हिम्मतवाली आंखे आणि रात बाकी

खूप लहानपणी हिंदी पूर्णपणे कळत नव्हतं तेव्हा रेडियो वर हिंदी गाणी लागायची तर त्यांचे चुकीचे lyrics मनात बसले. ती गाणी आज ऐकली की पूर्वीच्या चुकीच्या शब्दांना हसायला येतं. जसे की कारवा मधले रफीचे हे गाणे - कितना प्यारा वादा है "हिम्मतवाली" आंखो का! (इन मतवाली). मतवाली असा शब्द असतो हेच तेव्हा माहिती नव्हते.
---
सजन रेडियो बजैय्यो बजैय्यो जरा हे गाणे मोठ्याने अनेक वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होते हे ऐकून मला शंका आली की रेडिओ ऐकण्याचे सलमानचे आवाहन लोकांनी खूपच सिरियसली घेतलेले दिसते आहे. लोकांची संगीताची आवड अचानक ट्युबलाईट सारखी कशी काय पेटली? हे गाणे एवढे कसे हिट झाले? मग लक्षात आले की हे गाणे लोक स्वतःहून ऐकत नाही आहेत तर एफ एम रेडियो वर ते गाणे पुन्हा पुन्हा वाजवत आहेत म्हणून लोक ते ऐकत आहेत, बाकी काही नाही. नाहीतरी लोकांनी गाणी पुन्हा पुन्हा टेप रेकॉर्डर वर लावून घरोघरी, पान टपऱ्यांवर आणि ढाब्यावर ऐकणे हे आजकाल कमी झाले आहे. एकूणच बॉलिवूडच्या संगीतकार, गायक आणि गीतकार यांची सर्जनशीलता कुठेतरी हरवली आहे का? गुणगुणावी आणि कर्णमधुर अशी गाणी आजकाल हिंदी आणि मराठी चित्रपटातही फार कमी तयार होत आहेत. पूर्वी चांगले संगीत, गीत बनवणाऱ्यां पैकी आजही काही संगीतकार आणि गीतकार तेच आहेत, पण त्यांचा सूर कुठेतरी हरवल्यासारखा दिसतो. 
---

नव्या इत्तेफाकच्या रिमेक मधले "रात बाकी" ऐकल्यावर युट्यूब वर मूळ गाणे सर्च केले तेव्हा कळले की ते गाणे जुन्या इत्तेफाक मध्ये नव्हते तर ते नमक हलाल मध्ये होते आणि अजून एक इत्तेफाक म्हणजे जुन्या गाण्यात इत्तेफाक हा शब्दच नाही. 
बरं ते असो! नमक हलाल मधले ते गाणे पाहिले तर मला गंमत वाटली. परवीन बाबी उभी असते. शशी कपूर आणि अमिताभ पण (बिचारे) उभे असतात. कसलीतरी पार्टी चालू असते बहुतेक! अचानक बप्पी लाहिरीची डिस्को धून सुरु होते आणि झटका बसल्यासारखी परवीन नाचू लागते. 
बराच वेळ जातो. ती प्रामाणिकपणे बिचारी नाचतच असते आणि मनात सुप्त इच्छा बाळगत असावी की या दोघांपैकी कुणीतरी तिच्यासोबत डान्स करायला येईल पण कसले काय? दोघंचे दोघं मठ्ठपणे उभेच असतात. 
भरीस भर म्हणून चेहऱ्यावर पांढरी पारदर्शक चादर गुंडाळून तिथे काही गुंड टाईपची माणसे उभी असतात तेही मख्खपणे! शेवटी परवीनची मेहनत बघून शशी कपूर मधला खेळकरपणा जागृत होतो आणि बिचारा तिला जास्त हसत कमीकमी नाचत साथ देतो.
(सूचना: हे लिखाण सहज म्हणून घ्यावे. मनोरंजन म्हणून मी लिहिले आहे. वरील situation चां चित्रपटातील कथेशी संबंध असेलही पण मी "नमक हलाल" बघितलेला नसल्याने कदाचित माझा वरीलप्रमाणे ग्रह झाला असावा.)
टीप: निमिषने अजून "नमक हलाल" का पहिला नाही असा प्रश्न विचारू नये! विचारल्यास मी तुम्हाला उलट प्रश्न विचारेन की तुम्ही अजून "मिरर गेम" हा चित्रपट का पहिला नाही?
मग तुम्ही विचाराल की मिरर गेम हा हिंदी चित्रपट आहे की इंग्रजी?? 



Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली