पांव भाजी
साहित्य:
टमाटे, कांदे, लसूण, कोथिंबीर, आले, बटाटे, शिमला मिरची, वाटाणे, टमाटे, फ्लावर, गाजर, पावभाजी मसाला, तेल, मोहरी, हिंग, हळद, धणे आणि जिरे पूड, काश्मिरी मिरचीचे तिखट, बटर, चीज, मीठ, लादी पाव.
पावभाजीसाठी पेस्ट तयार करणे:
चमचात किंवा लाकडी काडीत अडकवून दोन टमाटे आणि दोन कांदे गॅसच्या फ्लेमवर किंवा ज्योतीवर डायरेक्ट भाजून घ्या. त्यांना मिक्सरच्या भांड्यात टाका. मग त्यात लसणाच्या सोललेल्या सात आठ पाकळ्या, कोथिंबीर, आले (जिंजर) टाका आणि मिक्सर ऑन करून त्याची पेस्ट करा.
भाज्या शिजवणे:
चार पाच मध्यम आकाराचे बटाटे सोलून घ्या आणि त्यांचे चाकूने मोठे काप किंवा तुकडे करा, शिमला मिरचीचे मोठे तुकडे करा (बिया काढून टाका). दोन्ही एका बाऊलमध्ये टाका. मग त्यात वाटाणे, चिरलेले टमाटे, फ्लावर, गाजर टाका.
आता एका गॅसवर कुकर ठेवा, गॅस ऑन करा. बाऊलमधल्या या सर्व गोष्टी आता कुकरमध्ये टाका, त्यात पावभाजी मसाला टाका आणि ह्या सर्व एकत्रित भाज्यांच्या कुकरमधल्या उंचीच्या लेव्हल एवढे पाणी कुकरमध्ये टाका आणि कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या येईपर्यंत शिजवा. मग ब्लेंडरने त्या शिजलेल्या भाज्या मॅश करा (किंवा लाकडी कुटणीने कुटून लगदा करा). थोडेफार फ्लावर, शिमला मिरची आणि बटाटे यांचे छोटे छोटे तुकडे राहिलेत तर चालतील.
भाजीला फोडणी देणे:
गॅस ऑन करून त्यावर कढई ठेवा. कढईत तेल, मोहरी, हिंग टाकून मिक्सर मधील तयार केलेली पेस्ट टाका, पाच मिनिटे परतवा. मग हळद, धणे आणि जिरे पूड, काश्मिरी मिरचीचे तिखट, आणि पावभाजी मसाला टाका. मग कढईत आता कुकर मधील मॅश केलेल्या शिजलेल्या भाज्यांचे मिश्रण टाका. मीठ टाकून पाच ते दहा मिनिटे झाकण ठेवा. आणि झाली पाव भाजी तयार!
पण भाजी वाढतांना त्यात बटर टाकू शकता किंवा चीज किसून टाकू शकता. त्यावर काकडीचे आणि टमाट्याचे बारीक कापलेले गोल तुकडे टाकून सजवा.
तव्यावर तूप किंवा बटर टाकून प्रत्येक पाव अर्ध्यातून पण अपूर्ण कापून मधला भाग भाजून किंवा परतवून घ्या आणि या पाव सोबत ही भाजी खायला द्या.
Send your feedbacks at: sonar.nimish@gmail.com

Comments
Post a Comment