पुण्यातील दिघी हिल्स आणि खंडोबा माळ
पुण्यातील दिघी गावी असलेल्या दिघी हिल्स आणि लोहगांव येथील खंडोबा माळ या दोन्ही टेकड्या मी 2021 मध्ये अनुक्रमे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बघितल्या. दोन्ही ठिकाणे एकदिवसीय सहलीसाठी चांगली आहेत. दिघी हिल्सवर दत्त मंदिर आणि खंडोबा माळ टेकडीवर खंडोबाचे मंदिर आहे. एकाच दिवसात दोन्ही ठिकाणे सुद्धा बघून होऊ शकतात. दोन्ही ठिकाणांचे एकमेकांपासून अंतर अंदाजे दहा किमी आहे. दिघी हिल्सपेक्षा खंडोबा माळ येथे व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या आहेत. मला जाणवले की पर्यटकांमध्ये दिघी हिल्स जास्त लोकप्रिय आहे. दिघी हिल्सच्या पायथ्याशी पार्किंगला भरपूर जागा आहे. तेवढी जागा खंडोबा माळ येथे नाही.
दुपारच्या वेळेस जात असाल तर प्यायला भरपूर पाणी आणि ताक सोबत न्या. चढतांना अधूनमधून विसावा घेत बसता येतं. चढतांना दम लागत असेल तर थोडा विसावा घेत घेतच जावे. ऊन जरी असलं तरीही अनेक ठिकाणी झाडे आणि छोट्या टेकड्यांचे आडोसे असल्याने बसायला सावली सहज सापडते. तिथून अनेक पर्वत आणि पुणे शहराच्या काही भागाचे विहंगम दृश्य दिसते. सोबत जेवणाचा डबा नेला तर फारच उत्तम. अनेक ठिकाणी बसायला ऐसपैस जागा असून निसर्गाच्या सानिध्यात आपण डबा खाण्याचा आनंद घेऊ शकतो.सोबत लहान मुले असतील तर त्यांच्यासोबत कायम एक मोठी व्यक्ती असली पाहिजे कारण चढतांना आणि उतरताना जागा निसरडी आहे. पटकन पाय घसरून आपण पडू शकतो. सेल्फी आणि फोटोग्राफी करायला तर ही फारच छान ठिकाणं आहेत. सगळ्यात वरून खाली बघितले असता आपण माणसं ह्या अमर्याद निसर्गात किती क्षुल्लक आहोत ही जाणीव होते. दोन्ही ठिकाणी आपल्या मनाला खूप शांतता मिळते. सकाळी सकाळी गेल्यास खूप चांगले. चढतांना एखादी एकांत जागा शोधून ध्यान करत बसू शकता.
.jpeg)
Comments
Post a Comment