टू बी ऑर नॉट टू बी लिंबाची बी


"टू बी ऑर नॉट टू बी?" असा गहन प्रश्न रॉबर्ट वेलिंग्टनकर या माणसाला पडला होता म्हणे. अहो, "नावात काय आहे?" असेसुध्दा तोच म्हणाला होता ना! 😄


पण हाच प्रश्न मला पोह्यांमध्ये लिंबू पिळतांना नेहेमी पडतो. पण मला पडलेल्या प्रश्नातील बी म्हणजे लिंबाची बी बरं का! 😁

असो, तर मूळ मुद्दा असा आहे की पोह्यात लिंबू पिळण्याआधी बिया (कारल्याच्या सॉफ्ट बहिणी) निघून जाव्या म्हणून अर्धा कापलेला लिंबू जर आपण प्लेटबाहेर हलकाच दाबला तर हटकून त्यातील रस निघून वाया जातो पण बिया मात्र हट्टाने लिंबामध्येच राहतात. पण जर का डायरेक्ट प्लेटमधल्या पोह्यांवरच लिंबू हलका जरी पिळला तरी पहिल्याच प्रयत्नांत हटकून सर्वच्या सर्व बिया पोह्यांमध्ये पडतात! नुसत्या पडत नाहीत तर पोह्यांमध्ये आतमध्ये लपून दडून बसतात.चमच्याने शोध शोध केल्यावरही प्लेटमधील पोह्यांत त्या सापडत नाहीत आणि बरोबर पोहे खायला सुरुवात केली रे केली की पहिल्याच घासाला चमच्यामधून बेमालूमपणे घासात येतात आणि जिभेला कडवट करतात! 😆

हेच थोड्याफार फरकाने लिंबू सरबत बनवताना अनुभवास येते. सरबतातील पेल्यातून बियांना काढायला गेले की बिया चमच्याशी खो खो आणि कबड्डी खेळतात करतात आणि चमचात येत नाहीत. 😅

यावर अद्भुत वैज्ञानिक उपाय असा होऊ शकतो की, आपण एखाद्या ठिकाणी जमिनीवर पसरलेले किसलेले लोखंड (चुरा) किंवा बारीक खिळे जसे लोहचुंबकाद्वारे (म्हणजे सोप्या मराठीत "मॅग्नेट") ओढून घेतो तसे एखादे लिंबीचुंबक (लिंबी = लिंबाची बी) असले पाहिजे जेणेकरून ते कापलेल्या लिंबासमोर, पोह्यांसमोर किंवा सरबताच्या पेल्यासमोर धरले की बिया आपोआप ओढल्या जाऊन त्याला चिकटतील. बाय द वे, एखाद्या गाळणीतून लिंबू पिळावा असा वास्तववादी एक उपायसुद्धा यावर आहे म्हणतात. 😉

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली