मास्क करी मस्करी!
नुकतीच माझ्यासोबत एक नाट्यमय घटना घडली. "दुकान भाडयाने देणे आहे" असे पुठ्ठ्यावर पर्मनंट मार्करने लिहून मी आणि पत्नी चेहऱ्यावर मास्क घालून दुचाकीवरून आमच्या शॉपकडे निघालो जे अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे भाडेकरूविना रिकामे होते. व्यावसायिक जागा असल्याने भरमसाठ वार्षिक प्रॉपर्टी टॅक्स आणि कर्जाचा हफ्ता यामुळे ते दुकान शक्य तितक्या लवकर भाड्याने देणे आवश्यक होते. "नो ब्रोकर" वर जाहिरात देऊनही एकही कॉल येत नव्हता.
शॉपकडे पोहोचलो तेव्हा दिसले की बाजूच्या ओळखीच्या ऑटोमोबाईल रिपेअर दुकानवाल्याने आमच्या दुकानासमोरच्या जागेचा पुरेपूर फायदा घेतलेला होता (जो तो नेहमीच घेत असतो). तिथे चार चार बाईक लावलेल्या होत्या. माझी दुचाकी लावायला तिथे थोडीशीसुद्धा जागा नव्हती. विविध ऑटोमोबाईल पार्ट, ऑइल आणि ग्रीस यांचे थर साचले होते.
त्याच्या दुकानासमोरसुद्धा फक्त एकच माणूस दुकानात जा ये करू शकेल एवढीच जागा होती. त्या जागेत मी जॉन अब्राहमची मनोमन आठवण करून मुद्दाम "धूम" स्टाईलमध्ये स्लो मोशनमध्ये माझी दुचाकी लावली. (हेल्मेट घातले नव्हते कारण जास्त अंतर नव्हते आणि चष्मा, मास्क आणि हेल्मेट हे सगळे गणित जरा अवघड जाते. नाहीतर जॉन अब्राहम सारखं मी हेल्मेट डोक्यावरून स्लो मोशनमध्ये बाजूला केलं असतं, मात्र मी दूर जायचे असेल तर हेल्मेट घालतो!).
त्याने (तो माझ्या ओळखीचा आहे) माझ्याकडे रागाने पाहिले. पण मी चेहऱ्यावरच्या मास्कमुळे उघड्या असलेल्या फक्त डोळ्यांनी त्याच्याकडे रोखून पाहिले आणि आता जणू काही आमच्याच दुकानात ठेवलेला एखादा किमती डायमंड चोरायला आलोय अशा धूम 2 मधील हृतिकच्या अविर्भावात दुकानाकडे स्लो मोशनमध्ये चालू लागलो.
"हा माणूस कोण? अचानक येतो काय आणि आपल्या दुकानासमोरच्या जाण्या येण्याच्या जागेत गाडी लावतो काय, आपल्याकडे टशन देऊन बघतो काय? याला आता धडा शिकवलाच पाहिजे!" असा विचार करून "तुला शिकविन चांगलाच धडा" चित्रपटातील मकरंद अनासपुरेच्या स्टाईलमध्ये तो मला म्हणायला लागला, "अंय, अंय, काय आहे हे? हितं कशाला गाडी लावतो रे?"
आता तो नक्की "जोश" मधल्या शाहरुख सारखी टोळी आणेल आणि मला शरद कपूर, चंद्रचूड सिंग, शरत सक्सेना यांच्याशी लढावे लागेल असे वाटून मी मास्क काढला. (मला पण वाटले की त्याला म्हणावे, "सायला रु, सायला रे, क्या बोला फिर बोल रे!?" पण मी तसे बोललो नाही तो भाग वेगळा!)
मास्क काढल्यावर त्याने मला ओळखले आणि तो ओशाळला. पण त्या आधीच तो पुठ्ठा घेऊन दुकानाकडे निघालेली माझी पत्नी चेहऱ्यावरील मास्क काढून "बाहुबली" मधल्या "राम्या कृष्णन" च्या अविर्भावात त्याला म्हणाली, "ओ दादा, आधी आमच्या दुकानासमोरच्या तुमच्या या गाड्या उचला, मग आम्हाला सांगा!"
(आता बायको तिच्याजवळची एखादी तलवार काढेल, प्रत्युत्तरादाखल ते लोक गॅरेज मध्ये लपवलेले धनुष्य बाण काढून बाहुबली3 ची इथेच सुरू होतो की काय असे मला वाटू लागले होते!)
बाजी पलटल्यामुळे आपली चूक लक्षात येऊन त्यांनी फास्ट फॉरवर्डमध्ये भराभर आमच्या दुकानासमोरच्या गाड्या काढून दुसरीकडे लावल्या.
बोर्ड तारेने जाळीवर अडकवल्यानंतर मी लावलेली माझी दुचाकी काढली तेव्हा त्याचेकडे पाहून हसलो तेव्हा तो म्हणाला, "सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही म्हणून..."
मी म्हणालो, "हरकत नाही दादा! बरं, दुकानाकडे लक्ष असू द्या! येतो मी!"
आणि तो आणि मी आम्ही दोघे हसायला लागलो.
मास्कने आमच्यासोबत चांगलीच मस्करी केली होती. नंतर संध्याकाळीच दुकानाला एक गिऱ्हाईक मिळालं. एक जण बोर्ड वाचून त्याच्याच दुकानावर चौकशीला आला होता, तेव्हा त्याने आवर्जून आम्हाला कॉल केला होता.
.jpeg)
Comments
Post a Comment