फ्री चा फुगा!
तीन संतूर साबणासोबत एक पेन फ्री अशी जाहिरात बघितली आणि मला वाटले, पेन आणि साबण यांचा काहीएक संबंध नसतांना एकावर दुसरे फ्री नेमके कोणत्या कारणास्तव देत असतील?
बहुतेक तीन साबण वापरून संपले रे संपले की ती साबण वापरणारी महिला वयाने इतकी लहान होऊन जाते की मग तिला नोकरी सोडून शाळेत जावे लागते आणि मग शाळेत जायला पेन नाही का लागणार? तेही स्वत:च्या मुलीच्या वर्गात जाऊन!
त्वचा से उम्र का पता नही चलता! काय कमी समजला की काय तुम्ही साबणाला? मम्मी!! मम्मी??
मागे एकदा टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र क्लीन आणि क्लियर शाम्पू फ्री द्यायचे रविवारी! मुखपृष्ठाला चिकटवलेला असायचा! यामागचे कारण काय असावे?
रविवारी आळशी नवरे लोक टाईम्स वाचत पडत असतील तर त्यांना अंघोळीची आठवण करून द्यायला किंवा मग दर रविवारी शाम्पूने अंघोळ करायची असते याची स्त्रियांना आठवण करुन द्यावी म्हणून?
तसेच आमचे वर्तमानपत्र वर्षभर घ्या आणि काचेचे ग्लास, जेवणाचे डब्बे फ्री! वा! म्हणजे नुसते पेपर वाचू नका, जेवण पण करत जा असा मौलिक संदेश ते देत असतात.
मागे एका जाहिरातीत मोबाईल शॉपने एका विशिष्ट मोबाईलसोबत एल ई डी टीव्ही फ्री देऊ केला होता.
मला वाटते त्यांनी आता हेल्मेट सोबत एक हातोडा फ्री द्यायला हवा, म्हणजे तिथल्या तिथे दुकानावर हेल्मेट कच्चे की पक्के बघता येईल.
खरे तर ज्या गोष्टीवर एखाद्या दुसऱ्या गोष्टीची खरच गरज आहे ती मात्र कधीही कुणी फ्री देणार नाहीत.
म्हणजे बाईक सोबत हेल्मेट कुणी फ्री दिल्याचं ऐकलंय का कधी?
दुधाच्या पिशवीसोबत कधी बोर्नव्हीटा, चहा, कॉफी फ्री किंवा मग एक किलो चहा सोबत दीड लिटर दुध फ्री असं ऐकलंय का?
महिलांनी आरसा विकत घेतला की सोबत फेयरनेस क्रीम फ्री आणि पुरुषांना दाढीचे रेझर फ्री द्यायला हवं!
हॉटेल्समध्ये जेवण झाल्यावर हाजमोला फ्री, ज्वेलर्सकडे गेल्यावर प्रत्येक ग्राहकाला छोटासा हिरा फ्री द्यायला हवा नाही का?
अडकित्ता, सुरी, चाकू विकत घेतल्यावर बँडेजची पट्टी फ्री तसेच कैरी चिंचा विकत घेतल्यावर खोकल्याचे औषध फ्री, तिळाचे लाडू विकत घेतल्यानंतर दंतवैद्याची पहिली अपोइंटमेंट फ्री असे हवे!
ट्युब लाईट सोबत टॉर्च फ्री (लाईट वगैरे गेली तर), आरामखुर्ची विकत घेतल्यास एखादे लोकप्रिय पुस्तक फ्री द्यायला हवे,केशवर्धक तेलासोबत कंगवा फ्री द्यायला हवा, उन्हाच्या टोपी सोबत गॉगल फ्री द्यायला हवा, तीन प्लेट पाणीपुरी खाल्ली की पोटदुखीचे औषध फ्री, डेबिट कार्ड सोबत क्रेडिट कार्ड फ्री, महिनाभर पुण्याच्या पीएमटीने प्रवास करून दाखवल्यास अमेरिकेचा वर्षभराचा व्हिसा फ्री असे द्यायला हवे नाही का?
पण नाही! ते तसे देणार नाहीत.
हां, एक मात्र आहे! नेतेमंडळी कायम एक गोष्ट न मागता फ्री देत असतात! ते म्हणजे - आश्वासनं!
त्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागात दुष्काळ संपेपर्यंत शेतीला आणि पिण्यासाठी पाणी फ्री असे कुणी नेता का देत नाही?
वस्तूंचे उत्पादनाकर्ते विजोड आणि विसंगत वस्तू मात्र फ्री देतील. याचे नक्की एक कारण आहे. एक तर जी वस्तू फ्री मिळते आहे त्या वस्तूची विक्री होत नसते किंवा मग मूळ वस्तू बाजारात चालत नसते म्हणून बाजारात चालत असणारी वस्तू त्या मूळ उत्पादनासोबत फ्री देतात. मग त्या दोन्ही वस्तूंचा परस्पर संबंध असो किंवा नसो. पण ग्राहकांना हे कळून पण वळत नाही.
बरेचदा काहीतरी फ्री मिळतंय म्हणून जी नकोय ती वस्तू सुध्दा ग्राहक विकत घेतात. नंतर कळतं की मूळ वस्तू सोबतच फ्री वाल्या वस्तूची पण आवश्यकता नव्हती. काही वेळेस तर मूळ वस्तू आणि त्या सोबत फ्री मिळालेली वस्तू दोन्ही मार्केट मध्ये फ्लॉप असतात पण फ्रीच्या आयडिया मुळे बरेचदा दोन्ही वस्तू खपतात.
अशा विजोड जोडींमुळे मग पुढे भविष्यात खालीलप्रमाणे वस्तू मिळतील जसे -
प्रिंटर विकत घेतल्यास कात्री फ्री (चुकीचे प्रिंट आले की फाड कात्रीने कराकरा)
कुत्रा विकत घेतल्यास दगड फ्री (जास्त भुंकल्यास..)
तुरडाळ विकत घेतल्यास काळे खडे फ्री (दया, जरूर दाल मे कुछ काला हैं)
बाटा बूट विकत घेतल्यास टाटा स्काय फ्री
सायकल विकत घेतल्यास मिसळ पाव फ्री (म्हणजे "पोटभरून" सायकल शिकता येईल)
आइस्क्रीम विकत घेतल्यास गरमागरम कॉफी फ्री
इक्लेयर्स विकत घेतले तर फेविकॉल फ्री (इक्लेयर्स आजपर्यंत मी दुसऱ्यांदा खाण्याची हिम्मत केली नाही, कारण मला दात तोंडात शाबूत असलेले आवडतात)
सैफचा चित्रपट पहिला तर लेज वेफर्स फ्री
कुकरसोबत बासरी फ्री (म्हणजे कुकरने शिटी मारली की आपण इकडे बासरी वाजवायची, म्हणजे खिचडी संगीतमय वातावरणात शिजेल!)
अनिल कपूरला चित्रपटात घेतलं तर माधुरी फ्री
गोविंदा घेतल्यास करिष्मा किंवा रवीना फ्री
भुतांचा चित्रपट बनवायचा असेल तर मुकेश भट सोबत राम गोपाल वर्मा फ्री
सनी देओल आणि सुनील शेट्टी यांचा नाच म्हणजे प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परीक्षा असते, पण त्या सहनशक्तीचा अंत बघण्यासाठी काही निर्माते त्यांना डबल रोल घेतात, एकावर एक फ्री!

आजकाल हा फ्रीचा फुगा सगळीकडे फुगवून मिळतो पण तो थोडाच वेळ टिकतो आणि नंतर धाडकन फुटतो.

Comments
Post a Comment