशाला सांगतोस? मी कुणातच भेदभाव करत नाही. तू निमुटपणे त्यांची वागणूक सहन करतोस म्हणून मी तुझे ऐकून त्यांना माफ करेल असा पक्षपातीपणा मी करत नाही. त्यांना त्यांच्या कर्मानुसार आणि तुला तुझ्या कर्मानुसार फळ देणे मला बंधनकारक आहे! तसे करणे आवश्यक आहे."
"मग मी काय करू?"
"करायचेच असल्यास तू स्वतःच त्यांना माफ कर, मला सांगण्यापेक्षा!"
"मी त्यांना अनेकदा माफ केले आहे देवा. तरीही ते तसेच वागतात!"
"मग तू सुध्दा त्यांना वारंवार माफ करू नकोस. वारंवार माफ केल्यास त्यांच्या तशा वागण्याला तू अजून उत्तेजन देतो आहेस हे विसरू नकोस. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. तुझ्या अशा वागण्याने त्यांच्या तशा वागण्याचे फळ त्यांच्याऐवजी तुलाच भोगावे लागेल. आहे मंजूर?"
"हा तर अन्याय होईल देवा!"
"वाह रे मानवा, माझा एकही अन्याय सहन करायला नाही म्हणतोस आणि त्या मानवांकडून होणारा अन्याय वारंवार सहन करतो आहेस? कशासाठी?"
"मग मी काय करू देवा?"
"काही वेळेस या जन्मातील काही घटना आपल्या मागच्या जन्मातील कर्माशी संबंधित असतात! पण ते कर्म आपल्याला आठवत नसतात. त्यामुळे त्या त्या व्यक्तींच्या तशा वागण्याचे ओझे कायम मनात न बाळगता योग्य वेळ येईल तेव्हा त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देणे योग्य ठरेल! प्रत्युत्तर दे पण स्वतः न्यायाधीश बनून त्यांना शिक्षा करू नकोस. त्यांच्या तशा वागण्याने तुला त्रास होतो याची जाणीव त्यांना तू करून दिलीच पाहिजेस. त्यांच्या तशा वागण्यामागची कारणे शोध. कारणे जर अवाजवी असतील तर त्यांना तशी स्पष्ट जाणीव करून दे! तरीही त्यांना मान्य नसेल तर मग जशास तसे उत्तर दे! पण जर का त्यांच्या तशा वागण्याची कारणे वाजवी असतील तर स्वत: मध्ये बदल कर आणि मग वागणूक बदलते का पहा!"
"तरीही त्यांची वागणूक बदलली नाही तर त्यांना जशास तसे प्रत्युत्तर दिल्याबद्दल मला नक्की माफ करशील ना देवा?"
"मी कुणालाच माफ करत नाही. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माची फळे भोगावीच लागतात! मानवांनी एकमेकांना चुकांबद्दल माफ केल्याने किंवा न केल्याने माझा कर्माचा हिशेब आणि न्याय बदलत नाही. एकाने दुसऱ्याला माफ केल्याने जास्तीत जास्त एकच होईल! माफ करणारा जो असतो त्याच्या मनावरचे ओझे उतरेल! बाकी कुणाचाच कर्माचा हिशेब इथे बदलत नाही!"

Comments
Post a Comment