बनेश्र्वर, नारायणपूर आणि प्रति बालाजी
तुम्ही पुण्यात रहात असाल आणि श्रावण महिन्यात कुटुंबासाठी धार्मिक आणि निसर्गरम्य अशी एक दिवसीय सहल आखायची असेल तर अनेक पर्याय तुम्हाला माहीत असतीलच. पण मी नुकत्याच पार पडलेल्या अशाच एका एकदिवसीय सहलीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. आम्ही सर्वजण म्हणजे मी, माझे आई वडील आणि पत्नी, मुलगा मुलगी हे एक मोठी 6 सीटर कार भाड्याने घेऊन एका दिवसात तीन धार्मिक ठिकाणे व्यवस्थित बघून आलो. लोहगांव जवळील धानोरी येथून निघून प्रथम कोंढवा, बोपदेव घाट सासवड मार्गे नारायणपूर. तिथे दत्त मंदिर, नारायणेश्वर हे हेमाडपंथी महादेव मंदिर आणि महाकालेश्र्वर मंदिर हे तीन मंदिर बघून तिथून जवळच असलेले प्रति तिरुपती बालाजी मंदिर पाहिले आणि नंतर तिथून साधारण 12 किमी वर असलेल्या नसरापूर येथील बनेश्र्वर मंदिर पाहिले तसेच तेथील प्रसिद्ध असे कृषी पर्यटन केंद्र बघितले. येताना कात्रज मार्गे पुन्हा पुणे धानोरी येथे परत आलो. जास्त वेळ असेल तर सासवडहून आधी पुरंदर किल्ला बघून मग उर्वरित तीन ठिकाणे आपण बघू शकता. आम्ही पुरंदरचां सहभाग आमच्या सहलीत करू शकलो नाही.
या सहलीला मी निसर्गरम्य असे देखील म्हणालो कारण रस्त्याने आपल्याला पर्वतांच्या आजूबाजूला जमलेले ढग तसेच पडणारा पाऊस अधून मधून दिसणारा ऊन पावसाचा खेळ बघायला मिळतो आणि असे दृश्य फक्त श्रावणातच आपण पाहू शकतो. सगळी सृष्टी हिरवीगार झालेली होती. सगळे पर्वत हिरवेगार दिसत होते. रस्त्याने अनेक ठिकाणी हमखास छोटे धबधबे जरूर दिसायचे.
पुणे ते नसरापूर 33 किमी अंदाजे
पुणे ते नारायणपूर 33 किमी अंदाजे
पुणे ते प्रति बालाजी मंदिर 40 किमी अंदाजे
नारायणपूर ते बालाजी 4 किमी आणि तिथून नसरापूर 12 किमी
नारायणपूर: येथील दत्त मंदिर खूप मोठे आहे. एकमुखी आणि तीन मुखी असे दोन्ही दत्त भगवान येथे दोन वेगवेगळ्या मंदिरात आहेत. नंतर जवळच हेमाडपंथी पद्धतीचे नारायणेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिर खूप मोठे आणि बघण्यासारखे आहे. तिथे स्वयंभू शिवलिंग आहे. श्रावणात शिव भक्तांसाठी ही एक पर्वणी आहे. अर्थात आम्ही सोमावरी न जाता शनिवारी गेलो कारण सोमवारी दर्शनासाठी खूप मोठी रांग असते आणि सोबत ज्येष्ठ नागरिक असल्याने जास्त काळ म्हणजे तीन चार तास रांगेत उभे रहाणे थोडे जिकरीचे होते. त्या मानाने इतर दिवशी थोडी कमी गर्दी असते आणि दर्शन व्यवस्थित होते. दत्त मंदिरासमोरच महाकालेश्र्वर महादेव मंदिर आहे. ते सुद्धा खूप छान आहे. दत्त मंदिर वगळता इतर दोन्ही मंदिरात फोटो काढायला परवानगी आहे. नारायणपूर येथील खेकडा भजी (नॉन व्हेज खात नाही, त्याचा आकार खेकड्यासारखा असतो म्हणून तसे नाव आहे) फार प्रसिद्ध आहेत असे काही जणांनी सांगितले. श्रावणातील पाऊस पडत असताना ही गरमागरम कांदा भजी मिरच्यांसोबत खायची मजा काही औरच आणि त्यात सोबतीला अमृततुल्य चहा असला म्हणजे जणू काही बासुंदीमध्ये केशरच!
प्रति तिरुपती बालाजी: हे मंदिर खूप भव्य आहे आणि बांधकाम आणि नक्षीकाम थोडे वेगळेच असून हिरवट पिवळ्या रंगाचा वापर जास्त केलेला दिसतो. छतावरही चित्रे काढली आहेत. आत जातांना आपले मोबाईल एका ठिकाणी जमा करूनच मग आत सोडतात. फोटो काढायला परवानगी नाही. मंदिराच्या आत बालाजी सोबत अनेक छोटी मंदिरे आहेत. ते बघून संपले की छोट्या द्रोणमध्ये आसट (पाणी जास्त असलेला, खिरीसारखा) चवदार जिरे फोडणी दिलेला भात आपल्याला प्रसाद म्हणून मिळतो. तिथेच मोफत प्रसाद (जेवणाचे) कूपन मिळतात. मंदिरातून बाहेर पडले की उजवीकडे भोजनालय आहे. तिथे आम्हाला चवदार सांबार भात, शिरा, वांगे बटाटे भाजी असे जेवण मिळाले.
नसरापूर: येथील बनेश्र्वर मंदिरात महादेव दर्शन झाल्यानंतर बाहेर दोन कुंड आहेत त्यातील पाण्यात भरपूर मोठी कासवे आणि मासे आहेत. लहान मुलांना ही एक पर्वणी आहे. त्यानंतर कृषि पर्यटन केंद्रात साहसी आणि मनोरंजनात्मक खेळ तसेच गार्डन आहे. सगळीकडे हिरवेगार दिसते. आम्हाला तिथला मोठा धबधबा देखील बघायला मिळाला. मंदिरापासून धबधब्यापर्यंत चालत जाण्याचा मार्ग अतिशय निसर्गरम्य आहे. अधून मधून रस्त्यावर कृत्रिम प्राणी पेरलेले आहेत. धबधब्याजवळ उंचावर चढून बघण्यासाठी मचाण बांधले आहे तिथून सुरक्षित अंतरावरून आणि उंचीवरून धबधबा बघता येतो. काही जण खाली उतरून खडकांवर चढून धबधब्यांच्या जवळ किंवा मध्ये जातात पण ते धोकादायक आहे अशी सूचना पण तिथे लावली आहे. आणि ते खरेच आहे कारण आम्ही मचाणावरून धबधबा बघत असताना काही जण खाली उतरून निसरड्या खडकांवर गेले होते तेव्हा अचानक खूप पाऊस पडायला लागला आणि खडक आणखी निसरडे झाले. तिथून लवकर निघावे असे वाटत नव्हते. धबधब्याच्या पाण्याचा खळखळ आवाज आणि आजूबाजूला असलेल्या जंगलातील झाडांचा आवाज तसेच पडणारा पाऊस अशा ठिकाणाहून लवकर पावले पुन्हा गाडीकडे जाण्यास वळत नव्हती.
एकूणच ही सहल खूपच यशस्वी आणि आनंददायी झाली.
लेखक: निमिष सोनार, पुणे
दिनांक: 20 ऑगस्ट 2022
.jpeg)
Comments
Post a Comment