खायच्या शब्दांची कोशिंबीर !
काही काही खाद्यपदार्थांची नावं म्हणजे "खायची" गोष्ट नव्हे!
हिंदीत प्याज आणि प्यास चा जसा जवळचा संबंध नसतो, तसा मराठीत कांदा आणि वांधा (समस्या) चा पण संबंध नसतो पण, कांदा आणि रांधा (स्वयंपाक बनवणे) संबंध असतो.
काही वेळेस अक्कल कमी असली की त्या व्यक्तीला अकलेचा कांदा म्हटले जाते. म्हणूनच "रंगीला" मध्ये आमीर खान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वेटरला "जा, कांदा काटके ला!", "एसी ईधर घुमा ना!" असे म्हणतो.
पुण्यात आल्यानंतर उगाच मला "लसूण" म्हटले की ससून हॉस्पिटल का आठवते?
मसाला गरम असतो म्हणून काय झालं, त्या शब्दात शिवी पण टाकावी ?
मीठ खारट असले तरी, ते खातांना हिंदीत "आ" वासला की ते गोड बनते (मीठ+आ = मीठा).
मीठात "ई" टाकला की मराठीत आलिंगन (मिठी) होते आणि हिंदीत "गोड" बनते.
मिठाई हा हिंदी शब्द असूनही तो अस्सल मराठी शब्द म्हणून वापरला जातो. मिठाई म्हणजे जसे "गोडपणा", तसे ठंडाई म्हणजे थंडपणा (स्वभावातील नाही, तापमानातील!). मराठीत मिठाईला शब्द काय आहे, कुणाला माहीत आहे का? "गोडधोड" बरोबर ना?
आणखी काही हिंदी मराठी उदाहरणे- चढाई, लढाई, गोलाई, मनाई, बुराई, अच्छाई.
"आस" म्हणजे हिंदीत आशा! (वह आस लगाये बैठा है), पण मराठीत "आस" म्हणजे गरमपणाशी जवळीक आल्यानंतरची फिलिंग असा अर्थ होतो.
गॅसच्या ज्योतीची लागते ती आस किंवा "शेक"!
हेच इंग्रजीत गेले की मिल्क "शेक" बनते आणि ऑफिसात "हँडशेक"!
हाच शेक आणि ओटी एकत्र केले की पुनः मराठीतील "शेकोटी" बनते!
पहा झाली की नाही शाब्दिक "कोटी"?
जास्त पाणी असलेली खिचडी किंवा भात हा "आसट" होतो आणि पाणी कमी झाले की त्याला आपण "आटले" म्हणतो.
कुठे ती गंगेची पवित्र फिलिंग देणारी "गंगाफळ" भाजी (खानदेशकडे म्हणतात) जी श्रावणात केली जाते आणि कुठे तो "लाल भोपळा"? (पुण्याकडे म्हणतात). पण दोन्ही एकच! लाल भोपळ्याचा आणखी एक अवतार बाजारात ठिकठिकाणी ठाण मांडून बसतो, ज्याला आपण लाल भोपळा समजण्याची चूक करतो. मला वाटले होते त्याचे नाव नारिंगी भोपळा, जुळा भोपळा, फसवा भोपळा असावे पण त्याला "चक्री" म्हणतात. "वक्री" कुठले!
कुठे तो छानसा दुधी भोपळा आणि कुठे ते हिंदीतले "लौकी"? भोपळ्याच्या "लौकीकाला" साजेसे नाही वाटत!
खाण्याची भाजी आठवण्यापेक्षा अवेन्जर्स मधला तो लोकी आठवतो.
कुठे तो रवा आणि कुठे ती "सुजी"? गाल सुजल्यासारखे फिलिंग येते!
रवा चा भाऊ खवा! कुणी कुणी बासुंदीमध्ये खवा टाकून त्यालाच रबडी म्हणण्याचा अपराध करतात.
बासुंदी असे बासुरी सारखे इतके सुंदर नाव असलेली स्त्री आणखी जास्त आटल्यावर (म्हणजे तिच्यातले प्रेम आटल्यावर नव्हे बरं!) खरे तर खूप चविष्ट लागते पण नावाने मात्र ती खडबडीत "रबडी" का बनते? पण सावध रहा बरे, बासुंदी सारखा अजून एक शब्द आहे, सुंदोपसुंदी. त्याचा अर्थ तुम्हीच शोधा आता. मी नाही सांगत. नुकताच मराठी भाषा गौरव दिन येऊन गेला ना! त्यानिमित्त त्याचा अर्थ शोधायची जबाबदारी तुमची!
कुठे ती भजी आणि कुठे ते पकौडे? कुणीतरी "कोडे" मारतंय असे वाटते!
कोडे (हिंदी अर्थ फटकारे) आणि मराठीत कोडे म्हणजे पझल puzzle किंवा रिडल riddle.
आता कोडे सोडवायचे का पकौडे खायचे, सांगा बरं तुम्हीच?
भाजी आणि भजी यात फक्त एका "काना" चा फरक आहे, का? याचे कारण बहुदा असे असावे की, अनेक भाज्या घालून भजी बनवता येतात.
गिलक्याची भजी, मिरच्यांची भजी, पालकाची भजी वगैरे.
"पाल्य" आपापल्या घरून कधी कधी शाळेत घेऊन जातात त्या "पालकांची" भजी नव्हे बरे!
भुईमुगाची "शेंग" म्हटले की चीन मध्ये गेल्यासारखे वाटते. शांग ची, शेंग ची! ची ची ची !!
पुणे परिसरात "गिलके" हा शब्द कुणालाच माहित नाही. ते त्याला "घोसाळे" म्हणतात. मात्र गिलक्याचा भाऊ दोडका सगळीकडे सारखाच ओळखला जातो. दोडका कुठला!!
घोसाळे हा शब्द ऐकला की "रवी" वापरून "ताक" घुसळल्यासारखे वाटते!
रवी म्हणजे माहिती नाही? अहो, घुसळणी! सूर्य नव्हे!!
मराठीतले "ताक" हिंदीत छाछ बनते! कुणीतरी शिंक दिल्यासारखे वाटते. "छाछ"!!
लेडीज फिंगर म्हणजे "भेंडी"! बरेच जण उगाच या शब्दाला असभ्य म्हणतात.
भात हिंदीत "चावल" बनतो आणि खातांना काहीतरी चावेल की काय असे वाटत रहाते. आत्ता कळलं, जुही नेहमी हिंदीतला भात खात असावी म्हणून तिचे आडनाव तसे बनले असावे!
एखादा पैलवान लढायच्या पवित्र्यात आला की त्याच्या "शिरा" ताणल्या जातात, म्हणून त्याची बायको तो जिंकल्यावर घरी त्याच्यासाठी "शिरा" बनवत असावी का?
वाटाणा, शेंगदाणा या दोघांशी मंत्री करायची होती पण का कोण जाणे, त्याला "चवळी" असे स्त्रीलिंगी नाव कुणीतरी देऊन टाकले आणि इंग्रजीत तर तिला "काळ्या डोळ्यांचा वाटाणा" बनवून टाकलं.
उस्सळ, मिस्सळ यांचे नाव ऐकल्याबरोबर तोंडाला पाणी सुटून जीभ सळसळ व्हायला लागते.
आणि पावाची महती काय वर्णावी? वडा पाव असो की मिसळ पाव असो की पाव वडा असो! अनेक खाद्यपदार्थांना हा पाव "पावला" आहे!
पाव म्हणजे किलोचा चौथा भाग, पाव म्हणजे बटाटेवड्यासोबतचा पाव आणि पाव म्हणजे "प्रसन्न हो"!!
देवा मला पाव!
तर असे हे चविष्ट खाद्यपदार्थ आपल्याला मिळाले की आपली जीभ पावते म्हणजे "प्रसन्न होते!"
"कडू कारले" हे हिंदीत "कडवे करेले" बनतात! अक्षरे जास्त वेगवेगळी नाहीत! थोड्या फार फरकाने सारखीच आहेत! असो! कडू असल्याने कुणी जास्त त्याला वेगवेगळी नावे देण्याच्या फंदात पडले नसावे!
कोथिंबीरीला हिंदीतून "धनिया" म्हणतात आणि ग्रामीण मराठीत नवऱ्याला बोलावतांना "धनी, या!" असे म्हणतात!
कोथिंबीर शब्दामध्ये थोडा बदल केला तर लगेच कोशिंबीर बनते. काहीजण कोशिंबीरीतसुद्धा कोथिंबीर टाकतात.
"रायता" हा कोशिंबीरीला हिंदी शब्द आहे, पण मराठीत लोणच्याच्या रस्याला "रायता" म्हणतात. निदान आम्ही मूळचे खानदेशकडचे लोक तरी तसे म्हणतो. इतरांचे माहीत नाही!
आणि पुरीमध्ये मसालेदार पाणी टाकले की आपण पाणी पुरी म्हणतो, पण उत्तरेत त्याला "गोल गप्पे" का म्हणतात? खातांना तोंड पूर्ण "गप्प" होते म्हणून?
एवढी चविष्ट कोशिंबीर, पण खेळ खेळताना मात्र "आंधळी" का बनते? हे कोडे मला उलगडलेले नाही. आणि जेव्हा कोशिंबीर आंधळी होते तेव्हा गाजर, टोमॅटो, काकडी, खिरा सगळे आंधळे होतात का?
- निमिष सोनार, पुणे

Comments
Post a Comment