कथा- तेजस्विनी (भाग 1 जलयुद्ध)






अतिप्राचीन काळी भारतात अनेक राज्ये होती. काही स्वतंत्र तर काही एखाद्या राज्याच्या अंकित. काही आकाराने छोटी तर काही मोठी. काहींवर निसर्गाने कृपा केलेली तर काहींवर अवकृपा. सोनपूर असेच एक राज्य. अनेक राज्यांच्या तुलनेत असलेले सोनपूरचे जे भौगोलिक स्थान होते त्यानुसार त्या राज्याला नदीचा लाभ मिळालाच नव्हता. पावसाचे पाणी पडल्यानंतर पर्वतांवरून जेवढे पाणी खाली वाहून त्याचा साठा व्हायचा तेवढाच काय तो दिलासा! त्या राज्याला शेतीसाठी आणि एकूणच वापरायच्या आणि पिण्याच्या केवळ अनियमित अशा पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागे. सोनपूर राज्याच्या सीमेपलीकडे अनेक मोठ्या पर्वतरांगा होत्या. त्यापलीकडे सुदिशा नावाची प्रचंड रुंद पात्राची नदी वाहात होती. पण ती नदी, लगतच्या विक्रालभूमी या राज्याच्या सीमेअंतर्गत होती. त्या नदीचा उगम विक्रालभूमीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या एका पर्वतावरून होत होता. तो पर्वत हिमखंड म्हणून ओळखला जाई कारण तिथे हिवाळ्यात तापमान खूप कमी होऊन बर्फ पडायचा आणि नंतर तापमान वाढल्यावर तो मुबलक बर्फ वितळून भरपूर पाणी वाहायला लागायचे. तीच सुदीशा नदी!


आंतरराज्यीय शेजारधर्मानुसार नैसर्गिक साधनसंपत्ती एकमेकांसोबत खरे तर वाटून घ्यायला हवी. पण विक्रालभूमीचा राजा सम्राट दुदूंभी याला ते मान्य नव्हते. सोनपूरचा राजा सम्राट शत्रूंजय याने हरप्रकारे मैत्रीपूर्ण पद्धतीने अनेकदा आपले दूत पाठवून दुदूंभीला पाण्यासाठी विनवण्या केल्या. पण, भरपूर सुवर्णमुद्रांच्या बदल्यात नदीचे पाणी पर्वतातील कडेकपारीतून, खिंडीतून आणि कच्च्या रस्त्याद्वारे बैलगाड्या, रथ आणि इतर प्राण्यांच्या पाठीवर रांजण आणि मडके भरून नेण्यास त्याने परवानगी दिली होती. दुदूंभी हा असुर वृत्तीचा राजा होता. त्याचे पूर्वज असुर होते. दुदूंभीच्या अंकित असलेली राज्ये आणि इतर स्वतंत्र पण दुदूंभीची मित्रराज्ये या सर्व राज्यातुन सुदिशा नदी वहात होती. इच्छा असूनही त्यापैकी काही राजे सोनपूरला पाण्याची मदत करू शकत नव्हते.


सोनपूरच्या जमिनीत जास्त सोने नव्हते. पाण्याच्या बदल्यात सुवर्ण दिले नाही तर मग धान्य आणि फळांची मागणी दुदूंभी करू लागला. पण जास्त प्रमाणात तेही पिकत नसल्याने शत्रूंजयची कोंडी होऊ लागली होती. अन्यथा पाण्याच्या बदल्यात सोनपूरमधील तारुण्यात पदार्पण केलेले जे कुणी अंगापिंडाने मजबूत आणि शक्तिमान युवक असतील त्यांना विक्रालभूमीच्या सैन्यासाठी कायमचे दान आणि सोनपूरमधील तारुण्यात पदार्पण केलेया सुंदर युवतींना निवडून दुदूंभीसाठी दासी म्हणून मागणी होऊ लागली. ती शत्रूंजयने नाकारली याचा राग येऊन रात्री अपरात्री विक्रालभूमीचे सैनिक येऊन सोनपूरमधील सुंदर स्त्रियांना बळजबरीने उचलून नेऊ लागले. त्यांचा अनेकदा बंदोबस्त सोनपुरचा सेनापती सुबाहू याने केला. सुबाहूच्या शौर्याचे कारनामे सगळीकडे प्रसिद्ध होते. त्याला सगळेजण वचकून असत. 


या सोनपूरला निसर्गाने मात्र एक वेगळेच वरदान दिले होते. तेथील जमिनीत वज्रधातू मुबलक सापडायचा. वज्रधातूचा वापर करून अनेक प्रकारची मजबूत शस्त्रे, चिलखत, शिरस्त्राण वगैरे बनवता यायची. पाण्याच्या बदल्यात युवक आणि युवती द्यायचे नसतील, धान्य आणि फळे द्यायचे नसतील आणि सुवर्ण मुद्रा द्यायच्या नसतील तर शेवटी वज्रधातू द्यावा लागायचा. 


पूर्वी दोनदा दुदूंभी याने त्याच्या अंकित असलेल्या एका मित्र राज्याशी संधान साधून सोनपूरवर आक्रमण केले होते पण सोनपूरच्या सैन्यापुढे त्यांचा निभाव लागला नव्हता आणि त्यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून त्यांचा डोळा या वज्रधातूवर पडला आणि वारंवार पाण्याच्या बदल्यात वज्रधातूची मागणी होऊ लागली. त्यामुळे एक प्रकारे दुदूंभीचे सैन्यसुद्धा वज्रधातूने बनवलेले साहित्य वापरू लागले. दुदूंभी ज्यादाचे साहित्य मित्र देशांना आणि आपल्या अंकित देशांना देऊन त्या बदल्यात विविध मागण्या करू लागला. वज्रधातूचा हा ओघ कुठेतरी थांबवायला हवा होता असा एकंदरीत सूर सोनपूर राज्याच्या मंत्रिमंडळातील विविध बैठकीत निघू लागला होता. 


शेजारील विक्रालभूमी सहित अनेक राज्यातील तसेच सातासमुद्रापार असलेल्या अनेक देशांतील युवक युवती सोनपूरचे अमात्य आणि राजगुरू बुद्धीसार यांचेकडे विविध विषयांचे शिक्षण घ्यायला यायचे. पण सोनपूरने त्यांच्यात कधीही भेदभाव केला नाही. शिक्षणाचा सर्वांना समान अधिकार मिळायला हवा असे सोनपूरचे धोरण होते.


एकदा शेजारील मिस्त्र देशात पडलेल्या दुष्काळात आई वडील, घरदार आणि इतर सर्व कुटुंबियांचे आधारछत्र हरवलेल्या एका कुटुंबातील एक मुलगी दिमित्रा आणि तिचा भाऊ अदेनिस हे छुप्या मार्गाने शिक्षण आणि नोकरीसाठी भारतातील सोनपूर राज्याच्या सीमेवर येत होते. सोनपूर राज्याबद्दल चांगल्या गोष्टी ते ऐकून होते. सोनपूरची किर्ती अनेक देशांत पोचली होती. खरे मिस्त्र देशात ते कुटुंब उदरनिर्वाहासाठी ग्रीक देशातून आले होते. 


दिमित्रा आणि अदेनिस सोनपूरच्या सीमेवर असतांना विक्रालभूमीच्या सैनिकांच्या तावडीत सापडले. दिमित्राला अप्रतिम सौंदर्य लाभले होते, त्यातच ती विदेशी होती. संध्याकाळ झाली होती. अंधार पडत चालला होता. तो भाग म्हणजे सीमेवरचे एक जंगल होते. कच्ची पायवाट होती. अनायसे सेनापती खडकदंभ आणि त्याचे तीन सेनापती यांचा डोळा तिच्यावर पडला आणि खिळला. अदेनिसच्या हे लक्षात यायला वेळ लागला नाही. दिमित्राचा हात धरून ओढत ओढतच तिला तो वेगाने वाट दिसेल तिकडे पळायला विनवू लागला. दोघेही जिवाच्या आकांताने झाडाझुडपांतून वाट काढत पळू लागले. दोघांच्या मागे थोड्या थोड्या अंतराने चार घोडेस्वार पळू लागले.


सेनापती सुबाहू यांचे गुप्तचर यंत्रणेचे जाळे ठिकठिकाणी होते. सेनापती आणि गुप्तचर विभाग अशा दोन्ही आघाड्या ते समर्थपणे सांभाळत होते. त्यांना ही खबर लागताच त्यांनी जवळपास घोड्यावरून पहारा देत असलेले चार सैनिक पाठवले. त्यात सम्राट शत्रूंजय यांची सुपुत्री तेजस्विनी ही सुद्धा सामील होती. तिला आज पहिल्यांदाच अशा प्रत्यक्ष मोहिमेवर सुबाहू यांनी पाठवले. सुबाहूचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता आणि तितकाच विश्वास सम्राट शत्रूंजय यांचा सुबाहूवर होता. म्हणूनच त्यांनी तिला सुबाहूकडे बिनदिक्कत सोपवले होते.


सम्राट शत्रूंजय यांच्या दोन महाराण्या निरावती, फुलवंती यापैकी निरावतीची मुलगी तेजस्विनी ही भगवान सूर्याच्या कृपेने शत्रूंजय यांना प्राप्त झाली होती. निरावती गर्भवती असताना तिला सूर्यदेवाने स्वप्नात येऊन ही मुलगी पराक्रमी आणि बुद्धिमान निघेल असे सांगितले होते आणि शत्रूंजय व निरावती यांच्या आतापर्यंतच्या सूर्यभक्तीचे फळ म्हणून सूर्यदेवाने हे वरदान दिलेले होते. ही मुलगी सोनपूरचे भविष्य बदलेल आणि उजळवेल असेही सूर्यदेवांनी सूचित केले होते. जन्मतः तिचे तेज आणि सौंदर्य दिसून येत होते. याचमुळे तिचें नाव तेजस्विनी ठेवण्यात आले होते.


तेजस्विनी विक्रालभूमीचा सेनापती खडकदंभ याच्या सैन्यातील त्या चार घोडेस्वरांचा पाठलाग करू लागली. तिच्या मागे मदतीला इतर तीन पुरुष सैनिक घोड्यावरून येत होते. संध्याकाळ झाली होती. घोड्यांच्या खोगीरांना दोन्ही बाजूनी अडकवलेल्या मशाली आता पेटवण्याची वेळ झाली होती. विक्रालभूमीच्या घोडेस्वारांनी आधीच मशाली पेटवलेल्या होत्या. तेजस्विनीच्या कमरेला अडकवलेल्या वज्रधातूच्या पट्यात एक काचेची कुपी होती. त्यात कायम एक अग्निदिवा पेटलेला असायचा. तेजस्विनी लहान असतांना सुर्यदेवाने आपला सहकारी अग्निदेव याचेतर्फे खास तेजस्विनीसाठी हा अग्निदिवा भेट दिला होता. सम्राट शत्रूंजय एकदा राज्यावरील संकटे दूर व्हावीत यासाठी महासूर्य यज्ञ करत होता तेव्हा सूर्याने ही भेट दिली होती. हा अग्निदिवा लहानपणी एकदा तेजस्विनीच्या हातून पेटवल्यावर तो कधीही विझला नव्हता आणि विझणार नव्हता असे तिला वरदान होते. 


त्या काचेच्या कुपीत आपली तर्जनी घालून तेजस्विनीने एक ज्वाला तर्जनीवर पकडली आणि उजवीकडे आणि डावीकडे असलेल्या मशाली पेटवल्या. त्याच ज्वाळा तर्जनीद्वारे तिने मागे बघून उरलेल्या तीन घोडेस्वारांच्या दिशेने मशालींवर फेकल्या. सर्व मशाली धगधगत पेटू लागल्या. हा पाठलाग पर्वतराजीतील एका खिंडीतून सीमेवरील अंधाऱ्या जंगलात शिरला. दिमित्रा आणि अदेनिस पुढे, त्यांच्या मागे विक्रालभूमीचे घोडेस्वार आणि त्यांच्या मागे तेजस्विनी आणि तिच्या मागे तीन घोडेस्वार असा थरारक पाठलाग सुरु झाला. दोन्ही राज्यांच्या सीमेलगत असलेल्या या जंगलातील कच्च्या पायवाटेवरून हा पाठलाग सुरु होता. ऑलिम्पिकचे जनक ग्रीक लोक मुळातच खेळप्रिय असल्याने तसेच दिमित्रा आणि अदेनिस हे दोघेजण वेगवान धावणे आणि इतर अनेक खेळांमध्ये तरबेज होते. असे असल्याने ते लवकर घोडेस्वारांच्या हाती लागत नव्हते. तेजस्विनी आज प्रथमच या निमित्ताने आपल्या राज्यही हद्द ओलांडून शत्रू राज्यात प्रवेश करत होती. तेजस्विनीला उजव्या बाजूला असलेल्या अनेकविध झाडांच्या मधील फटींमधून लख्ख चंद्रप्रकाशात सुदिशा नदीचे खळाळते पाणी दिसू लागले. तेजस्विनी त्या नदीच्या जणू प्रेमातच पडली. भान हरखून ती त्या नदीकडे बघत होती. नदीच्या बाजूला पर्वतरांगा मोठ्या दिमाखाने उभ्या होत्या. अनेक लहानमोठे पर्वत, खिंडी, टेकड्या, पठारे, काही ठिकाणी गुफा, कच्चे पक्के रस्ते अशी विविधता डोळे फाडून बघण्यासारखी होती. त्याकडे बघून तिच्या मनात एक अप्रतिम कल्पना चमकून गेली. जणू काही भर पावसात अंधारात चाचपडत असलेल्या पथिकाला अचानक वीज चमकून पुढचा मार्ग स्पष्ट दिसावा! त्या काप्लेनेला प्रत्यक्षात कसे आणता येईल याची मनात जुळवाजुळव सुरु असतांनाच वरून खाली रस्त्यावर मधोमध लटकलेल्या एका झाडाच्या फांदीला ती धडकली आणि घोड्यावरून मागच्या बाजूला कलंडून उलटी खाली डोक्यावर पडणार एवढ्यात सावरून तिने दोन्ही पायांवर जमिनीवर उडी घेतली. हे बघून इतर तिघेजण आपापल्या घोड्यांचा वेग कमी करून तिच्या मदतीला थांबू बघत होते पण तिने ओरडून आणि हात हलवून खुणेने त्यांना तसे करण्यापासून रोखले आणि पुढे जाण्यास सांगितले. ते त्याप्रमाणे वेगाने जाऊ लागले. तेजस्विनी पडल्याने तिच्या घोड्याने वेग कमी केला आणि आपल्या मालकिणीकडे मागे बघितले. पण तिने खुणेने तिने घोड्याला वेग कायम ठेवायला सांगितले त्याप्रमाणे तो पुन्हा मालकिणीविना धावू लागला. 


(क्रमशः)

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली