शालेय पुस्तकांवरचे कव्हर
काल माझ्या लहान मुलीच्या शालेय पुस्तकांना तपकिरी अ-पारदर्शक कव्हर लावतांना विचार आला की कव्हर लावून आपण पुस्तकांचे मूळ कव्हरवरचे (मुखपृष्ठ front page आणि मलपृष्ठ back page) चित्र विसरून जातो किवा त्याचा आनंद आपल्याला आणि मुलांना घेता येत नाही.
मी तर म्हणेन की कव्हर लावल्यावर पुस्तकांचे सौंदर्यच नष्ट होते. कव्हर लावल्यावर सगळी पुस्तकं वह्या सारखेच दिसतात. विशिष्ट पुस्तकाची ती फिलिंगच येत नाही.
पुस्तके वर्षभर टिकावेत, कव्हर खराब होऊ नये म्हणून शाळा कव्हर लावायला सांगतात आणि कव्हर लावणे हे माझे आवडीचे काम असले तरी कव्हर लावलेली पुस्तके मला स्वत:ला वापरायला आवडत नाहीत. म्हणून मी माझ्या कॉलेज जीवनात पुस्तकांना पारदर्शक जाड प्लास्टिकचे कव्हर लावायचो म्हणजे कव्हर लावूनही मूळ कव्हर दिसते. या कव्हरबद्दल माझ्या मित्राने सांगितले होते. किंवा आणखी एक पर्याय माझ्या मनात सुचला की कोणत्याही पुस्तकाच्या जाड कव्हरवरच्या चित्रासारखे अगदी सारखेच आणखी एक पहिले पान पुन्हा छापले तर? (आणि असेच शेवटच्या पानाबद्दल!)
म्हणजे कव्हर लावले तरी मूळ कव्हर कसे आहे हे पण पहिल्या पानावर पुन्हा दिसत राहील. एखादी कादंबरी वाचतांना मधूनच पुन्हा कव्हर बघणे हे पण वेगळाच आनंद देते. पुस्तक वाचक मंडळींना नक्की मी हे काय म्हणतो आहे हे समजेल.
फक्त मुखपृष्ठच नाही तर लहानपणी कॉमिक्स वाचतांना मलपृष्ठावरच्या जाहिराती का असेना पण त्या वाचतांना वेगळीच फिलिंग यायची, जसे पार्ले पॉपिन्स, कॅमलिन कलर्स वगैरे किंवा आताशा एखाद्या साप्ताहिकाच्या मलपृष्ठावर छापलेली एखाद्या बासुंदी मसाल्याची किंवा मग पावभाजी मसाला अथवा एखाद्या वज्रदंतीची जाहिरात असो त्या वाचण्याची फिलिंग टीव्हीवरच्या एक दोन मिनिटांच्या जाहिरातीत नाही. थोडे विषयांतर झाले. असो.
१४ जुलै २०२०

Comments
Post a Comment