जागतिक पुस्तक दिनानिमित्त (२३ एप्रिल)
आज २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आहे. पुस्तके आपल्याला वैचारिक स्थिरता, स्पष्टता आणि व्यापक दृष्टिकोन देतात. तेच आपले खरे मित्र आहेत. पुस्तकांवर तुम्ही "डोळे झाकून" विश्वास ठेऊ शकता कारण ते आपला कधीच विश्वासघात करत नाहीत. केव्हाही वाचलं तरीही पुस्तक त्याच गोष्टी सांगतं जे आधी सांगत होतं, बदलत नाही, उलट दर वेळेस तेच पुस्तक वाचलं तरीही बदलत्या काळानुसार त्याचे आणखी नव्याने संदर्भ उलगडत जातात. प्रत्येकच वेळेस स्वतःच्या चुकांतून शिकत गेल्यास आयुष्य अपूर्ण पडते. पण पुस्तकांद्वारे आपण इतरांच्या चुकांतून शिकून शहाणे होतो.
केवळ काही शिकण्यासाठीच नव्हे तर आपल्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी आणि निखळ मनोरंजनासाठी पुस्तके वाचू शकतो. एखाद्या विषयावर चित्रपट बघणे आणि कादंबरी वाचणे यात फरक आहे. कादंबरी वाचतांना आपण त्यातील व्यक्तिरेखा स्वतःच्या विचारशक्तीनुसार मनात कल्पतो तसेच वाचन मध्येच थोडे थांबवून एखाद्या प्रसंगावर विचार करू शकतो.चित्रपट बघतांना ती व्यक्तिरेखा जो अभिनेता साकारत आहे त्याचा जास्त प्रभाव आपल्यावर पडतो.
पुस्तके वैचारिक क्रांती घडवतात. कोणतीही क्रांती आधी मनात जन्मते, मनांतील विचारांत जन्मते. असं म्हणतात की पुस्तके म्हणजे जागृत देवता. त्यांची सेवा करून त्वरित फळ मिळवता येते. फ्रॅंक जाप्पा म्हणतो: सो मेनी बुक्स, सो लिटिल टाईम (ऑफ लाईफ) म्हणजे वाचायला भरपूर पुस्तके आहेत पण ती सगळी वाचणं शक्य नाही कारण आयुष्याचा वेळ हा मर्यादित आहे. जे पुस्तके वाचतात त्यांनी इतरांना पुस्तके वाचण्यास उद्युक्त केले पाहिजे, पुस्तके एकमेकांना भेट म्हणून दिली पाहिजेत.
आपले आयुष्य आणि प्रारब्ध कर्मानुसार घडते. कर्म करण्यापूर्वी आपण आधी मनात विचार करतो आणि विचारांना योग्य दिशा देण्याचे काम पुस्तके करू शकतात. त्यामुळे पुस्तके एखाद्याचे कर्म बदलवू शकतात.
पुस्तके कोणत्याही भाषेतली असोत किंवा मग अनुवादित असोत की मग एखादे कॉमिक्स असू देत ती आपली मित्रच! पण मातृभाषेतील पुस्तकांचा जो सखोल परिणाम आपल्यावर होतो तितका परक्या भाषेतील पुस्तकांचा होतं नाही! पुस्तके ही छापील तसेच ईबुक्स या दोन्ही प्रकारात मला वाचायला आवडतात. छापील पुस्तके प्रवासात घेऊन जायला मर्यादा येतात पण ईबुक्स मोबाईलमध्ये कितीही साठवता येतात आणि कुठेही घेऊन जाता येतात. पुस्तकदिनाच्या सर्वांना शुभेच्छा! हॅपी रिडींग! वाचत राहा! वाचाल तर वाचाल! वाचाल तर वाचाळपणा कमी होईल! वाचते रहो! SSSS
- निमिष सोनार
(एक पुस्तकप्रेमी)
23 एप्रिल 2019

Comments
Post a Comment