मीना प्रभुंचं "ग्रीकांजली"
मीना प्रभुंचं "ग्रीकांजली" हे प्रवासवर्णन पुस्तक आजच वाचून संपलं. बरेच दिवस झाले वेळ मिळेल तसे वाचत होतो. त्यांच्या इतर पुस्तकांसारखंच हे पुस्तक सुद्धा छान आहे! साऊथ अमेरिकेतील बहुतेक देशांप्रमाणे ग्रीस मध्येही मीना प्रभु एकट्याने फिरल्या. तिथे त्यांना अनेक मित्र मैत्रिणी भेटल्या.
दोन वर्षांपूर्वी "इंद्रायणी सावकार" यांचं "असा होता सिकंदर" हे अलेक्झांडरच्या जीवनावरचं पुस्तक वाचलं होतं, तसेच पूर्वी सोनी टीव्हीवर "पोरस" सिरीयल बघितली होती त्यातही अलेक्झांडरच्या जीवनाबद्दल बऱ्यापैकी माहिती मिळाली, त्यामुळे ग्रीकांजली वाचायची उत्सुकता खूप होती आणि पुस्तक वाचायला शेवटी 2020 नोव्हेंबर डिसेंबरचा मुहूर्त लाभला.
लोकशाही, ऑलिम्पिक, मॅरेथॉन, लिपी, नाटक, शिल्पकला अशा कितीतरी गोष्टींची सुरुवात ग्रीकांनीच केली. आपले आणि ग्रीकांचे पुराणकथेतील देव यांच्यात खूप साम्य आहे. जग जिंकायला निघालेला सम्राट अलेक्झांडर, तसेच सॉक्रेटिस, प्लेटो आणि अरिस्टाँटल हे तत्वज्ञानी तसेच पायथागोरस हा भूमितीतज्ञ पण इथलाच! स्पार्टा आणि "ट्रोजन हॉर्स"ची कथा इथलीच! इसापनीतीचा जन्म इथलाच. स्पार्टाच्या अद्भुत स्पार्टन लोकांबद्दल वाचून खूपच आश्चर्य वाटले. इंग्रजीतील चाळीस टक्के अल्फाबेट आणि शब्द ग्रीक मधून आलेत. काही ग्रीक शब्द संस्कृतमधून आलेत. ग्रीसच्या थिब्जमधली स्त्रीचं तोंड, सिंहिणीचं अंग आणि पाठीवर पंख असलेली जगप्रसिद्ध स्फिंक्स पण इथलीच! पण स्फिंक्सचा मोठा पुतळा मात्र इजिप्तमध्ये आहे असं ऐकलं आहे.
(अजून "इजिप्तायन" हे मीना प्रभुंचे इजिप्तवरचे पुस्तक मी वाचलेले नाही. ग्रीस आणि इजिप्तमध्ये पण बऱ्याच सारख्या गोष्टी आहेत. जगप्रसिद्ध राणी क्लिओपात्रा बद्दल मला बरेचसे कुतूहल आहे आणि तिच्याबद्दल बरेचसे ऐकून आहे त्यामुळे वेळ मिळेल तसे इजिप्तायन आणि क्लिओपत्रा वरची "सुनील जावळे" यांची कादंबरी पण वाचायची आहे. त्यात ज्युलियस सीझरबद्दल पण माहिती आहे. इजिप्तमधले तूतानखामेन, मम्मीज हे सगळे गूढ असल्याने वाचायला मजा येईल!)
"अलेक्झांडरच्या पण आधीपासून आर्य लोक ग्रीसमध्ये गेले होते त्यामुळे त्यांच्या आपल्या पुराणकथांमध्ये खूप साम्य आहे", "ग्रीसमध्ये ऑलिव्ह खूप आढळतात, तसेच तिथले लोक वांग्याचे भरीत पण खातात" ही आणि अशा प्रकारची भरपूर माहिती यातून मिळते. ग्रीस देश हा अनेक छोट्या मोठ्या बेटांनी बनलेला असून त्याच्या डावीकडे इटली, उजवीकडे तुर्कस्तान, खाली इजिप्त आहे. ग्रीसचे पारंपरिक हाडवैरी देश म्हणजे तुर्कस्तान आणि पर्शिया (आताचा इराण)!
एकूणच प्रवासाची, भूगोलाची आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांनी ग्रीकांजली वाचायलाच हवे.
- निमिष सोनार, पुणे
(6-Dec-2020)

Comments
Post a Comment