श्रीमान योगी

श्रीमान योगी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील अतिशय उत्कृष्ट कादंबरी आहे. २०२१ साली फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत मी ती वाचली. यात मांडलेल्या इतिहासातील घटनांची सत्यता किती हा माझ्या या पुस्तक परीक्षणाचा हेतू नाही आणि त्याबद्दल भाष्य करण्याची माझी योग्यता नाही. किबहुना या कादंबरीचे "परीक्षण" करण्याची पण माझी योग्यता नाही कारण मी इतिहास तज्ञ नाही. पण फक्त महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण जगासाठी आदर्शवत असणाऱ्या शिवाजी महाराजांबद्द्ल ही कादंबरी आपल्याला भरभरून माहिती देते आणि त्यामुळे न राहवून इतरांनासुद्धा त्याबद्दल थोडेसे सांगावे आणि सगळ्यांनी ती कादंबरी वाचावी असे वाटल्याने मी या कादंबरीबद्दल माझे विचार एक सामान्य वाचक म्हणून मांडत आहे.


या कादंबरीचे एकूण अकरा भाग आहेत आणि प्रत्येक भागात अनेक प्रकरणं आहेत. पूर्ण कादंबरीत कुठेही घटनांच्या तारखा आणि साल न दिल्याने वाचणे सुसह्य होते. अन्यथा पाठ्यक्रमातील इतिहासाचे पुस्तक वाचतो असे वाटत राहिले असते. पुस्तकाच्या शेवटी प्रत्येक भागानुसार तारीखवार घटनाक्रम दिलेला आहेच. त्यामुळे गरज पडल्यास तो अधून मधून संदर्भासाठी बघता येतो. रणजीत देसाई यांनी आपल्या लेखणीतून संपूर्ण ऐतिहासिक कालखंड अक्षरशः जिवंत केला आहे. त्यामागची त्यांची मेहनत आणि त्यांनी केलेले संशोधन प्रत्येक प्रकरणात दिसून येते. अशा थोर पुरुषाच्या जीवनावर कादंबरी लिहिणे हे प्रचंड मोठे शिवधनुष्य रणजीत देसाई यांनी समर्थपणे पेलले आहे. या कादंबरीतून आपल्याला महाराजांच्या जीवनातील अशा अनेक गोष्टी वाचायला मिळतात ज्या आतापर्यंत मी कधी ऐकल्या नव्हत्या.

शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनकाल यात समाविष्ट केला आहे. यातून आपल्याला जवळपास पन्नास वर्षाच्या ऐतिहासिक कालखंडातील घटना कळतात तसेच राजांच्या खासगी जीवनाबद्दल सुद्धा माहिती मिळते. त्यावेळची वेशभूषा, वातावरण, सामाजिक काळ, रिती रिवाज याचे वर्णन लेखकाने अनेक ऐतिहासिक शब्द वापरून जिवंत केले आहेत. राजांनी अनेकांना "त्या काळच्या भाषेत" लिहिलेली पत्रे लेखकाने जशीच्या तशी दिलेली आहेत त्यामुळे वाचतांना एक वेगळीच जाणीव आणि वातावरणनिर्मिती होते.

शिवाजी महाराज लहान असताना बंगलोरला शहाजीराजांच्या राज्यात (जहागिरीत) जिजाऊंसोबत जातात तेव्हाचे तिथले वातावरण, शिवाजींचे सावत्र भाऊ वगैरे (हा भाग मला माहित नव्हता) यात वाचायला मिळतो. राजमाता जिजाऊ शिवाजींना बेंगलोरला न राहू देण्याचा निर्णय का घेतात ते सर्व कळते.

स्वराज्य निर्मिती आणि शिवाजींची जडणघडण यात जिजाऊंसोबत अनेक जणांचा वाटा आहे. दादोजी कोंडदेव, नेताजी पालकर, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, फिरंगोजी नरसाळे, जीवा महाला, हंबीरराव मोहिते, बाळाजी आवजी, पानसंबळ, तानाजी मालुसरे, मोरोपंत, त्रंबकपंत डबीर अशी आणखी खूप नावे घेता येतील. त्यांच्याशी असलेले राजांचे बंध, तसेच आई जिजामाता, वडील शहाजीराजे तसेच शिवाजीराजांच्या राण्या, मुलगी सखुबाई, मुलं संभाजी व राजाराम आणि इतर नातेसंबंध यांचा संपूर्ण परामर्श लेखकाने घेतला आहे.

शहाजी राजांच्या मृत्यूनंतर ज्या प्रकारे शिवाजी महाराज जिजाऊंना सांभाळून घेऊन निराशेतून बाहेर काढतात त्याच प्रकारे नंतर मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या तहामुळे गमावलेल्या गड आणि किल्ल्यांमुळे निराश झालेल्या राजांना जिजाऊ निराशेतून बाहेर काढतात आणि दोघांचा जगण्याचा नेहेमी एकच उद्देश्य असतो - स्वराज्य! याची ते एकमेकांना आठवण करून देतात.

राजांचे संत तुकाराम महाराज आणि श्री रामदास स्वामी यांच्याशी असलेल्या बंधाचेही दर्शन आपल्याला यातून होते. त्यांचा राजांच्या जीवनावर आणि विचारांवर होणारा परिणामसुद्धा यात दिसतो.

औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून छोट्या संभाजीसह नाट्यमय सुटकेनंतर कादंबरीत निश्चलपुरी, कवी कलश, गागा भट्ट अशी नवीन पात्रे कादंबरीत प्रवेश करतात.

यात हीच पात्रे आहेत असे नाहीत तर शिवनेरी, रोहिडा, राजगड, तोरणा, पन्हाळा, विशालगड, लाल महाल, रायगड, जंजिरा, लोहगड, कर्नाळा, प्रतापगड, पुरंधर, चाकण, कोंढाणा ही सुद्धा स्वतंत्र पात्रेच म्हणावी लागतील इतके त्यांचे स्वराज्यातील महत्त्व आहे.

मिर्झाराजांच्या मृत्यूनंतर आणि औरंगजेब तह मोडून हिंदूंवर जिझिया कर लादतो त्यानंतर वेगळ्याच घटना घडायला लागतात. विशेषत: राज्याभिषेक झाल्यानंतर आणि जिजाबाईंच्या मृत्यूनंतर नेमके काय काय होते हे यात अगदी तपशीलवार वाचायला मिळते.

पुत्र संभाजी सोबत राजांचा (आणि अष्टप्रधान मंडळाचा) असलेला संघर्ष अचूकपणे टिपला गेला आहे. संभाजीराजे मोगलांशी हातमिळवणी करून नंतर पुन्हा जेव्हा स्वराज्यात परत येतात तेव्हा शिवाजी राजे व संभाजी राजे यांची भेट होते तेव्हाचा दोघांमधला दीर्घ संवाद म्हणजे रणजित देसाईंच्या लेखणीची कमाल आहे. राजांच्या अखेरच्या काळातील रायगडावरील अंतर्गत राजकारण वाचून मन विषण्ण आणि विदीर्ण होते.

औरंगजेब दक्षिणेकडे मोगली सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने येणार असतो आणि त्याच्या पाडावासाठी राजांनी बनवलेली योजना राजांच्या मृत्यूमुळे अपूर्णच रहाते याचे खूप वाईट वाटत रहाते. एकाच आयुष्यात राजे इतक्या गोष्टी करतात की ते अवतारी युगपुरुषच होते यावर शिक्कामोर्तब होते.

नुसतेच आदिलशाही आणि मोगलाई यांच्याशीच राजांना आयुष्यभर लढावे लागले नाही तर इंग्रजांना आणि पोर्तुगिजांना पण राजे वेळोवेळी वठणीवर आणतात. अनेक स्वकीयसुद्धा राजांच्या विरोधात जातात पण त्या सर्व गोष्टीसुद्धा राजे समर्थपणे हाताळतात.

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात आणि थोडक्यात चरीत्र वर्णन करणाऱ्या इतर अनेक पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील ठळक घटना जुजबीपणे आपण वाचलेल्या असतात परंतु त्यामागचा संगतवार घटनाक्रम, त्या घटनांमागची अनेक कारणे आणि त्या घटनांचे परिणाम हे जाणून असतील तर या कादंबरीशिवाय पर्याय नाही. तसेच अनेक संकटांतून मात करण्यासाठीचे सकारात्मक बळ ही कादंबरी नक्कीच आपल्याला देते. बाकी जास्त मी काही सांगत नाही. मात्र एवढे नक्की सांगतो की, ही कादंबरी जरूर वाचा! जय महाराष्ट्र, जय शिवराय!

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली