23 मार्च 1931 शहिद



आज मी बॉबी देओलचा "23 मार्च 1931 शहिद" हा चित्रपट प्रथमच पाहिला. निमित्त होते अर्थात आजच्या तारखेचे! म्हणजे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आजच्या दिवशी 1931 साली फाशी दिली गेली होती. काही ना काही कारणास्तव हा चित्रपट बघायचा राहून गेला होता. काल अर्धा आणि आज अर्धा असा पहिला. चित्रपटाची लांबी तीन तासांपेक्षा जास्त आहे. परंतु तरीही चित्रपट कंटाळवाणा होत नाही. मला तरी वाटला नाही!

आजकालचे अनेक चित्रपट बघितले असता त्यांचे डायलॉग बरेचदा नीट ऐकू येत नाहीत. पण हा (शहिद) 2002 सालाचा चित्रपट असल्याने डायलॉग व्यवस्थित ऐकू येत होते. त्यामुळे चित्रपट नीट समजत होता आणि चित्रपट नीट समजेल असा लिहिला होता, उगाचच फ्लॅशबॅक वगैरे न वापरता सरळ सरळ लिनीयर (सरळ रेषेत) कथा सांगितली आहे. यातील इंग्रजांनाही हिंदीत बोलायला लावल्याने चित्रपट समजायला सोपा होतो. त्यांना इंग्रजी भाषेत बोलायला लावून खाली हिंदीत भाषांतर देण्यापेक्षा, हे बरे!
मला इतिहासाची अखंड आवड असल्याने असे चित्रपट म्हणजे मला पर्वणी असतात. तसा एकदा मी खूप आधी अजय देवगणचा "लिजेंड ऑफ भगत सिंग" पहिल्याचं आठवतं. गंमत म्हणजे बॉबी देओल आणि अजय देवगण या दोघांचे भगत सिंग वरचे हे दोन चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले होते. कुणी म्हणतं तो चांगला आहे, बॉबी देओलच्या भगतसिंग पेक्षा! पण मला तर बॉबी देओलचा चित्रपट जास्त आवडला. बॉबी देओलने संयत अभिनय केला आहे. चंद्रशेखर आझादच्या भूमिकेत सनी देओल शोभतो. त्यानेही जास्त आरडाओरड न करता चांगला अभिनय केला आहे. तरीही बऱ्याच प्रसंगात फक्त सनी देओलच्याच तोंडी शोभतील असे धमाकेदार संवाद आहेत.
प्रथम मला वाटले होते की सनी देओलचे ऍक्शन चित्रपट दिग्दर्शित करणारा "गुड्डू धानोआ" हा माणूस, हा ऐतिहासिक चित्रपट कसा काय डायरेक्ट करेल? पण हा चित्रपट जमून आला आहे. केतन मेहताच्या "मंगल पांडे" आणि शाहरुखच्या "असोका" पेक्षा हा (शहीद) खऱ्या अर्थाने ऐतिहासिक बायोपिक वाटतो आणि अनेक पटीने चांगला चित्रपट म्हणता येईल.
सुखदेवच्या भूमिकेत "राहुल देव" ने चांगला अभिनय केला आहे. राजगुरू ला मात्र कथेत जास्त वाव देण्यात आलेला दिसत नाही.
चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकार एक दीड तास झाल्यानंतर येतात आणि त्यांच्या उपस्थितीमुळे आणि अभिनयामुळे ते चित्रपटात आणखी जान आणतात (ऐश्वर्या राय, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय).
थोडे विषयांतर करतो. आजकालच्या चित्रपटांत डायलॉग नीट ऐकूच येत नाहीत. पूर्वी सगळे डायलॉग हे शूटिंग संपल्यानंतर पुन्हा संवाद म्हणायला लावून डबिंग करत असल्याने तसेच संवाद हे खड्या आवाजात बोलले असल्याने नीट समजायचे.
आजकालचे चित्रपट चांगले नसतात असे माझे मुळीच म्हणणे नाही, मी फक्त स्पष्ट आणि अस्पष्ट डायलॉग डिलिव्हरी (संवाद फेक) बद्दल बोलतो आहे. अगदी अलीकडचा हृतिक आणि टायगरचा "वॉर" आठवा. त्यात बरेचदा हृतिक तोंडातल्या तोंडात काय बोलतो हे नीट समजतच नाही.
मला वाटते "लगान" पासून सिंक साऊंड ही टेक्निक सुरू झाल्यापासून डायलॉगचे पोस्ट प्रॉडक्शन डबिंग बंद झाले आहे. याबद्दल इतर तज्ञ मंडळी सांगू शकतील. मी तर फक्त एक सामान्य चित्रपट रसिक आहे आणि त्या दृष्टीने जे जाणवले ते लिहितो.

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली