इजिप्तायन
इजिप्तायन या मीना प्रभू यांच्या प्रवासवर्णन पुस्तकातील उतारा:
एकटं फिरण्यातली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे एकट्याने जेवणं. वैताग नुसता. जिथं तोंडी लावायला गप्पा नाहीत तर कसलं भोजन?
सार्वजनिक उपाहारगृहात एकटंच बसून खाताना कुणीही केविलवाणं दिसतं. जेवणारा अन्नछत्रात फुकट जेवल्यासारखा खाली मुंडी घालून खात असतो. वर पाहिलंच तर बाजूच्यांच्या नजरा चुकवतो. बाकीचे लोक आपल्या जेवणावर, आपण किती चरतो त्यावर नजर ठेवून आहेतसं वाटतं. निदान मलातरी तसं वाटतं. मग आपलंही लक्ष आपल्याकडे जातं. आपण फार खातो की काय, काटे चमचे चुकताहेत का, तोंडाची मचमच तर फार होत नाही ना, असले प्रश्न छळायला लागतात आणि खाणंच नकोसं वाटून कधी एकदा तिथून निघतोसं होतं.
त्यातून या चौतारांकित हॉटेलचं भोजनालय अत्यंत रुक्ष होतं. केवढंतरी मोठं. दोनशे लोक संहज बसायची सोय. पण रात्री आठाच्या सुमारालाही तिथं मी एकटी. सगळे वेटर्स आणि मॅनेजर माझ्या भोवती घोटाळत होते. प्राणिसंग्रहालयात वाघसिंह खात असताना आपण पाहावेत तसे. जेवणही अगदी भिकार. उत्तम अरबी जेवणाची चव मी वाफाकडे घेतली होती. तितक्या तोलाचं नको पण या जेवणाला काहीतरी चव असावी.
भारतासारखी चटकमटक चवींची चंगळ जगात कुठेही नाही. खाऱ्या काय, गोड्या काय, सामिष वा निरामिष, खाण्याच्या इतक्या परी दुसरीकडे नाहीत. जेवणाचे, मधल्या वेळच्या खाण्याचे, उपवासाचे, फराळाचे, सहलींचे, ओले वा कोरडे किती किती प्रकार! उपवासाच्या पदार्थांची नुसती नावं ऐकून वजन वाढावं.
नावं लिहिता लिहिता तोंडाला पाणी
फोडणारे पदार्थ. त्यांत फोडणी हा खास स्वादवर्धी खमंग प्रकार म्हणजे भारतीय पाकशास्त्राच्या मर्मबंधातली ठेव!
पृथ्वीवरच्या दुसऱ्या कुठल्याही पाककलेला ही देणगी नाही. पदार्थ शिजवताना सुरवातीला किंवा शेवटी हा सणसणीत साज चढवायचा. जिभेवर अमृताचा शिडकावा करणारा पण त्या आधी नाकावाटे आत जाऊन खवैयाचा कब्जा घेणारा, आगामी मेजवानीची चाहूल देणारा जिनं शोधला त्या अन्नपूर्णेला शतदा वंदन.
शिवाय घरोघरी त्याच पदार्थांची चव वेगळी. एकाच प्रकारची बटाट्याची भाजी चार घरी अगदी वेगळी लागेल. हे रुचिवैविध्य खरोखर दुर्लभ. त्याला नाकारण्याचं पाप कधी घडू नये.
- मीना प्रभु ("इजिप्तायन" या पुस्तकातून)
वरील उतारा मीना प्रभु यांच्या "इजिप्तायन" या पुस्तकातून घेतला आहे. इजिप्तला जाण्याआधी त्यांनी इस्राएल आणि जॉर्डन असे दोन देश पाहिले. त्यापैकी वरील उतारा हा जॉर्डन देशातील अम्मान येथील वर्णन करतांना त्यांनी लिहिलेला आहे. वरील तिन्ही देशांत लेखिका दक्षिण अमेरिकेप्रमाणे पूर्णपणे एकट्यानेच फिरल्या. अत्यंत माहितीपूर्ण आणि वाचकाला बांधून ठेवणाऱ्या उच्च दर्जाच्या साहित्याने नटलेल्या त्यांच्या प्रवासवर्णन पुस्तकांनी मराठी साहित्यात अत्यंत मोलाची भर टाकली आहे. वाचकाला हातात हात धरून त्या प्रत्येक देश फिरवून आणतात असे त्यांच्या प्रत्येक वाचकाचे म्हणणे आहे.
- निमिष सोनार
Comments
Post a Comment