नाते जुळले मनाशी पेनाचे!

 


लहानपणापासूनचा माझा आवडता रेनोल्ड्स पेन (झाकण असलेला) ज्याद्वारे मी दहावी, बारावीपर्यंतच्या सगळ्या परीक्षेतील पेपर लिहिले. बारावीत असतांना याच पेनने मी एक सायन्स कादंबरी सुद्धा लिहिली होती. पण ती वही नंतर माझेकडून हरवली. इंजिनियरिंगचे बरेचसे पेपरपण मी टिकटॉकवाल्या रेनोल्ड्स जेटरने लिहिले.

कालांतराने वेगवेगळ्या कंपनीत कामाला लागल्यानंतर आणि विंडोज, एमएस ऑफिसच्या आगमनानंतर सगळे काही बदलले. सगळी कामे पेपरलेस झाली. पेनचे कामच कुठे पडेनासे झाले. बँकेतसुद्धा सगळे डिजिटल झाले. नंतर माझे लेख, कथा कादंबऱ्यासुद्धा मी मोबाईलवरच्या किपॅडने मराठीत लिहायला लागलो कारण केव्हाही एखादी कल्पना सुचली आणि वेळ मिळाला की पटकन गुगल कीप मध्ये लिहून ठेवणे सोयीचे झाले. पण म्हणून पेनाशी असलेले नाते कमी झाले नाही.

अशातच मागील आठवड्यात एका स्टेशनरी दुकानावर मला काचेच्या आत रेनोल्ड्सचे हे पेन मला ठेवलेले दिसले. मी क्षणाचाही विलंब न करता ते दोघे पेन (एक काळा एक निळा) विकत घेतले. लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या. माझे शाळेतील सर्व मित्र आणि मी हाच पेन वापरायचो. रिफील किती संपली हे पेन मधून रिफील काढून उजेडात बघण्यात वेगळीच मजा यायची. रिफील संपली की नवी रिफील टाकायची आहे याची वेगळीच उत्सुकता असायची. आजही भले आपण व्हॉटस् एप, फेसबुकवर लिखाण करून पाठवतो पण खाली नाव लिहितांना इमोजी मधील पेनचाच सिम्बॉल टाकतो, कीबोर्डचा नाही. पेनचे सामर्थ्यच आहे तसे! (ही काहींना उगाचच पेनची जाहिरात वाटण्याची शक्यता आहे पण ही जाहिरात नाही. आपल्या आठवणी ठराविक वस्तूंशी जोडलेल्या असतात मग ती वस्तू कोणत्याही कंपनीची असो. तसेच हे आहे!)

२२ ऑगस्ट २०२०

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली