जाहिरातींचा मसाला!
(काही प्रसिद्ध जाहिरातींना मी मसाला टाकून तडका दिला आणि आता तुमच्यासमोर सादर करत आहे.)
१. घडी आणि दाढी
तिच्या पांढऱ्या ड्रेसवर समोसा खातांना सॉस सांडतो.
तिच्या समोर बसलेला पांढऱ्या दाढीवाला म्हणतो, "चल आपण डाग धुवून येऊ"
ती: "मला आधी पूर्ण समोसा तर खाऊ द्या आणि.."
(तो तिला बोलू देत नाही)
तो: "चल आधी तुला एका डिटर्जंटच्या ऑफिसमध्ये नेतो आणि डिटर्जंट बनवण्याची प्रक्रिया दाखवतो, ती समजून घेतल्याशिवाय डाग धुतला जाणार नाही!"
ती: "अहो पण तोपर्यंत डाग वाळून जाईल आणि आणखी घट्ट होईल आणि माझ्याकडे..."
(ती सारखी सारखी घड्याळाकडे पाहाते)
तो: "चुप! घडी घडी, घडी मत देख! चल माझ्या सोबत!"
(तो तिला डिटर्जंट बनवण्याची प्रोसेस दाखवतो)
ती: "अहो मी इथलीच कर्मचारी आहे, मला हे डिटर्जंट माहीत आहे! मेरे पास भी घडी है!"
तो: "अच्छा, कौनसी है?"
ती: "टाईमेक्स"
तो: "अच्छा? मेरे पास रोलेक्स है!"
ती: "टाईम तो सही बताती है ना?"
तो: "ये टाईम देखने के लिये थोडी है, ये तो दाग धोने के लिए है!"
(पहले इस्तेमाल करो और फिर टाईम देखकर धो डालो)
***
२. केश "क्वीन"
लांब केस प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे!", परिना टीव्हीवर सांगत होती.
"माहितीये मला, तर त्याचं काय?", टीव्ही बघतांना युक्ती म्हणाली.
"त्याचं असं की हे केशवजीर तेल लाव केसांना. म्हणजे केस गळणं थांबतीलच पण नवीन केसपण पटापट उगायला लागतील!"
"अरे वा, पण मग इतके केस सहन होतील का माझ्या डोक्याला? म्हणजे मला म्हणायचं आहे की इतक्या केसांच्या वजनाने डोकं माझ्या मानेच्या आत दाबलं नाही का जाणार? आणि मला असं बोलत फिरावं लागणार: 'आय एम युक्ती द रोबोट, केसांचं वजन 3 टेरा बाईट आणि केस विंचरायचा स्पीड 4 गिगा बाईट!' मला त्यापेक्षा मला नको बाई ते तेल!"
"अगं असं काय करतेस? एवढे केस नाही वाढणार! आणि आम्ही शाम्पू फ्री देत आहोत सोबत! समजा तसं काही वाटलंच तर हा शाम्पू लाव! वजनदार डोकं हलकं करेल हा शाम्पू!"
"अगं बाई, खर्रर्रर्रच??"
***
३. टूथपेस्ट मसाला
एक माणूस धावत्या रेल्वेच्या डब्यात सकाळी बर्थवर उठून बसला आणि बसल्या बसल्या आपल्या ब्रशवर पांढरे पेस्ट टाकले. मग खिशातून त्याने एक डबी काढली आणि जसे आपण कैरीवर मीठ टाकतो तसे त्या पेस्टवर त्या डबीतले तपकिरी दंतमंजन शिंपडले.
तेवढ्यात बाजूच्या डब्यातून शर्टाला "फूल" लावून आणि एका हातात "काटे" घेऊन विजय देवगण सारखा दिसणारा तिकीट चेकर "गोलमाल गोलमाल" असे गाणे म्हणत म्हणत आणि ब्रिजेश खन्ना सारखे हातवारे करत गोल गोल फिरत फिरत त्या ब्रशवाल्या माणसाकडे आला आणि नवीन गाणे म्हणायला लागला, "चुना चुना, काथा काथा!"
ब्रशवाला माणूस हादरला आणि त्याच्या हातातून ब्रश खाली पडला.
टीसीवर तो माणूस चिडून म्हणाला, "हे काय नवीन आता? त्यापेक्षा गोल माल गाणं बरं होतं की! आणि तिकीट चेक करायचं सोडून चुना काथा काय करत बसलात? आणि माझी पेस्ट कॉम्बिनेशन वाया घालवली!!"
विजय म्हणाला, "अरे, ती पांढरी टूथपेस्ट म्हणजे चुना आहे आणि ती तपकिरी दंत पावडर म्हणजे काथा! आणि तुझे दात त्यामुळे खराब होतील राजा! माझ्याकडे त्याऐवजी एक चांगला उपाय आहे!"
"कोणता उपाय? सिमेंट आणि वॉल पुट्टी लावू का मग दातांना? मी आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन गोष्टी एकत्र करून तो अनोखा संगम दातांना लावत होतो! आणि तुम्ही काय टीसीच्या कामासोबत कोणत्या नवीन टूथपेस्टची एजन्सी घेतली की काय? साईड बिझिनेस म्हणून?"
"होय! ही घे नवीन हिरव्या कलरची पेस्ट. यात चहापत्ती सहित पस्तीस जडी बुटी आणि अब तक छप्पन मसाले आहेत. यामुळे एकदा याने ब्रश केला तर दात हिरवेगार होतीलच पण आपल्याला चहा प्यायची सुद्धा गरज नाही!"
***
४. "आय्यो" डीन
ती आवेगाने मला म्हणाली, "तुमच्या मिठाला प्रश्न विचारा की त्याच्यात योग्य मात्रेत आयोडीन आहे का?"
मी तर घाबरलोच. म्हणजे आजपर्यंत मी जे मीठ खाल्लं त्यात आयोडीन नव्हतं की काय?
अन्याय आहे हा! घोर अन्याय!
मग मी तडक मिठाची डबी काढली आणि मीठ शिंपडायच्या छिद्रातून ओरडून त्याला जाब विचारलं, "ए खारट मिठा! तुझ्यात आयोडीन आहे का रे?"
मीठ हा प्रश्न ऐकून चवताळलं आणि डबीतल्या डबीत गोल गोल घुसमळून राग व्यक्त करू लागलं आणि मला म्हणलं, "कोणी सांगितलं तुला हा प्रश्न मला विचारायला?"
"ती टीव्हीवरच्या जाहिराती मधली कुणीतरी अभिनेत्री आहे!"
"हो का? मग माझ्याकडून तिला प्रश्न विचार की तिला आयोडीनचा केमिकल फॉर्म्युला तरी माहीत आहे का? आलेय मोठे तुमच्या मिठात हे आहे का आणि ते आहे का विचारणारे!! आणि तिला म्हणावं तिच्या एक तरी सुपरहिट चित्रपटाचं नाव आठवतंय का तिला?"
मी मिठाचा प्रश्न विचारण्यासाठी मान वर करून टिव्हीकडे पाहिले तेव्हा ती मीठ वाली अभिनेत्री घाबरून पळाली होती आणि आता एक नवीन जाहिरात सुरू होती ज्यात आणखी एक अभिनेत्री विचारत होती...
"तुमच्या पेस्टला विचारा त्यात हळद आहे का?"
मग मी टीव्ही बंद केला.
***
५. वरण साखर
आलिया मॅडमची शब्दांचा फेरफार करणारी एक मजेदार जाहिरात पाहण्यात आली, ज्यात ती म्हणते: "दाल से लेकर चिनी तक सब खाना चाहते हो? तो दालचिनी वाला नया टूथपेस्ट इस्तेमाल करो!"
अजून एक लक्षात आले की या जाहिरातीचे मराठी चॅनेल्ससाठी भाषांतर (डबिंग) करायचे तर? शक्यच होणार नाही!
करून पाहा बरं!
वरणसाखर?
***
६. झिंगाट झिनझिण्या
कार्यक्रमात ब्रेक होतो.
टूथपेस्टची जाहिरात लागते.
एक जण फळ खातो आणि त्याच्या दातांना झिणझिण्या येतात....
त्यामुळे त्याचा चेहरा वेदनेने वेडावाकडा होतो....
पाच मिनिटं, दहा मिनिटं होतात.
झिणझिण्या तशाच.
टीव्ही स्क्रीनवरचा चेहराही तसाच.
चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मोजता येऊ शकतील इतका वेळ तो चेहरा स्क्रीनवर दिसत रहातो.
ही जाहिरात टूथपेस्टची आहे की चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवण्याचा क्रीमची आहे असा संभ्रम पडायला लागतो.
त्या माणसाच्या दातांच्या झिणझिण्या दूर होतील की नाही माहिती नाही, पण ती जाहिरात बघून मेंदूला मात्र झिणझिण्या यायला सुरुवात झाली आहे कारण अजूनही ती जाहिरात संपली नाही आहे!
चॅनेल पण बदलता येत नाही आहे आणि टीव्ही पण बंद होत नाही आहे.
जाहिरात पूर्ण झाल्याशिवाय आता जागेवरून पण उठता येत नाही आहे.
डोळे पण स्विच ऑफ करता येत नाही आहेत. डोळे जखडले आहेत.
वाचवा!
***
७. ठोसर पेस्ट
हिरो आला आणि त्याने व्हिलनच्या तोंडावर ठोसा मारून त्याचे दात पाडले हा सीन टीव्हीवर एका चित्रपटात सुरू होता आणि खाली लगेच एक जाहिरात आली: "दातांच्या समस्यांना ठेवा दूर, आमची टूथपेस्ट वापरा!"
उगाच नाही जाहिरातीला पासष्टवी कला म्हणत!!
***
८. स्वच्छ पोष्टर
"ते बघ स्वच्छ शहर, आपलं शहर!"
"कुठे आहे? मला तर कचरा दिसतोय!"
"अरे कचऱ्याकडे नाही बघायचं!"
"मग कुठे बघायचं?"
"जिकडे तिकडे भिंतींवर लिहिलेले स्वच्छतेचे पोश्टर दिसत नाहीत का तुला?"
"ते होय?"
"हो तेच!"
"पण त्या पोश्टरच्या बाजूला जे कचऱ्याचे ढीग आहेत ते?"
"त्याकडे दुर्लक्ष करायचं! ते जणू नाहीतच असे समजायचे!"
"पण असं कसं?"
"हो! तसंच! कल्पनाशक्ती वापरायची!"
"वापरली!"
"गुड बॉय! दिसतंय ना आता स्वच्छ शहर, आपलं शहर?"
"दिसलं!"
"मग चला, निघा आता!"
***
९. अगर तुम ना रहोगे...
आजकाल टीव्ही लावला की हमखास खालील वाक्य ऐकू येतं: "मान लो, कल को अगर आप नही रहें तो आपके बच्चो की स्कूल फिस कौन भरेगा? अरे अब तो करवा लो टर्म इन्शुरन्स, पॉलिसी दरबार डॉट कॉम से!"
आधीच सध्याच्या वातावरणामुळे घाबरलेल्या जनतेला आणखी घाबरवण्याचे काम तो दरबारी माणूस सोफ्यावर बसून रोज न चुकता करत होता. एकदा त्या अतरंगी हेयरस्टाईल असलेल्या पॉलिसीवाल्या माणसाचा, त्या तिन्ही मित्रांना खूप राग आला, ते चिडले.
मागच्या खिडकीतून चढून ते तिघे पॉलिसीवाल्याच्या घरात चुपचाप शिरले आणि त्याच्या सोफ्यामागे गेले, त्याच्या अंगावर चुपचाप चादर टाकली आणि त्याला उचलून घरी आणलं. मग त्याच्या अंगावरची चादर काढली आणि त्याला तिघांनी खुर्चीवर दोरीने बांधून ठेवलं.
मकरंद अनासपुरे: "कशाला रोज टिव्हीवर येऊन रोज आमचं डोकं खातोस रे? कशाला घाबरवतोस आम्हाला? वाजवू का? कानाखाली?"
पॉलिसी दरबार: "तुम्हाला घाबरवायचे मला पैसे मिळतात! सोडा मला. पॉलिसी दरबार मध्ये हजेरी लावायला जायचंय मला! सोडा मला!"
अशोक सराफ: "किती वेळा सोडा मागतो रे हा? सोडा तर बिलकुल देऊ नका याला! मला एक सांग पॉलिसीवाल्या, तू स्वतः किती पॉलिसी घेतल्या रे पॉलिसी दरबार मधून? आलाय मोठा लोकांना शहाणपणा शिकवायला? व्याख्या विखी वाख्खा!"
पॉलिसी दरबार: "मी एकही पॉलिसी नाय घेतली. कोल्ड्रिंकचे जाहिरात करणारे हिरो हिरोईन स्वतः कधी कोल्ड्रिंक पितांना पाहिले का? मग मला कशाला पॉलिसी घ्यायला सांगता? मला तर बाल बच्चे पण नाही. माझं लग्न पण नाही झालं!"
भारत गणेशपुरे: "मग आम्हांले शहाणपणा काहून शिकवतो रे?"
पॉलिसी दरबार: "अरे, सोडा मला, मी तर छोटासा नन्हासा प्यालासा राजपाल यादव आहे. मी पॉलिसी दरबारचा वेश घालून सोफ्यावर बसतो!"
मकरंद अनासपुरे: "च्यायला, आसं हाय व्हय? तू रस्ता चुकला का काय? तुझी प्रियदर्शन वाट पाहतोय, चल व्हय तिकडं हेरा फेरी करायला! तरीच म्हणतो मी, सुनील शेट्टीच्या आवाजात "कबिरा स्पिकिंग" म्हणत मला प्रियदर्शनचा फोन येऊन गेला तीन चार येळा, की तू फरार झालाय म्हणून!"
(मी पॉलिसीच्या विरोधात नाही, पण लोकांना एकसारखे पॉलिसीच्या नावाखाली मृत्यूचे भय दाखवून घाबरवून सोडण्याची जाहिरात वाल्यांची जी पॉलिसी आहे त्याच्या विरोधात आहे!)
***
१० . अंघोळीच्या भावना
कुणाच्या भावना दुखवू नये किंवा कुणी एखाद्या प्रसंगाचे अनुकरण करू नये म्हणून आजकाल चित्रपट आणि जाहिरातींमध्ये वेगवेगळ्या सूचना सतत दाखवल्या जातात किंवा दाखवाव्या लागतात.
पण हद्द म्हणजे लिरीलची जाहिरात ज्यात हिरव्या कपड्यातील (?) मॉडेल धबधब्याखाली अंघोळ करते त्यातसुद्धा आजकाल खाली सूचना देतात: "यह गतिविधी (😅) विशेषज्ञों के निरीक्षण में की गयी है!"
****
११. साबणाची जादूगरी
नवीन लग्न झालेल्या जोडप्याकडे नवऱ्या मुलाचा म्हणजे राहुलचा मित्र अजय भेटायला येतो.
त्याला समोर एक बाळ रांगतांना दिसतं.
अजय म्हणतो, "काय हो वाहिनी, हे कुणाचं बाळ? आणि राहुल कुठेय?"
वाहिनी रडू लागते, "अहो भावजी! काय सांगू तुम्हाला? आम्ही किराण्यात आणलेला संतूर साबण ह्यांनी आताच चुकून ऑरेंज सोन पापडी समजून खाल्ला आणि ते क्षणार्धात बाळ बनले!"
अजय म्हणतो, "आरं आरं वाहिनी! काय झालं हे! मग आता तुम्ही बी संतूर खावा, लहान व्हावा आन् दोघं जोडीनं एकत्र मोठं व्हावा! हलू हलू! चला येतो मी!"
वाहिनी, "आओ भावजी, सरबत तर पिऊन जा!"
अजय, "नगं नगं! मला नगं ते! सरबत बी नको आनं, चा बी नको! उगाच म्या बी छोटा होऊन गेलो तर!"
***
१२. डॉलर इथ्थे
परदेशात -
पोलीस - "डॉलर कुठ्ठे?
अक्षय - "डॉलर इथ्थे!"
पोलीस हसून त्याला जाऊ देते.
भारतात -
पोलीस - "रुपया कुठ्ठे?"
अक्षय - "रुपया इथ्थे"
पोलीस जोरात कानाखाली मारते.
अक्षय गाल चोळतो.
पोलीस म्हणते (तुरुंगाकडे बोट दाखवून) -
"तुमची रवानगी आता इथ्थे!!"
***
१३. फितूर साबण
मम्मी: हे बघ मुली मी कॉलेजमध्ये काही कारणास्तव जातेय फितूर साबण लावून. मी तुझी शाळा पण बंद केली आणि तुला कायम माझ्यासोबत घेऊन फिरते, त्याचं कारण तुला माहितीये. आता मुकाट झाडामागे लपून उभी राहा आणि काही संकट आलं की काय करायचं ते माहीत आहे ना तुला?
मुलगी: हो मम्मी!
(मम्मी मुलीसोबत कॉलेजमध्ये जाते.)
दोन स्टुडंट म्हणतात: "संध्याकाळी तू आमच्यासोबत ये. आमच्याकडे डान्स प्रोग्रॅमचे स्टुडंट पासेस आहेत!"
झाडामागच्या मुलीला संकटाचा एहसास होतो आणि ती स्लो मोशन मध्ये "मम्मीsss" असं ओरडत पळत येते.
ते दोन स्टुडंट अति आश्चर्य चकित होतात म्हणतात, "मम्मी? आम्हाला तुम्ही पाचवीच्या स्टुडंट वाटल्या, छोटुश्या. पण तुम्ही तर मम्मीsss आहात?"
मम्मी: "फितूर साबण लावत जा, तुम्ही वयापेक्षा वीसेक वर्षांनी लहान वाटाल!"
(स्टेजवर नाचण्याआधी मम्मी मुलीला स्टेज मागे खांबाच्या आड लपून राहायला बजावते. मम्मी नाचते.)
दोन स्टुडंट: "अरे, हिला तर आपण सकाळी पहिलंय कॉलेज आवारात!"
मम्मी स्टेजमागच्या मुलीला संकटाचा एहसास दिलवते.
ती स्लो मोशन मध्ये "मम्मीsss" असं ओरडत पळत येते.
सगळे प्रेक्षक: "मम्मी???"
मम्मी मुलीला कडेवर घेते आणि दोन्ही जणी फितूर साबण सगळ्यांना घ्यायला आर्जव करतात आणि तेवढ्यात...
एका कंपनीचा CEO धावत स्टेजवर येतो. आणि त्या मम्मीच्या पाया पडतो आणि म्हणतो, "आजी sss"
***
१४. उजेड पडणारी क्रीम
एका मोठ्ठ्या हॉल मध्ये सगळ्या तरुण स्त्रिया खुर्च्यांवर बसतात. त्यात काही पत्रकारही असतात. स्टेजवर एक तरुण स्त्री येते, "नामी उत्तम" नावाची आणि माईक घेऊन बोलू लागते.
स्टेज अचानक खूप उजळून निघतं. काहीतरी नवीन शोध सगळ्यांना आता कळणार असतो.
स्टेजवरील तरुणी: "ओळखलं का सगळ्यांनी मला? हो, बरोबर! मी तीच, तुमच्या वतीने तारखांचा 'निर्णय' घेणाऱ्या तुमच्या घरातल्या त्या कॅलेंडरवर हातातील मेहेंदी दाखवत उभी असते, तीच मी!"
सर्व प्रेक्षक मुली: "ओळखलं! तुम्ही नामी उत्तम! हे! हे! हे! आम्हाला सेल्फी काढू द्या ना तुमच्यासोबत, नामीजी!"
नामी उत्तम: "नक्की काढू पण आधी मी काय म्हणते ते तर ऐका!"
सर्व प्रेक्षक मुली (सरसावून बसतात): "सांगा ना, सांगा ना!"
नामी उत्तम: "ऐका तर मग! आतापर्यंत साधे ब्लॅक व्हाईट टीव्ही होते, पिक्चर ट्यूब वाले, 5:9 रिझोलुशन असलेले. नीट चित्र दिसत होतं का त्यात?"
सर्व प्रेक्षक मुली (ओरडतात): "नाही! ssss
एक मुलगी प्रेक्षकांतून उठून उभी राहाते: "पण इथे आम्हाला तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शिकवायला आला आहात का मॅडम?"
नामी उत्तम: "नाही, आधी ऐका मी काय म्हणते ते! ब्लॅक व्हाईट टीव्ही जाऊन रंगीत टीव्ही आले, मग 16:9 रिझोलुशन वाले टीव्ही आले, पिक्चर ट्यूब गेली आणि LCD आणि LED वाले फ्लॅट टीव्ही आलेत. पडलात ना फ्लॅट ही टीव्हीची प्रगती ऐकून!"
हे ऐकून जमिनीवर फ्लॅट पडलेल्या सर्व प्रेक्षक मुलींना तेथील महिला पोलीस आणि सिक्युरिटी गार्ड उठवून पुन्हा खुर्च्यांवर बसवतात.
नामी उत्तम: "मग आपण सर्वांनी का मागे राहावे स्त्रियांनो? आपला उजळपणा तोच जुना आहे, अजूनही. 5:9 उजळपणा. पिक्चर ट्यूबवाल्या जमान्यातील. तर आता एका आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून एका HD LED इलेक्ट्रॉनिक चिपचे तुकडे आपण फेयरनेस क्रीम मध्ये टाकलेत."
ही अजब आणि "नामी" शक्कल ऐकून सर्व प्रेक्षक मुली आणि पत्रकार परत एकदा बेशुद्ध होतात. त्यांना फेयरनेस क्रीमच्या वासाने घाबरवून शुद्धीवर आणले जाते.
नामी उत्तम: "तर मग मी काय सांगत होते की ही क्रीम लावली की ते चिपचे HD तुकडे त्वचेच्या आतमध्ये जाऊन त्वचेला आतमधून मालिश आणि पॉलिश करतात आणि देतात तुम्हाला HD उजळपणा! ही एकमेव कंपनी बनवते अशा फेयरनेस क्रीम आणि देते तुम्हाला एचडी ग्लो. हे
क्रीम लावून आता जिथे जाल तिथे चमकाल आणि इतरांनाही चमकवाल!"
स्टेजवर अचानक सर्व प्रेक्षकांतील तरुणींची ती फेयरनेस क्रीम घ्यायला आणि सेल्फी काढायला झुंबड उडते. सर्वजणी त्या क्रीम विकत घेऊन चेहऱ्यावर लावू लागतात आणि सेल्फी घ्यायला धडपडतात आणि पडतात. या गडबडीत नामी उत्तम धडपडून खाली पडते आणि माईक दुसऱ्या
बाजूला पडतो. तिच्या अंगावरून सर्वजणी चालू लागतात. त्या गर्दीतून कसाबसा मार्ग काढून नामी उत्तम हळूच तिथून पसार होते. त्यानंतर ते स्टेज अनेक वर्षे HD glow ने चमकत राहतं.
तो प्रकाश आजही रात्री चंद्रापेक्षाही जास्त उजेड देतो. हजारो लोक ते तेज स्टेज बघायला आजही येत असतात.
आणि त्या तरुणी सगळीकडे HD उजळपणा उधळत फिरत असतात.
सूर्याला पण आता तो उजळपणा पाहून लाजायला होतं.
***
१५. भांगुर सीमेंट
एक मोठ्ठा आफ्रिकन डायनोसॉर रागात येतो आणि भारतातल्या एका बिल्डिंगला तोडायला धावतो.
हात, पाय आणि शेपटी जोरजोरात बिल्डिंगवर आदळतो.
पण बिल्डिंग काही तुटत नाही. शेवटी त्याची शेपटीच तुटते आणि बिचारा तो नाराज होऊन परत जातो.
सिमेंटने बनलेला "भांगुर" नावाचा ब्रिटिश माणूस बिल्डिंगवरच्या पोस्टरवर शांत हाताची घडी घालून उभा असतो.
तो लाडात येऊन बोलतो, "भारतीयांनो, आमचे ब्रिटिश भांगुर सिमेंट घ्या. सोन्यापेक्षा महाग आहे पण डायनोसॉर कडून पण तुटत नाही.
सास्ता नाई साबसे आच्चा! मला हिंदी पण नीट बोलता येत नाही पण तरीही टूम हमारा शिमेन्ट लो!"
***
१६ . शुद्धीकरण
बऱ्याच वर्षांनी अनिल कपूर जाहिरात करतांना दिसला आणि तीही एका "जलशुद्धीकरण" यंत्राची (water purifier) जाहिरात!
हेमा मालिनी, माधुरी या दोघीजणी पण शुद्ध पाण्याचे महत्व कधीपासून टीव्हीवर जाहिरातीत सांगत आहेत.
इतर अभिनेत्यांनो अभिनेत्रींनो जरा शिका काहीतरी यांचेकडून!
तुम्ही आपले करत बसले आहात शीतपेये, मादक पेये यांची जाहिरात! (हृदयशुद्धीकरण).
रणवीर सिंग पण बिचारा "दातस्वच्छीकरण" पेस्टची जाहिरात करत सकाळी ऑफिस ला जाणाऱ्या लोकांच्या गाड्यांवर नाचून त्यांना ऑफिसला उशीर करत आहे.
प्रियांका पण त्याच्या पावलावर पाऊल टाकतेय.
मात्र दीपिका आणि करिना सध्या "शरिरशुद्धीकरण" म्हणजे साबणांचा प्रचार करताहेत.
एकूणच बॉलिवूड वाल्यांनी एक प्रकारचे "शुद्धीकरण अभियान" सुरु केलेले दिसते!!
***
१७. बडे आराम से
सैफ नवाबाच्या घरी (मुकेश) ऋषी चोरी करायला येतो.
नवाब त्याचा फोन हिसकावतो व म्हणतो - "थांब तुझ्या आईला फोन लावतो!"
ऋषी हसायला लागतो.
नवाब विचारतो - "का रे? का हसतो?"
ऋषी म्हणतो - "बघच आता. कळेलच!"
तेवढ्यात ऋषीच्या फोनस्क्रिन डिस्प्ले वर सोनम नाचायला सुरुवात करते आणि म्हणते, "मां क्का फोन आया, तेरी मां क्का फोन आया.."
मग फोनमधूनच परेश रावल चा आवाज येतो, "उठाले रे बाबा, तेरी मां का फोन है!"
नंतर फवाद मोबाईल मधून एक फोन फेकतो, तो नवाब च्या कपाळावर जोरात आपटतो.
ऋषी म्हणतो - "अरे उचल ना! माझ्या आईचा फोन आहे. तुझ्याशी बोलायचं आहे तीला!"
नवाब विचारतो- "का रे? मी तिला फोन करण्या ऐवजी तीच मला फोन करतेय?"
फोन वरून "मां" बोलते, "ए येड्या नवाबा, म्याच आता माह्या पोराले बी "बडे आराम से" घालाया लावतीया. तव्हा पासून त्यो लई भारी चोऱ्या करतुया. माला त्यो चोरी करताना लई चांगला वाटतोया. म्हीच त्याला चोरी करायला धाड्तीया.. करुदे त्यास्नी चोरी!"
ऋषी "बडे आराम से" चोरी करतो आणि नवाबला "बडे आराम से" एका कपाटात बंद करुन ठेवतो!
अमूल चाचो - बडे आराम से (चोरी करो!)
***
१८. मिठाची ताकद
मिठातसुद्धा तब्बल 84 मिनरल्स असतात हे मला माहिती नव्हते!
हे सामान्य ज्ञान मला डोक्यावरचे पांढरे केस काळे करण्याच्या जाहिरातीमधल्या एका अभिनेत्याने दिले.
लोकं विसरू नये म्हणून तो रोज परत परत अनेक वेळा ते सांगतो आणि ते मीठ विकत घ्यायला विनंती करतो!
मिठाचे हे ज्ञान देतांना मात्र त्याने त्याच्या डोक्यावरचे अर्धे पांढरे केस कायम ठेवले होते!!
म्हणजे ते केस काळे करण्याचे प्रॉडक्ट तो वापरत नाही का?
की मग फक्त मिठाची जाहिरात करतांना वापरात नाही?
पांढऱ्या मिठाचे प्रतीक म्हणून?
आणि तो हे मीठ तरी त्याच्या घरी जेवणात वापरत असेल का? की मीठ खाऊन खाऊन 84 मिनरल्समुळे त्याचे केस पांढरे झाले आणि ते काळे करायला त्याने ते प्रॉडक्ट वापरले?
आणि इतके दिवस आपण उगाच साधे मीठ खात मोठे झालो आणि 84 मिनरल्सला मुकलो!
खाल्ले असते तर आपणही इतके हेल्दी इतके हेल्दी झालो असतो ना की मोग्याम्बोला पण दे दणादण धुतले असते!!
***
१९ . बदल डालो
अनिल कपूर रोज सांगतो: "आज से खाने का नमक बदल डालो!"
अरे दादा, रोज रोज नवीन नमक कोठून आणणार?
***
२०. तरिफान
"विरे डी वेडिंग" आटोपून बादशाहला आणि करिष्माला बाय बाय करून सोनम माझेकडे आली.
सोनमला मी म्हटलं, "वा, कमाल आहे तुझी! प्युरो हेल्दी सॉल्ट खातेस ना, म्हणून हेल्दी आहेस! होर दस, किंनी तरिफान चाईदा तेंनु!"
सोनम आश्चर्याने म्हणाली,"जास्त तरिफान नको मला, पण बाय दि वे, ते मीठ नाही खात मी, तुला कुणी सांगितलं?"
मी म्हणालो, "तुझे पप्पा रोज टिव्हीवर जीव तोडून सांगतात की नमक हेल्दी तो फॅमिली हेल्दी!"
सोनम हसायला लागली, "अरे, गम्मत करतात ते, सवय आहे त्यांना! पूर्वी ते हेयर डाय बद्दल सुध्दा सांगायचे पण मिठाच्या जाहिरातीत त्यांचे केस किती पांढरे दिसतात, यावरून समजून घे!"
***
२१ . डासाणू
एक ग्राहक साबणाच्या दुकानात जातो.
"एखादा चांगला साबण दाखवा बरं जरा!"
साबण विक्रेता एक साबण हातात घेऊन सांगतो-
"हा ऑलकिल साबण घ्या!"
"अहो, हा तर तोच जुना साबण आहे, फक्त कव्हरची डिझाईन बदललेली दिसते!"
"हो, पण आता हा पूर्वीपेक्षा खूप चांगला झाला आहे. आतापर्यंतचा सर्वोत्तम, परिपूर्ण म्हणजे 99.9%. हा फक्त किटाणू, जिवाणू, विषाणू यांनाच मारत नाही तर भडाणू, गाऱ्हाणू, टीकाणू यांना सुद्धा मारतो!"
"हो का? बरं, मग आतापर्यंत आमच्या मागच्या पिढीने वापरलेला हाच साबण अपूर्ण होता?"
"अं हो म्हणजे नाही!"
"मला सांगाच आता! ग्राहक म्हणून माझा अधिकार आहे जाणून घ्यायचा की यापूर्वी हा साबण किती टक्के अपूर्ण होता?"
"99.3% पूर्ण होता फक्त! पण आता 99.9% झाला आहे!"
"आँ, मग साबणाचा उरलेला 0.6% तुकडा कुठे आहे! तुम्ही दुकानदारांनी वापरला तो, नाही का?"
"अहो, तसे नाही! पूर्वी हा साबण भडाणू, गाऱ्हाणू, टीकाणू यांना मारत नव्हता पण आता त्यांनाही मारतो!"
"मग पूर्वीच्या पिढीचे 0.6% चे पैसे परत करा, नाहीतर आम्ही ग्राहक मंचाकडे तक्रार करू!"
"अहो ग्राहक राजे, पण हे तिघे तेव्हा होते कुठे? त्यामुळे त्यांना मारण्याचा प्रश्न येतो कुठे?"
"प्रश्न मनात येतो दुसरीकडे कुठे येणार? बरं ते जाऊ द्या! कुठे असतात हो हे तिघे: भडाणू, गाऱ्हाणू, टीकाणू?"
"ते व्हॅय? ते आकाशात असतात! चायनीज वाफेपासून बनलेल्या ढगातून पाऊस पडला की पडतात ते तिघे आपल्या अंगावर?"
"आणि हा साबण हे सगळे किडे मकोडेच मारत फिरतो की शरीराची स्वछता पण करतो?"
"करतो करतो. स्वच्छता पण करतो! चांगलं चाटून पुसून लख्ख करतो तुम्हाला! यांच्यात दोनशे लिंबाची शक्ती आहे!"
"आसं का? मी ऐकलंय अजून वेगवेगळे काणू येणार आहेत भविष्यात! त्यांनाही मारेल का हा?
"भविष्यात धक्काणू, फेकाणू, शॉकाणू येतील. त्यांनापण आमचा साबण मारेल. 99.100% आणि हो, आमचा हा साबण डासाणू पण मारतो?"
"डासाणू???"
"डासाणू म्हणजे तो नाही का तो, घरभर उडत फिरतो, चावतो, नांगी मारतो आणि संजय उर्मिला सारखा गुण गुण गुण गुण करत इकडे तिकडे दौडतो! तोच तो डासाणू!!"
"बरं बरं! लाय भारी आहे हो तुमचा साबण! हा फक्त साबण नाही तर जणू बेबॉन स्प्रे झाला! मी आता असं करतो! मी मस्तपैकी बेदाणू सॉरी बेदाणे खाऊन येतो, मग घेतो तुमचा साबण!"
***
२२ . वाघ वाघिण चहा
पुण्यातील "वाघोली" येथे एक वाघ आपल्या घरात निवांतपणे दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान "जगभरातील अभयारण्ये" हे जर्मनीतील एका डॅशिंग सिंहिणीने लिहिलेले प्रवासवर्णन पुस्तक वाचत होता.
बाजूला टेबलावर मोठ्या मग मध्ये "शिकारी" कंपनीचा वाफाळलेला चहा ठेवलेला होता. कपावर वाघ बंदूकधारी शिकाऱ्याला फाडून खात आहे असे चित्र होते.
वाघीण गरमागरम वडा पाव तळत होती. वाघिणीने दोन वाफाळलेले टेस्टी वडे, दोन पाव, सोबत बाजूला लसणाची लाल चटणी आणि दोन गरमागरम तळलेल्या हिरव्या मिरच्या असे पदार्थ एका प्लेटमध्ये आणून वाघाच्या समोर ठेवले.
तेवढ्यात पुस्तकातून डोके वर काढून वाघ म्हणाला, "अगं ऐकलंस का?"
"काय हो आता? उगाच डायलॉगची अदलाबदल कशाला करता? संवादाची सुरवात नेहमी 'अहो ऐकलंत का' अशी व्हायला हवी आणि ती नेहमी पत्नीने करावी हे माहीत असूनही तुम्ही आधी का बोललात?"
"अगं, स्क्रिप्ट लिहिणारा मी थोडाच आहे? वाघ लोक जास्तीत जास्त निवांत बसून शिकारी चहा पिऊ शकतात, पण ते स्क्रिप्ट थोडेच लिहितात?"
"न लिहायला काय झालं? तुम्हाला वाचता येतं ना?"
"अगं, हे काय विचारणं झालं? हे काय मी पुस्तक वाचतोय, दिसतंय ना?"
"दिसतंय हो! पण त्यात तुम्ही फोटोंमध्ये बकरीकडे काय टक लावून बघताय?"
"अगं, एक बकरी नेहेमी माझ्या स्वप्नात येते आणि काय योगायोग की तीच बकरी आज या पुस्तकातील फोटोत दिसते आहे!"
"हो का? मला वाटलं तुम्ही बकरीला 'खाऊ की गिळू' या नजरेने बघता आहात!"
"अगं नाही गं. मी शाकाहारी झालोय माहीत आहे ना? मग तरीही कशाला संशय घेतेस? नाहीतर मी वडा पाव, इडली डोसा, बाजरीची भाकरी, पालकाची हिरवी भाजी, वरण भात असा आहार केला असता का? तुझं उगाच आपलं काहीतरी!"
"बरं झालं बाई! बरं, आता आणखी एक योगायोग झाला आहे!"
वाघाने निवांत चहाचा एक घोट घेतला आणि वाफाळलेल्या वड्याला लाल चटणी लावून त्याचा चटकदार तुकडा तोडला आणि अख्खी मिरची गटकन तोंडात मटकवली आणि मग तो भरल्या तोंडाने म्हणाला,"आता आणखी कोणता योगायोग?"
"त्याचं असं आहे की मी आमच्या मैत्रिणींच्या ग्रुप मधील एका बकरीला घरी बोलावलंय! येतच असेल ती आता!"
"हो का, अरे वा! येऊ दे की! मी काय खाणार थोडंच आहे तिला?", तोंडाला सुटलेले पाणी लपवत वाघ कसनुसा हसत म्हणाला.
"पण मी कुठं म्हणाले की तुम्ही खाणार म्हणून? तुमचा इरादा काही ठीक दिसत नाही हं मला! लक्षात ठेवा, सांगून ठेवते. त्या बकरीला काही केलं ना, तर मी आहे आणि तुम्ही आहेत!", अख्खा वडापाव तोंडात टाकत आणि प्रचंड डरकाळी फोडत वाघीण म्हणाली.
दोघांचे पाळण्यात झोपलेले पिल्लू म्हणाले, "अगं आई हळू. मी यूट्यूब वर अंगाई गीत सर्च करतेय आणि तू आपलं जोरात ओरडते आहेस! हळू जरा!"
डरकाळीमुळे घराचा सिलिंग फॅन हेलकावे खाऊ लागला. घरातील बल्ब होल्डरमधून निघून खाली पडला.
शेजारच्या हत्तीणीच्या घरात हादरे जाणवायला लागले, तिच्या घरातील कप बशा, कशा बशा पडता पडता वाचल्या.
हत्तीण खिडकीतून विचारू लागली, "काय गं, बरी आहेस ना? काय झालं एवढं ओरडायला?"
"काही नाही गं! जरा आमच्या ह्यांना युक्तीच्या चार गोष्टी सांगत होते!"
"बरं बरं, पण जरा हळू सांगत जा गं बाई! बिचारा वाघ आहे तो, हत्ती नाही काही! आमच्या घरात छोटी छोटी हत्तीची पिल्लं झोपलीत! तू अशी ओरडायला लागली की त्यांच्या स्वप्नात सिंहिणी दिसतात त्यांना!"
"बरं, सॉरी आणि तू नको काळजी करुस ह्यांची! बघते मी काय करायचं ते!", असे म्हणून वाघीण पुढे वाघाला म्हणाली, "हे बघा, ती बकरी आणि मी मिळून चहाचे मळे विकत घेतले आहेत. आम्ही चहाचा बिझिनेस सुरू करणार आहोत आणि आमचे ब्रँड नेम असेल वाघीण बकरी चहा!"
वाघाच्या हातातील कप खाली पडला आणि आश्चर्याने वाघ म्हणाला, "हे काहीतरीच काय नाव ठेवलं? तू कर चहाचा बिझिनेस! पण नाव काहीतरी वेगळं ठेव ना!"
"काय ठेऊ?"
"वाघ बकरी चहा असं ठेव नाव!"
"अहो पण आधीच हत्तीण-बोक्या चहा बाजारात आहे, ते म्हणतील आमच्या नावाची स्टाईल कॉपी केली!"
"काही नाही होणार तसं! अंग तुला गम्मत सांगतो बघ! मेट्रो गोल्डविन मेयर नेटवर्क यांच्या लोगो मध्ये सिंह असतो की नाही?"
"त्याचा इथे काय संबंध?"
"आहे, संबंध आहे! त्यांच्या बॅनर खाली विल्यम हाना आणि जोसेफ बार्बारा यांनी कोणते कार्टून काढले?"
"टॉम अँन्ड जेरी!"
"हां! हुशार आहेस की गं! तर MGM मध्ये आधी वाघाचं चित्र असणार होतं पण सिंहाने धमकी दिली आणि रोज तो MGM डरकाळी फोडत असतो आणि आपण वाघ लोकं बसलो इथे अडकीत्त्याने आक्रोड फोडत!"
"अहो पण त्याचा इथे काय संबंध?"
"आहे, संबंध आहे! आता आपण त्यांच्या नाकावर टिच्चून वाघ एन्ड बकरी चहा काढू, जसे 'टॉम अँन्ड जेरी' तसे 'वाघ अँन्ड बकरी'!"
"अहो, गुपचूप वडा पाव खा आणि प्लेट नेऊन ठेवा बेसिन मध्ये! उगाच आमच्या स्त्री शक्तीच्या आड येऊ नका! 'वाघीण आणि बकरी' यात स्त्री शक्ती दिसून येईल! वाघ बकरी नावात ती मजा नाही!"
"अगं, तुला कळत कसं नाही? वाघ बकरी या नावात खरी स्त्री शक्ती दिसून येते!"
"ती कशी?"
"वाघावर बकरी भारी पडते. शिकार करायला आलेल्या वाघाला ब्या ब्या अशी डरकाळी फोडून बकरी पळवून लावते! कशी वाटली आयडिया? चहाच्या पाऊच वर पण तुम्ही असेच चित्र छापा!"
हे ऐकल्यावर वाघीण चिडली आणि कढई मधला वडे तळायचा झारा उचलून तेलाचे हात न धुता वाघाच्या मागे 'हात धुवून' लागली आणि घरातच टॉम एन्ड जेरी चा नवीन एपिसोड सुरू झाला! खिडकीतून MGM सिंह डरकाळी फोडत मजा पाहायला आला.
****
२३. चक्क बटाटेवडे
"सर, आज मी चक्क तुम्हाला सामोसे खातांना बघतेय?"
"अगं काय सांगू! हरबरा पीठ संपलं होतं. थोडा मैदा होता, म्हटलं बनवावे सामोसे!"
****
"सर, आज चक्क मी तुम्हाला टमाटे खातांना बघतेय?"
"दीक्षित डाएट सुरू केलंय!"
****
हे काय? आम्ही चक्क तुम्हाला डायमंड खातांना पाहतोय?"
"माझ्या आवडीचे चकचकीत पदार्थ तेलात टाकून मी नेहमी खातो!"
****
ती: "सर, आज चक्क मी तुम्हाला बटाटेवडे खातांना बघतेय?"
तो: "चालतंय की!"
ती: "काहीही हं श्री!"
सीआयडी: "कुछ तो गडबड है, दया!'
****
२४. जांभूळ छाप दंतमंजन - कमनीय शरिरयष्टीचे रहस्य!
(पायल रोहतगी आणि विरेन्द्र सेहवाग यांची जाहिरात)
'रोहते' या गावी एक 'वीर' खेळाडू , 'उसने' अवसान चेहेऱ्यावर आणून ऊस खाणाऱ्या एका 'पायल' वाजवत असलेल्या अभिनेत्रीला म्हणतो :
"काय गं, तुझ्या मजबूत दातांचे रहस्य मला सांगतेस का?"
ती म्हणते : " असा ऊस खायला मजबूत दात हवेत. हे दातच नाही तर माझे शरिरसौष्ठव पण बघ. "
(असे म्हणून ती कमर हलविते)
वीर : " सांग ना गं, रहस्य! "
ती : " जांभूळ छाप जांभळे दंतमंजन. याने रोज दात घासल्याने असे माझ्यासारखे मजबूत दात आणि मजबूत शरिरयष्टी बनते."
(मग ती पटापट सात आठ ऊस खाते)
अहो, तर मग वाट कसली बघता?
वापरा, जांभूळ दंतमंजन!
मजबूत दात, मजबूत शरिरयष्टी!
२५. उटण्याचा अक्स साबण...
एक सुंदर मुलगी जमेल तेवढे अंगप्रदर्शन करत सकाळी सकाळी घरातील सदस्यांसमोर आंघोळीची योजना जाहीर करते :
" मी आंघोळ करायला चालली आहे, पुतळ्याची! "
सगळे घरातील सदस्य तीला बँड बाज्यासह पुतळ्याजवळ घेवून जातात. ती पुतळ्याची आंघोळ घालते.
( 'अक्स' पुतळा साबण! या सोबत एक यंत्र मोफत. ते पुतळ्याजवळ ठेवून त्यात साबण टाकून ठेवा,
म्हणजे पुतळा थोड्या थोड्या वेळेने आपोआप धुतला जातो )
२६. सूपर "ठंडा" तेल...
एक बायको रागारागात तणतणते :
" मी चालले माहेरी कायमची "
नवरा पण फणफणतो :
"चल, स्टेशनवर सोडायला येतो तुला "
रागाने नवरा एके ठिकाणी बसतो.
तोपर्यंत बायको कपडे भरते.
एकजण नवऱ्याला एक 'सुपर' गरम तेल देतो.
नवरा ते डोक्याला लावतो.
तेल लावल्यामुळे तो भणभणत उठतो.
घटस्फोटाचं सर्टिफिकेट तीला देतो.
म्हणतो : " हे नाही का घेवून जाणार सोबत ?"
(बघितलंत आमच्या तेलाचा प्रभाव?
झटपट असरदार !)
२७. चोरांची खिच खिच
चोरी करण्यासाठी एक चोर एका घरात घुसतो.
त्याच्या गळ्यात 'खिचखिच' व्हायला लागते.
घरातील आजीला जाग येते.
ती म्हणते,
" बेटा, चोरी करायला आला आहेस ना.
घाबरू नकोस. हे घे आधी. हे 'गरारा' सायरप आहे.
ते पी, खिचखिच दूर कर, आणि मग शांततेने चोरी कर."
चोर गरारा सायरप गटागटा पितो.
आणि बेशुद्ध पडतो.
आजी पोलिसांना फोन करून चोराला पकडून देते.
(बघितलंत! आमच्या कंपनीचे गरारा सायरप! चोरांना पकडण्याचा नामी उपाय! आजच घ्या...)
२८. साडी में साडी ...
प्रतिनिधी : आपण कोणती साडी खरेदी केली?
महिला : 'सुपर' साडी !
प्रतिनिधी : का?
महिला : फुकटात मिळाली म्हणून!
एक अभिनेता : अरे! ही साडी तर माझी पत्नी पण नेसते.
प्रतिनिधी : समजूतदार आहे ना ती म्हणून !
अभिनेता : हे! चुप! खबरदार, पुन्हा असे म्हणालास तर!
२९. दाग- द फायर... टिकीया
प्रतिनिधी :
( आम्ही माफी मागतो की आम्ही सौ. सुनीता यांची मुलाखत त्यांना न विचारता शूट केली )
आपण कोणती टिकीया वापरता?
महिला : कोणत्याच टिकिया वर मला विश्वास नाही.
तुमच्या कंपनीच्या तर मुळीच नाही.
प्रतिनिधी : का बरे?
महिला : अहो, चांगल्या पांढऱ्या कपड्यावर डाग पडतात...
आहे तेच डाग जात नाहीत आणि धुतल्यावर अजून डाग पडतात!"
प्रतिनिधी : समजा , मी ही टिकीया तुम्हाला फुकटात देवू केली, तर?
महिला : नको! मुळीच घेणार नाही.
प्रतिनिधी : ( दर्शकांना ) बघितलंत ! फुकटात सुद्धा घ्यायला कुणी तयार नाही आमची टिकिया!
तुम्ही तरी घ्या हो आणि आमची लाज राखा!
३०. उध्वस्त ग्राईप वॉटर
"काय झालं?"
"बाळ रडत होतं."
" ऐकत नसेल तर थोबाडीत दे त्याला. तू लहान असतांना मीही तुला तेच देत होते."
३१. नाटीका शांपू
एक बारा तेरा वर्षाची मुलगी एका तरंगणाऱ्या हिरव्यागार पानावर मोकळे केस सोडून उभी राहून म्हणते :
" माझे जहाज, आहे ना छान? .... कोठून आणले विचारता? ... सांगू ? भाड्याचे आहे!
मग ती पांढरे स्वच्छ केस दाखवते :
" माझे केस! आहे ना पांढरे शुभ्र! ... कसे काय पांढरे झाले विचारता? .... सांगू? ...
आं .... मी नाही सांगणार ! "
( बघितलंत.. ती जरी नसेल सांगत तरी, आम्ही सांगतो ना!
ही कमाल आहे आमच्या शांपूची...
वापरा आमचा शांपू.. केस करा शुभ्र ... शुभ्रतेची चमक ! पुन्हा पुन्हा! )
३२. आला नवा "प्रकाश"
प्रतिनिधी : " पाहा पहा, ही लगबगीने जाणारी लोकं.. यांना विचारू या आपण यांनी काय खरेदी केलंय ते. "
एकीला तो विचारतो : " आपण काय खरेदी केलंत? "
ती : " लख्ख-उजेड " धुण्याची पावडर..
प्रतिनिधी दुसरीला : " तीने बघा " लख्ख उजेड " ला आपलंसं केलं...आणी तुम्ही ? "
दुसरी : मी? " अंधार " पावडर!
( आला लख्ख उजेड ... चार थेंबांचा हा हा..)
३३. पिवळे दंतमंजन
शिक्षक : " ही आहे आपल्या दातांची रचना ! , अरे काजू , तुझे दात तर खुप पिवळे झालेत? याचे रहस्य सांग! "
काजू : " का नाही होणारे ते पिवळे, मास्टरजी ! मी 'हार्बर' चे पिवळे दंतमंजन वापरतो ना! "
३४. खाली न येतो मी
एक मंत्री खुर्चीवर सर्वानुमते जावून बसतात. पण, अनेक वर्षे झाली तरी खाली येण्याचे नाव घेत नाहीत. इतर इच्छुक मनातून नाराज असतात. जनतेला वाटते- "वा! काय सुखी मंत्रिमंडळ आहे ते!"
शेवटी इतर मंत्रीगणांचा रागाचा पारा अनावर होतो.
"खाली या हो आता"
मंत्री खुर्चीसह हवेत तरंगतात व म्हणतात- " खाली न येतो मी, खाली न येतो, खाली न येतो, खाली न येतो मी"
मंत्री मंडळातील एक जण- " जारे! खुपीरिया साबण घेवून ये. यांना आंघोळ घाल मग ताळ्यावर येतील ते"
खुपीरिया साबणाने आंघोळल्यावर मंत्री खाली येतात.
वापरा खुपीरिया साबणः मंत्र्यांचे उच्चपद डोळ्यात "खुपत" असेल तर, खुपीरिया साबण वापरल्यास मंत्री खाली येतात. जमीनीवर येतात. व तुम्हाला संधी मिळते.
३५. अक्स चा लपंडाव
एकदा "कभी" हा आपली पत्नी "कॅश" सोबत आंधळा लपंडाव खेळतो. कभी च्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते.
कॅश चालाख असते. ती "कया कच्चन" ला समोर करून लपून बसते.
कभी चुकून तीला पकडतो. "अरे मम्मी तू? माझी सोन्याहून सोनसळी प्रिया कुठे आहे?"
कया : अरे मुर्ख मुला! कधीचे सांगते आहे. "हक्स" साबण वापर. ऐकत नाहीस. वापरला असतास तर ही परिस्थिती आली नसती. "हक्स" च्या वासाने तुझी सोनसळी तू लगेच ओळखली असतीस.
"कमीताभ" तेथे येतो आणि म्हणतो- हक्स वापरा आणि आपले "अक्स" आरशात बघा. आणि व्हा बिंदास बंदा!
३६. चिरमा चमत्कार!
एका गाचात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. कित्येक महिने पाउस येत नाही. तेव्हा तेथे "चिरमा" नावाची मुलगी येते.
तीच्या अंगी अद्भुत शक्ती असते बरं का! पाणी अडवण्याची.
तिच्या जवळ एक मंत्र असतो. " चिरमा, चिरमा चिरमा डिटर्जंट पावडर के झाग ने जादू कर दिया...पानी मे रहके भि ये कम जले...." मंत्र म्हणतांना पाणी हवेतच थिजते. मोठमोठे साधू अचंबित होवून होवून समाधिस्थ होतात.
शेवटी तेथे धरण बांधले जाते. केवळ चिरमा डीटर्जंट मुळे.
चिरमा डिटर्जंटः पाणि अडवा. पाणी जिरवा...इतर डिटरजंटची ही जिरवा.
३७. मेमरी लॉस चॉकलेट
आले आले. अद्भुत मेमरी लॉस गजनी चॉकलेट आले. कसे काय बघाच!
रमेशः " भाऊ एक चॉकलेट द्या."
सुरेशः " भाऊ एक चॉकलेट द्या."
दोघेही "वायू स्टार" चॉकलेट खातात. एकमेकांना विसरतात.
"रमेश?" "सुरेश?" तू इथे?
चॉकलेट खातात.
"रमेश?" "सुरेश?" तू इथे?
आणि दुकानदाराचे पैसे न देता निघून जातात.
कारण "वायू स्टार" गजनी चॉकलट. शंभर टक्के विसराळूपणाची गॅरंटी.
काय मग असे अद्भुत चॉकलेट घ्यायला जरुर विसरा...
३८. माकड आणि "मनुष्यगण"
"अरे ती.. पाजोल झाडावर लपून बसलीय. काय झाले कळत नाही."
"आमिष दाखवा तीला.."
"कल्केनलिबे घेतेस का? ये खाली?"
"खाली येते मी .."
"पण आधी नाचून दाखव बरं"
ती नाचून दाखवते.
तरिही चॉकलेट ते मर्कट लोक देत नाहित.
ती धमकावते- "ए! जास्ती शानपणा करु नका हा! तो पेवगण आहे ना, त्याला सांगून देईल्..चांगला बोकलून काढील तुम्हाला तो.."
तेवढ्यात टॉम जेरीचा पाठलाग करता करता एक मगर तिथे येते. ते तिघे कल्केनलिबे खात असतात. ते मर्कटांना पळवून लावून पाजोल ला वाचवतात.
शेवटी सगळे एकमेकांचे मित्र होतात.
नेहेमी खा: कल्केनलिबे - करा प्राण्यांशी दोस्ती.
३९. धुण्याची शुभ्र वडी
एका समारंभात नवरा बक्षीस घेतांना त्याचा सदरा मळलेला असतो.
त्याचे वरिष्ठ म्हणतात : " आजच्या दिवशी एवढा मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ? "
संतापून नवरा समोरच्या खुर्चीवर बसलेल्या बायकोकडे बघतो.
बायको म्हणते : " एक वेळ बदलून टाकेल मी नवऱ्याला, पण ... माझी धुण्याची साबण वडी नाही बदलणार! "
(पाहिलंत? आमच्या साबण वडीवर किती विश्वास आहे महिलांना!
आजच, आताच घ्या आमची वडी...)
40. कडक मोती
उठा उठा सकाळ झाली, साबण तोडायची वेळ झाली", असे म्हणत अनेक वर्षे त्या काकांनी साबण वेगवेगळ्या दरवाजांवर आपटला परंतु तो फुटला नाही. ते काका आता वयस्कर झालेत. आता तू उठ, जागा हो, तयार हो आणि जोरजोरात साबण दरवाज्यावर आपट! इतक्या जोराने की सीआयडी मधला दया पण लाजला पाहिजे. मग कोणत्या तरी सकाळी तो नक्की फुटेल. आणि त्या काकांना फुटलेला एक तुकडा दे. नाही फुटला तर तूही आपटत आपटत वयस्कर हो आणि मग तुझ्या नातवाला ही कामगिरी सोपव.
41. रेल्वे, चुना आणि टूथपेस्ट
एक माणूस धावत्या रेल्वेच्या डब्यात सकाळी बर्थवर उठून बसला आणि बसल्या बसल्या आपल्या ब्रशवर पांढरे पेस्ट टाकले. मग खिशातून त्याने एक पुडी काढली आणि जसे आपण कैरीवर मीठ टाकतो तसे त्या पेस्टवर त्या पुडीतले तपकिरी दंतमंजन शिंपडले.
तेवढ्यात बाजूच्या डब्यातून शर्टाला "फूल" लावून आणि एका हातात "काटे" घेऊन विजय देवगण सारखा दिसणारा तिकीट चेकर "गोलमाल गोलमाल" असे गाणे म्हणत म्हणत आणि ब्रिजेश खन्ना सारखे हातवारे करत गोल गोल फिरत फिरत त्या ब्रशवाल्या माणसाकडे आला आणि नवीन गाणे म्हणायला लागला, "चुना चुना, काथा काथा!"
ब्रशवाला माणूस हादरला आणि ब्रश खाली पडला.
तो माणूस चिडला आणि म्हणाला, "हे काय नवीन आता? त्यापेक्षा गोल माल गाणं बरं होतं की! आणि तिकीट चेक करायचं सोडून चुना काथा काय करत बसलात? आणि माझी पेस्ट कॉम्बिनेशन वाया घालवली!!"
विजय म्हणाला, "अरे, ती पांढरी टूथपेस्ट म्हणजे चुना आहे आणि ती तपकिरी दंत पावडर म्हणजे काथा! आणि तुझे दात त्यामुळे खराब होतील राजा! माझ्याकडे त्याऐवजी एक चांगला उपाय आहे!"
"कोणता उपाय? सिमेंट आणि वॉल पुट्टी लावू का मग दातांना? मी आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन गोष्टी एकत्र करून तो अनोखा संगम दातांना लावत होतो! आणि तुम्ही काय टीसीच्या कामासोबत कोणत्या नवीन टूथपेस्टची एजन्सी घेतली की काय? साईड बिझिनेस म्हणून?"
"होय! ही घे नवीन हिरव्या कलरची पेस्ट. यात चहापत्ती सहित पस्तीस जडी बुटी आणि अब तक छप्पन मसाले आहेत. यामुळे एकदा याने ब्रश केला तर दात हिरवेगार होतीलच पण आपल्याला चहा प्यायची सुद्धा गरज नाही!"
#निमिश्किल
.jpeg)
Comments
Post a Comment