दे धक्का 2 - सुखद धक्का



"दे धक्का 2" मी सिनेमागृहात जाऊन पाहिला. चित्रपट चांगला आहे. हा चित्रपट खूप विनोदी आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला हसवत राहतो. 

आधी मी 2008 साली आलेल्या पहिल्या भागाचां शेवट काय आहे त्याची आठवण करून देतो. पहिल्या भागाचा शेवट प्रेक्षकांना आणि जाधव कुटुंबीयांना एक अतिशय सुखद "धक्का" देतो. मकरंदच्या क्लायंटने टीव्हीवर घोषित केले होते की पेट्रोल वाचवणारा ऑटो पार्ट त्यांनी शोधला आहे. पण मकरंद हाच खरा त्याचा संशोधक असल्याचे पेटंटच्या कागदपत्रांवरून सिद्ध झाले कारण मकरंदच्या मित्राने त्या पार्टचे पेटंट घेऊन ठेवलेले असते. म्हणून क्लायंट एक कोटी रुपयांच्या रॉयल्टीचे पैसे घेऊन येत असल्याचे त्याचा मित्र सांगतो. चित्रपट संपल्याची नावे येतात (क्रेडिट रोलिंग) आणि संपूर्ण कुटुंब आनंदी होते. 

आता दुसऱ्या भागात (दे धक्का 2) मकरंद आणि कुटुंबीय त्या पार्टला जगभरात मागणी असल्याने रॉयल्टीच्या पैशांमुळे खूप श्रीमंत झालेले असते आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांकडून मकरंदचा सत्कार होणार असतो. चित्रपटाच्या पहिल्या पाच मिनिटातच पूर्ण कुटुंबीय लंडनला पोहोचते. लंडनला एका आलिशान हॉटेलमध्ये सुरुवातीला एक धमाल प्रसंग घडतो. 

नंतर विजयवाडा नावाचा एक माणूस (प्रवीण तरडे) जो नीरज डेढीयाच्या (विद्याधर जोशी) हाताखाली काम करत असतो, तो एक "पॅटर्न" शोधून या मकरंद आणि त्याच्या कुटुंबीयांना बदनाम करून फसवतो. सत्कार काही दिवसांवर असतो आणि त्यापूर्वी आता ह्या कुटुंबाला आपले निर्दोषत्व सिद्ध करून निरजला पण पकडायचे पण असते. सर्व कुटुंबियांचे मोबाईल फोन हा नीरज त्यांना फसवण्याआधी शिताफीने आपल्याकडे ठेवून घेण्यात यशस्वी झालेला असतो. या नीरजची वेशभूषा म्हणजे विजय माल्या सारखी आहे. या चित्रपटात आणखी एक गमतीदार व्हीलन आहे तो म्हणजे स्वतः महेश मांजरेकर!

या कुटुंबीयांवर नंतर अशी परिस्थिती ओढवते की त्यांच्याकडे पैसेसुद्धा राहत नाहीत. मग पहिल्या भागासारखीच एक खटारा गाडी घेऊन हे पूर्ण कुटुंब इंग्लंडभर पोलिसांच्या भीतीने निरज च्या शोधार्थ जात असताना धुमाकूळ घालतात. 

यात दोन साईड स्टोरी आहेत. सनी देवल (देओल नाही) आणि बॉबी देवल या नाशिकच्या जुडवा भावांची कथा आहे (एक वकील आणि दुसरा बॉबी म्हणजे लंडनचा पोलीस आहे) आणि सूर्यभान जाधव (शिवाजी साटम) आणि इंग्लंडची महाराणी (?) यांची प्रेमकहणी पण आहे. त्यावेळेस हंगामा मधील परेश रावल आणि शोमा आनंदच्या जोडीची आठवण येते. राधेश्याम तिवारी आणि अंजली. 

आपल्या नेहमीच्या बोलण्याच्या स्टाईलने मकरंदने जवळपास संपूर्ण चित्रपट आपल्या खांद्यावर पेलला आहे. इतर सर्व कलाकारांनाही चित्रपटात सारखाच स्क्रीन टाईम आहे आणि सर्वांनी कामे चांगली केली आहे. 

फक्त मागच्या चित्रपटातील सायली पात्र साकारणारी गौरी वैद्य या चित्रपटात नाही त्या ऐवजी गौरी इंगवले आहे. (गौरी वैद्य ही आता अभिनय क्षेत्रात नाही असे महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते कारण तिने इंजिनियरिंग करून क्षेत्र बदलले) 

गौरी इंगवले हिने अतिशय बहारदार नृत्य करून चित्रपटात एक वेगळीच एनर्जी टाकली आहे. विशेषतः वेस्टर्न आणि लावणी फ्यूजन आलेले "नजर कट्यार" हे गाणे तर खूपच धमाल आहे. गाण्याची चाल, संगीत आणि मृत्य सर्वच उत्तम. त्या मानाने शेवटचे गाणे देह पेटू दे हे फक्त आणि फक्त नृत्यासाठी लक्षात रहाते. त्या गाण्याचे असे लक्षात राहण्यासारखे बोल नाहीत.

युट्युबवर या चित्रपटाचे बरेचसे परीक्षण मी पाहिले पण त्यात या चित्रपटाबद्दल एवढे चांगले सांगितलेले नाही पण त्यावर विश्वास ठेवू नका. युट्युबवर असलेल्या अनेक फिल्म क्रिटिक नी या चित्रपटात अनेक गोष्टी लॉजिकल नाहीत असे सांगितले आहे. जसे अचानक किडनॅप झाल्यानंतर सगळे जाधव कुटुंबीय अचानक नाचायला लागतात म्हणे (पण तसे नाही आहे, अचानक नाही नाचत ते! कीडनॅप झालेला मकरंद त्या पाकिस्तानी व्हीलन समोर बॉलिवूडच्या व्हीलनचा विषय काढतो आणि बॉलीवूडचे व्हीलन खूप डेंजरस असतात जसे की गब्बर, मोगांबो आणि हा पाकिस्तानी व्हीलन खोडरब्बर सारखा आहे असे चिडवतो म्हणून तो ते आव्हान स्विकारतो आणि शोले मधल्या गब्बर प्रमाणे सगळ्यांना नाचायला लावतो) तिथे सगळ्यांकडे नाचण्यासाठी वेगवेगळे कपडे कुठून येतात वगैरे वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत (त्या विलननेच कपड्यांची व्यवस्था केली असावी) परंतु मला सांगा चित्रपट जेव्हा विनोदी असतो तेव्हा त्यात अतिशयोक्ती असावीच लागते नाहीतर तो विनोद कसला? प्रियदर्शनचेचां हेरा फेरी, तसेच गोलमाल सिरीज, धमाल सिरीज, ऑल द बेस्ट, डेव्हिड धवनचे गोविंदावाले चित्रपट वगैरे असे अनेक चित्रपट आपण बघितले असतील तर त्यात तुम्हाला लॉजिक नसलेल्या भरपूर अतिशयोक्तीपूर्ण गोष्टी सापडतील. परंतु त्यामुळेच तर आपल्याला मजा येते आणि हसू येते. विसंगतीतूनच तर विनोद निर्माण होतो. 

प्रत्येक विनोदाची एक जातकुळी असते. मला माहिती आहे त्यानुसार काही विनोदाचे प्रकार देत आहे.

जसे slapstick विनोद म्हणजे अतिशयोक्ती पूर्ण शारीरिक हावभाव केलेला विनोद जसे चार्ली चॅप्लिन करायचा, मिस्टर बिन करतो.

Situational comedy - प्रासंगिक विनोद (विशिष्ट प्रसंग आणि त्यातून आपोआप निर्माण होणारा विनोद)

Romcom (Romantic Comedy), 

Comedy of errors (म्हणजे व्यक्ती बदल किंवा एका व्यक्तीला दुसरा व्यक्ती समजल्याने उडणारी धमाल), 

अतिशयक्तीपूर्ण शब्द किंवा प्रसंग,

Dark comedy (जीवनातील गंभीर विषयांवर केलेले विनोद जसे मृत्यू उदाहरणार्थ ओम पुरी चा जाने भी दो यारो, कमाल हसनचां पुष्पक मध्ये प्रेताची केलेली गंमत)

Parody (विडंबन, नक्कल), Spoof, शाब्दिक विनोद वगैरे वगैरे.

दे धक्का 2 मध्ये डार्क, situational, शाब्दिक, प्रासंगिक, comedy of errors, अतिशयक्तीपूर्ण विनोद असे सगळे प्रकार मिक्स आहेत.

मकरंद अनासपुरे चे अतरंगी डायलॉग, मकरंद आणि शिवाजी साटम यांची जुगलबंदी डायलॉग बाजी, सिद्धार्थ जाधवचा क्लिपटोमेनिया म्हणजे चोरी करण्याचा आजार, हेमल्या नावाचा नाच्या (संजय खापरे यांनी साकारलेले हे पात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध आहे पण तरीही मजा येते. दगडी चाळचां पहिला भाग आठवतो? काय सुपर व्हीलन साकारला आहे त्यांनी!), भरपूर अंडी खाणारा मकरंदचां मुलगा किसना पैलवान (सक्षम कुलकर्णी) हे सगळे खूप खूप मजा आणतात.

मराठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांत जाऊन मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत. मी सुद्धा शिवराज अष्टकचा प्रत्येक चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतो. दे धक्का 2 हा संपूर्ण इंग्लंड मध्ये चित्रीकरण झालेला चित्रपट आहे. मराठी फिल्म मेकर्स असे वेगवेगळे प्रयोग करत असताना आपण त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे.


Comments

  1. दे धक्का चे तिसऱ्या आठवड्यात पदार्पण झाले. प्रेक्षकांना चित्रपट आवडतो आहे याची ही पावती. इतर अनेक नवीन मराठी हिंदी चित्रपट रिलीज झाले असताना सुद्धा हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यात टिकून आहे. या चित्रपटाबद्दल काहींनी निगेटिव्ह पब्लिसिटी केली होती पण त्याचा परिणाम झाला नाही हे बरे झाले.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली