रॉकेट सिंह: सेल्समॅन ऑफ द इयर
यात संपूर्ण चित्रपटभर फक्त ऑफिसमधील वातावरण व्यापून रहाते. बिनकामाच्या कोणत्याच उपकथा टाकण्यात आल्या नाहीत. सेल्समेन लोक विक्रीसाठी काय करतात, त्यांचे बॉस कसे असतात, इंटरव्ह्यू कसे होतात, ऑफिसमधले राजकारण या सगळ्या गोष्टी बारकाईने आणि वास्तववादी वाटतील अशा पद्धतीने दाखवल्या आहेत. ऑफिसव्यतिरिक्त इतर कोणतीच ड्रामेबाजी यात नाही. ऑफिसमधल्या प्रसंगात पण अतिशयोक्ती नाही. यात प्रेमकथा नाही, मारामारी नाही, अनावश्यक गाणी नाहीत आणि पटकथा खूप छान लिहिली आहे. प्रत्येक पात्राच्या वेशभूषेकडे बारकाईने लक्ष दिले गेले आहे त्यामुळे पात्रे खरी ऑफिसमधलीच वाटतात.
यातील सर्वच कलाकार आपापल्या भूमिकेत चपखल बसलेत. रणबीर कपूरच्या अभिनयापेक्षाही सरस अभिनय केला आहे तो रणबीर काम करत असलेल्या कंपनीचा मालक असलेला पुरी (मनीष चौधरी) याने, त्या खालोखाल मग नितीन (नवीन कौशिक) याचे काम चांगले आले आहे. प्रामाणीक आणि सरळ सेल्समन हरप्रित सिंग (रणबीर कपूर) याला ट्रेनिंग पिरियडमध्ये काय अनुभव येतात हे सुरुवातीला दिसते. एकदा त्याच्या प्रामाणिकपणामुळे कंपनीच्या आणि क्लायंटच्या झालेल्या नुकसानीबद्दल माफी मागायला जेव्हा तो बॉसकडे जातो तेव्हा उलट बॉसकडूनच क्लायंटसमोर त्याला अपमान सहन करावा लागतो. मग तो पुढे काय करतो, कंपनी सोडतो का? त्याला कोण कोण साथ देतात? हे सगळं मिश्किलपणे चित्रपटात पुढे मांडले आहे, ते बघायला मजा येते.
चित्रपटाच्या नावात रॉकेट शब्द का वापरला आहे हे चित्रपट पाहिल्यावर कळून येईल आणि मग तुम्हाला हा सुविचार नक्की आठवेल की जो आपल्याला लोकांनी मारलेल्या दगडांची इमारत किंवा पूल बांधतो तो खरा यशस्वी माणूस!
६ जून २०२०

Comments
Post a Comment