भगवदगीतेबद्दल लेख






यापूर्वी अनेक विद्वानांनी गीतेवर छान भाष्ये केली आहेत. माझ्यासारख्या सामान्य माणसाला गीता पूर्णपणे समजणे आणि ती मी तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगणे अशक्य गोष्ट आहे. पण मला वाचून जेवढे काही आणि जसे काही थोडेफार समजले आहे, उमगले आहे ते मी तुमच्यापुढे मांडतो आहे. हा लेख वाचल्यानंतर भगवदगीता वाचण्याची तुम्हाला प्रेरणा मिळाली तर माझ्या लेखाचा उद्देश्य सफल झाला असे मी समजेन. चूक भूल द्यावी घ्यावी.

भगवंतानी सांगितलेल्या गीतेनुसार पुनर्जन्माला मान्यता असून, मागील जन्माचे काही कर्म ज्यांचे फळ त्या जन्मात मिळाले नव्हते ते प्रारब्ध बनून या जन्मात सोबत येते. त्यालाच आपण नशीब म्हणतो. आपल्या मागील जन्माच्या कर्माच्या प्रारब्धा नुसारच आपला जन्म कुठे आणि कुणाच्या पोटी व्हावा हे ठरत असते.

मानव तीन वेगवेगळ्या प्रकारचे कर्म करतो त्यापैकी काही कर्म याच जन्मात लगेच फळ देतात, काही याच जन्मात पण काही काळानंतर फळ देतात तर काही कर्म पुढील मानव जन्म मिळेपर्यंत (अनेक प्राण्यांच्या योनीतून तसेच स्वर्ग नरक यातून काही कर्म भोगून झाल्यावर उरलेले) तुमचे प्रारब्ध बनून तुमच्या सोबत येतात.

अर्थात ते मागच्या जन्मीचे कर्म आपल्याला आठवत नाहीत म्हणुन त्याचे फळ या जन्मी मिळाल्यावर आपण आश्चर्यचकीत होतो की, आपल्यासोबत इतके टोकाचे चांगले/वाईट का घडले? पूर्ण गीता वाचल्यास आणखी यासारख्या आणि इतर अनेक गोष्टी स्पष्ट होतात.

येथे एक लक्षात घ्या: भगवान किंवा भगवंत किंवा परमेश्वर हे समानार्थी शब्द आहेत. परम + ईश्वर = सुपर गॉड जे सगळ्या देव देवतांचे बॉस असतात. भगवंत!!

परमेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेतील काही श्लोकात सांगतात की, परमेश्वर म्हणजे ते स्वतः आणि इतर देव देवता यात फरक आहे.

इतर देव देवता यांना तुम्ही काहीही मागाल (नवस, वरदान वगैरे) तरीही ते देव देवता तुमच्या मागील जन्माच्या चांगल्या कर्माच्या शिल्लक असलेल्या (संचित) नुसारच फक्त तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाध्य असतात. बॅलंस नसेल तर कितीही पूजा करा काहीच उपयोग होत नाही.

भगवंतांच्या मर्जीविरूध्द कोणतेही देव देवता कोणाही मानवाला वरदान देऊ शकत नाहीत, असे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः गीतेत एका श्लोकाद्वरे सांगितले आहे.

देव देवतांची "पूजा" केली जाते आणि ती आपल्या काहीतरी इच्छांची पूर्ती करण्यासाठी असते पण भगवंतांची मात्र "भक्ती" केली जाते किंवा नामस्मरण केले जाते.

देव देवतांच्या पूजेसंदर्भात असलेल्या मंत्रांचे, जापाचे स्थळ काळा विषयी काही नियम असतात पण भगवंतांचे नाव मात्र कुणीही कधीही आणि केव्हाही घेऊ शकतो. त्याला कोणतेही बंधने नाहीत.

भगवंत या ब्रम्हांडातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत असतात. तसेच ते प्रत्येक सजीव प्राणीमात्रात आणि मनुष्यात परमात्म्याच्या रुपात स्थित असतात. तेच देव देवतांच्या शरीरात सुध्दा परमात्मा रूपाने वास करतात.

भगवंताचे नामस्मरण करून आणि भक्ती करून आपण काहीही मागू नये. फक्त त्याला विनंती करावी की आपल्या आत्म्याची जन्म मरणाच्या फेऱ्यातून आणि विविध योनीतून फिरत राहण्याच्या चक्रापासून सुटका करावी. यालाच "आत्म्याची मुक्ती" असे म्हणतात. मुक्ती म्हणजे आत्म्याची अशी स्थिती ज्यात तो आत्मा पुढे कोणतेही शरीर धारण करण्यास बाध्य होत नाही.

यावर कुणी सहज प्रश्न विचारेल की शेवटी आपण भगवंताला सुध्दा काहीतरी मागतोच आहे (जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका आणि आत्म्याची मुक्ती) मग हे मागणे देव देवतांना मागितलेल्या गोष्टींसारखेच नाही का झाले? मग फरक काय राहिला?

याचे उत्तर असे आहे की प्रत्येक आत्म्याची या भौतिक जगतातून मुक्ती व्हावी आणि तो आत्मा कायम भगवंताकडे राहण्यास यावा ही मुळात भगवंतांचीच इच्छा असून यात आपण भगवंतांकडे मानव जन्मातील भौतिक इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा व्यक्तीची मागणी करत नाही आहोत. म्हणूनच या इच्छेला अध्यात्मिक इच्छा म्हणतात जी भगवंत (परमेश्वर) पूर्ण करतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष नुसार मानव जन्माचा अंतिम उद्देश्य मुक्ती हाच आहे (अध्यात्मिक इच्छा). आत्मा मुक्ती मिळवून कायम भगवंताकडे जाणे यालाच आपण "आत्मा हा परमात्म्यात विलीन झाला" असे म्हणतो!

याउलट इतर देव देवतांना मागितलेल्या इच्छा या अध्यात्मिक नसून भौतिक प्रकारच्या असतात ज्या कर्म फळ यांची साखळी निर्माण करून पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या योनीच्या रूपात आपल्याला भौतिक जगात जन्म घ्यायला भाग पाडतात.

कृष्ण सांगतात की आपला आत्मा सनातन असतो, तो कधीही मरत नाही, एकतर तो मुक्त होतो किंवा अनंतपणे आपल्या कर्मानुसार विविध शरीर प्राप्त करत जातो.

म्हणून भगवंत म्हणतात की -

जर जन्म मरणाच्या 84 लक्ष्य योनीच्या अनंत सुरु असणाऱ्या चक्रात अडकायचेे असले तर देव देवतांची पूजा करा आणि त्या चक्रातून सुटका हवी असेल तर भगवंतांची "भक्ती" करा. नामस्मरण करा. त्याला काहीही भौतिक इच्छा मागू नका.

आता प्रश्न पडतो की मनुष्य भगवंताचा अंश आहे आणि भगवंत परमात्म्याच्या रूपाने प्रत्येकाच्या शरीरात रहात असतात मग तो वेगवेगळी चांगली वाईट कर्मे का करतो?

याचे उत्तर गीतेनुसर असे देता येईल की, कोणत्याही मनुष्यावर भगवंतांनी निर्माण केलेल्या रजो, तमो आणि सत्व या तीन गुणांचा कमी अधिक प्रमाणात प्रभाव असतो. हे गुण देऊन भगवंतांनी मनुष्याला आंशिक स्वातंत्र्य बहाल केले आहे. यातील कोणताही गुण निवडून मनुष्य त्याला पाहिजे तसा वागू शकतो. भगवंत त्यात हस्तक्षेप करत नाहीत. पण त्या वागण्यातून निर्माण होणाऱ्या कर्माच्या फलातून मात्र त्याची सुटका नाही. ते फळ केव्हा, कसे, कधी मिळेल हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मानवाला नाही. तसेच नमके कोणते कर्म चांगले (पुण्य) आणि कोणते वाईट (पाप) हे ठरवण्याचा अधिकार मानवाला नाही. कारण कोणतेही कर्म व्यक्तीसापेक्ष असते. जेव्हा मनुष्य वाईट वागत असतो तेव्हा परमात्मा (ज्याला आपण आपला आतला आवाज म्हणतो) आपल्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतच असतो. आपण अनेकदा याचा अनुभव घेतला असेलच.

थोडक्यात, या तीन गुणांच्या प्रभावामुळेच या भौतिक जगतात कोणताही मनुष्य चांगले वाईट कर्म करत असतो. इतर प्राण्यांना मात्र कर्माचे नियम लागू नसतात, म्हणूनच कोर्टात सुध्दा कायद्याने आपण माणसाला खाल्ल्याबद्दल वाघाला खुनाच्या शिक्षेखाली अटक करू शकत नाही.

ब्रम्हा हे रजो गुणाचे, विष्णू हे सत्व गुणाचे आणि शंकर हे तमो गुणाचे प्रतिनिधी आहेत. भगवंत वगळता इतर सर्व प्राणी, मनुष्य आणि देव देवता सुध्दा कर्माच्या नियमांनी बांधले आहेत. कारण सर्व देव देवता सुध्दा तीन गुणांच्या प्रभावाखाली येतात. एकूण 84 लक्ष्य योनीमध्ये देव देवता सुध्दा अंतर्भूत असतात. मात्र भगवंत स्वतः (श्रीकृष्ण) मात्र त्रिगुणातीत आहेत. (म्हणजे या तीन गुणांच्या प्रभावापलीकडे आहेत)

पुढे कोणताच जन्म मिळू नये यासाठी तीन गुणांचा आपल्यावरील प्रभाव नष्ट करावा लागतो त्यासाठी भगवंतांनी एक मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे या मानव जन्मातील कर्मे अलिप्तपणे करावी म्हणजे फळाची अपेक्षा न करता! (मनाने अलिप्त किंवा विरक्त होऊन) तसेच सुखात आनंद आणि दुःखात शोक करू नये, म्हणजे तटस्थ राहावे! पण फक्त हाच एकमेव मार्ग नाही. भगवंतांनी इतरही अनेक मार्ग सांगितले आहेत ज्याद्वारे आपण तटस्थपणे कर्म करू शकतो किंवा कर्मांचा त्याग करू शकतो आणि मुक्ती मिळवू शकतो. उदाहरणार्थ - भक्तीयोग! हा आणि इतर सगळे मार्ग कोणते हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण गीता वाचणे योग्य होईल.

आणि येथे अर्थातच देव देवता आणि भगवंत अस्तित्वात आहेत की नाही या चर्चेला सुध्दा पूर्णविराम मिळतो कारण स्वतः भगवंतांनी प्रत्यक्ष अवतार घेऊन अर्जुनाला कर्म फळ सिद्धांताचा उपदेश केला (भगवदगीता) जो आपला मूलभूत आधार ग्रंथ आहे.

तात्पर्य: भगवंत आणि देव देवता अर्थातच अस्तित्वात आहेत हे सिद्ध होते.

धन्यवाद! चूक भूल द्यावी घ्यावी.

- निमिष सोनार, पुणे



Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली