व्हेज ग्रील सँडविच
साहित्य:
पुदिना, आले, हिरव्या मिरच्या, मीठ, शेंगदाणे, काकडी, टमाटे, कांदे, बटाटे, बीट, कणीसाचे दाणे (कॉर्न), ब्रेड, चाट मसाला, चीज, बटर, मायोनीज, टोमॅटो सॉस
कृती:
पुदिना चटणी:
आले, पुदिना, मिरची, मीठ एकत्र करून मिक्सर मध्ये त्याचे पेस्ट करा.
स्टफिंग किंवा फिलिंग (सारण):
काकडी, टमाटे, कांदे यांचे बारीक काप करा किंवा तिन्ही गोष्टी ब्लेंडरने बारीक करा आणि मायोनीज आवडत असेल तर त्यात टाकून मिक्स करा. बटाटे उकडा. उकडलेल्या बटाट्यांच्या बारीक गोल चकत्या करा. ज्यांना बीट आवडते ते बीटाच्या चकत्या पण टाकू शकतात. बटाट्याच्या चकत्यांऐवजी बटाटे मॅश पण करू शकता. किंवा कांदे, टमाटे, काकडी, बीट आणि बटाटे या सर्व गोष्टींचे मॅश करून मिश्रण वापरण्याऐवजी त्यांचे खूप बारीक गोल काप करून ते वापरू शकता. तसेच सारणात फक्त बटाट्याच्या चकत्या टाकून त्यावर चाट मसाला टाका आणि इतर सगळी प्रोसेस तीच ठेवा. तेव्हा त्याला "पोटॅटो सँडविच" म्हणतात. काही वेळेस फक्त बटाटे चकत्या आणि उकडलेल्या कणीसाचे क्रश केलेले दाणे या फक्त दोनच गोष्टींचे सारण टाकू शकता. म्हणजे ते "कॉर्न सँडविच" होईल.
सँडविच (दोन ब्रेड वापरून):
मोठ्या आकाराचे ब्राऊन किंवा व्हाइट ब्रेड घ्या. एका ब्रेडला एका बाजूने सॉस लावा. दुसऱ्या ब्रेडला एका बाजूने पुदिना चटणी लावा. पुदिना लावलेल्या भागावर बटाटे चकत्या पसरवा. त्यावर चाट मसाला आणि थोडे मीठ टाका. मग काकडी, टमाटे, कांदे यांचे मिश्रण त्यावर पसरवा. कणीसाचे उकडलेले दाणे मिक्सरमध्ये बारीक करून या मिश्रणात टाकू शकता. आवडत असेल तर त्यावर चीज किसून टाका. मग सॉस लावलेला ब्रेड त्यावर पालथा घालून दोन्ही ब्रेड आतमधले मिश्रण बाहेर न येऊ देता उचलून तव्यावर बटर टाकून दोन्ही बाजूनी सराट्याच्या मदतीने आलटून पालटून चांगले शेका. किंवा सँडविच मेकर इलेक्ट्रिक मशीन मध्ये पण शेकू शकता. शेकण्यापूर्वी दोन्ही ब्रेडचे चारही बाजूचे काठ चाकूने कापून टाकू शकता.
सँडविच (तीन ब्रेड वापरून):
यातील थोडे व्हेरिएशन किंवा व्हरायटी म्हणजे तीन ब्रेड घेऊन तिसऱ्या ब्रेडला आतून बटर लावा. मग दोन स्टफिंग तयार होतात त्यातील एकात काकडी, टमाटे, कांदे यांचे मिश्रण आणि दुसऱ्यात बटाट्याचे काप टाकू शकता. किंवा पहिल्या आणि तिसऱ्या ब्रेडला आतून बटर लावून मधल्या ब्रेडला एका बाजूने सॉस तर दुसऱ्या बाजूने पुदिना चटणी लावा आणि सारण विभागून पसरवा.
मग हे सँडविच तयार झाल्यावर चाकूने त्याचे कर्णाकृती (डायगोनल) काप करून चार भाग करा. मग मध्यभागी सॉस टाका, त्यावर चीज किसून टाका. मग शेंगदाणे कूट, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीने बनलेल्या घट्ट चटणी सोबत हे सँडविच खायला द्या.
हेच सँडविच भाजले नाही आणि नुसतेच कच्चे खाल्ले तरीही चालते. बाकी सगळी प्रोसेस तीच!
- निमिष सोनार, पुणे

Comments
Post a Comment