बेधुंद


पुस्तक परीक्षण: बेधुंद
लेखक: अविनाश लोंढे
मेहता पब्लिशिंग हाऊस

अविनाश लोंढे हा फार हिम्मतवाला लेखक. कॉलेज लाईफ "जसे आहे तसे" मांडायची हिम्मत त्याने केली आणि त्याला जे म्हणायचे आहे ते जसेच्या तसे आपल्यापर्यंत त्याने पोहोचते केले सुद्धा. तो माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान पण तरीही अल्पावधीतच आमच्यात विचार जुळल्याने फेसबुकवर मैत्री झाली. मैत्रीसाठी वय हा अडसर कधीच नसतो.

मी एक वाचक तसेच एक लेखक म्हणून सुद्धा "बेधुंद" कादंबरीचा रिव्ह्यू (परिक्षण) लिहित आहे. कादंबरी लिहितांना कोणत्याही पात्राला न्याय देण्यासाठी त्या पात्राच्या आयुष्यातील सगळ्याच पैलूंचा विचार करणे आवश्यक असते. मग जीवनातील महत्वाच्या इतर पैलूंप्रमाणे महत्वाचा असलेला प्रेम आणि सेक्स हा विषय का बरे लिहितांना व्यर्ज करायचा? काही लेखक तसे करतात पण अविनाशनेे तसे बिलकूल केलेले नाही (जसे मीसुद्धा माझ्या सिनेटिव्ही क्षेत्रावरील "वलय" कादंबरीत जसे आहे तसे सगळे मांडले आहे).

"बेधुंद" मधल्या पात्रांच्या (असलेल्या किंवा नसलेल्या) सेक्स लाईफचा उल्लेख जसाच्या तसा आला आहे आणि तेसुद्धा संयमाने आणि एक विशिष्ट अलिखित लाईन क्रॉस न करता! पण हे असं लिहिणंसुद्धा एक कला आहे. सगळ्यांनाच ते जमेल असं नाही, नाहीतर कादंबरीचा बी ग्रेड मूव्ही व्हायला वेळ लागत नाही!!

आजचा मराठी तरुण वाचक हा सिडने शेल्डन, चेतन भगत, प्रीती शेनॉय, अरविंद अडिगा वगैरे सारख्या लेखकांनी लिहिलेल्या (मूळ इंग्रजीत असो की मराठी अनुवादित असो) बोल्डनेसला जसा स्वीकारतो तसाच आपल्या ओरिजिनल माय मराठीत लिहिलेल्या या बोल्ड कादंबरीला सुद्धा आपण मराठी वाचकांनी नाके न मुरडता स्वीकारायला हवे!

मेहता पब्लिशिंग हाऊसने सुद्धा अविनाशच्या धाडसाला साथ दिली याबद्दल यायचे आभार! या पुस्तकापासून मराठी कादंबऱ्यांत नवा बोल्डनेसचा ट्रेंड सुरू झाल्यास नवल नाही. अविनाशने कादंबरीत मराठी सोबतच गरजेनुसार जसे हिंदी इंग्रजी वापरले आहे तसेच या बुक रिव्ह्यूमध्येही मी ते वापरले आहे. मी जरी माझे इंजिनियरिंग आय आय टी" सारख्या कॉलेजमधून केले नसले तरी मी सहजपणे या कादंबरीशी त्यातील वातावरणाशी कनेक्ट होऊ शकलो आणि तुम्हीही व्हाल! (विशेषतः इंजिनिअरिंग वाले!)

या कादंबरीत शिव्या, धूम्रपान, दारू वगैरेंची वर्णने असली तरीही मी वैयक्तिकरित्या स्वतः या सर्व गोष्टींचे समर्थन करत नाही आणि स्वतः मला कोणतेही व्यसन नाही किंवा मी स्वतः कुणालाही शक्यतो शिव्या देत नाही (मला भरपूर मित्र असले तरीही).

पहिल्या तीन चार पानांपासूनच कादंबरीचा बेधुंदपणा, बिनधास्तपणा आपल्या मनात आणि मनातून थेट हृदयात शिरतो. कथा फ्लॅशबॅक पद्धतीने आपल्यापुढे उलगडते आणि अगदी पहिल्या दोनचार पानांतच तीनचार फ्लॅशबॅक लेव्हल्स आहेत. सुरुवातीला इतक्या लेव्हल बघून कथेची लिंक तुटण्याची काळजी वाटली पण नंतर पुढे वाचत गेल्यावर कळलं की खरंच कथेच्या फ्लो साठी ते खूप आवश्यक होतं.

सुरुवातीला या कादंबरीची तुलना नकळत चेतन भगतच्या फाईव्ह पॉईंट समवन (थ्री इडियट्स) किंवा सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारीशी होऊ लागते पण नंतर जाणवायला लागते की "बेधुंद" ची जातकुळी काही वेगळीच आहे. ही कादंबरी सुपरफास्टवेगाने पुढे सरकते. कुठेही रेंगाळत नाही. जास्त फाफटपसारा नाही. यात फाईव्ह स्टार गृप आहे म्हणजे पाच मित्र - जयंत, अण्णा (स्वप्नील), सुरेश, समीर आणि अक्षय.

रॅगिंगचे प्रसंग जिवंत आणि मिश्किल वाटतात. कोणतीही आडकाठी आणि सेन्सॉर न करता मांडलेले. सुरेशने अजित सर या सिनियरला मारलेली लाथ हा प्रसंग अगदी सिनेमात शोभेल असा. आणि त्यानंतर घडणाऱ्या घटना पण अगदी अफलातून!!

या कादंबरीतील प्रसंग खरे घडलेले असतील किंवा काही काल्पनिकही असतील पण महत्वाचे हे आहे की ते वाचकांसमोर कशा पद्धतीने मांडले आहेत आणि सगळे प्रसंग आणि पात्रांच्या भावना वाचकांपर्यंत हुबेहूब पोहोचवण्यात लेखक यशस्वी होतो. योग्य ठिकाणी चपखल शब्द आणि वाक्य पेरल्याने अर्थ आणखी गहिरा होतो.

कादंबरी विनोदी अंगानं पुढे सरकत जाते. सुरेश ट्रेन मध्ये तिकीट काढत नाही तेव्हा TC पासून वाचण्यासाठी त्याने केलेल्या क्लुप्त्या वाचून हसू आवरत नाही. विशिष्ट one liners आणि चटपटीत संवादांमुळे पानापानांवर हास्याचे फवारे उडतात.

रॅगिंग प्रकरणानंतर मग नकळत अश्विनी रोहित आणि अक्षय सोनियाच्या प्रेमकथेत आपण ओढले जातो. या स्टोरीत लव्ह ट्रँगलस पण आहेत. (अमित आणि सुरेश वगैरे) मग फाईव्ह स्टार गृपला सचिन सर जे मार्गदर्शन करतो ते महत्वाचे आहे.

तसेच रोहितने अश्विनीला फसवल्याने रोहितला फाईव्ह स्टार्सने शिकवलेला धडा हा प्रसंग छान जमून आला आहे. त्यानंतर सगळेजण गुपचूप पुन्हा लायब्ररीत जातात हा प्रसंग वाचतांना धूम मधले चोर हे चोरी करून चुपचाप 'आम्ही नाही त्यातले" या अविर्भावात पुन्हा पिझा सेंटरला जॉईन होतात हा प्रसंग आठवला.

मग नंतर रोहितचे काय होते त्यासाठी ही कादंबरी वाचायला हवी.

मग सुरू होतं कादंबरीत सुरुवातीला थोडी झलक दाखवून गायब झालेलं much awaited जयंत आणि हर्षला यांचं प्रेमप्रकरण! अर्थात ही सुरुवातही मिश्किल आणि बरीच विनोदी अंगाने होते. आता फाईव्ह स्टार्स गृप सिनियर म्हणजे सेकंड ईयरला आलेला असतो.

मग एक मेस कमिटीचे प्रकरण येते आणि मग पुन्हा जयंत हर्षलाचे प्रेम प्रकरण वेग घेते.

मग येणारा अक्षय सोनियाचा शेवटच्या भेटीचा प्रसंग अगदीच खास! आणि मग सोनियाला विसरण्यासाठी चाललेला अक्षयचा आटापिटा जरी आपल्यासमोर विनोदी पद्धतीने येतो तरीही कुठेतरी त्यातला pain आपल्याला जाणवतोच.

नंतर सुरेश आणि पियाची ई लव्ह स्टोरी येते. पण त्यांच्या प्रेमकहाणीचा शेवट अतिशय वेगळाच म्हणजे पेन ड्राईव्हचा दगडाने चुरा करून होतो. कादंबरीचा काळ 2006 च्या आसपासचा आहे म्हणून selfie, Whatsapp, facebook, twitter, instagram वगैरेचा उल्लेख यात अर्थातच नाही आहे. येथे gtalk आहे, चॅटरूम्स आहेत. ईमेल आहेत.

कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी करतांना येणारे डायलॉग बरेच धाडसी वाटतात. तसेच फायनल इयर सुरू झाल्यानंतर होस्टेलवर रेपबद्दल चर्चा होते ते सुद्धा डायलॉग्ज धाडसी. लेखकाने सामाजिक प्रश्नांबद्दल युवकांना काय वाटते हे यातून चांगल्या पद्धतीने अधोरेखित केले आहे.

जयंत आणि हर्षलाची आई यांचे फोनवर एकमेकांशी प्रथमच बोलतांनाचे डायलॉग वाचून खूपच धमाल आणि मजा येते. मग होते जयंतचा भाऊ रणजित याची दमदार एन्ट्री आणि पुढचे धमाल प्रसंग. या कादंबरीत जवळपास प्रत्येक गंभीर प्रसंगात सुद्धा थोडी तरी मिश्किल विनोदाची पेरणी आहे हे लेखकाचं एक ठळक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे.

"तू प्रेग्नंट झालीस तर?"
"नाही होणार वेड्या, अरे माझं बारावीला बायोलॉजी होतं",

"तू हर्षला ला शेवटचं कधी 'केलंस'?"
"नाही रे, मी तिला फक्त एकदाच 'केलं' आहे! "अशा प्रकारचे आजच्या पिढीची सेक्स कडे बघण्याची liberal आणि सहज मानसिकता दर्शवणारे unique innovative डायलॉग मजा आणतात.

जयंत आणि हर्षला यांच्या लव्ह स्टोरीचा आणि एकूणच कादंबरीतील कथानकाचा शेवट काय होतो ते अनुभवायला कादंबरीच वाचायला हवी. कादंबरीच्या शेवटी काय होते याबद्दल मी मुद्दामहून लिहीत नाही कारण लिहायला शब्द अपुरे पडत आहेत. शेवटी खूप मोठी ट्विस्ट आहे हे मात्र सांगावेसे वाटते.

कसलाही मागचा पुढचा विचार न करता बेधुंद कॉलेज लाईफ जगणाऱ्या कॉलेज युवक युवतींनी तर ही कादंबरी नक्कीच वाचायला हवी आणि ज्या पालकांची मुलं नुकतेच कॉलेजला प्रवेश करणार आहेत त्या पालकांनी तर ही कादंबरी अवश्य वाचावी!! पालकांनी यासाठी ही कादंबरी वाचावी की त्यांना आपल्या तरुण मुला मुलींची मानसिकता समजून घेता येईल, त्यांना कशा पद्धतीने रॅगिंग सारख्या प्रसंगातून जावं लागतं हे समजेल, जेणेकरूनत्यांना आधार देता येईल.

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली