चक्रवर्तीन अशोक सम्राट!



नुकतीच कलर्स या वाहिनीवर "चक्रवर्तीन अशोक सम्राट" ही मालिका सुरु झाली आहे आणि सोम-शुक्र रात्री ९ वाजता. ५० मिनिटे हि मालिका दाखवली जात आहे. सुरुवातीची ३५ मिनिटे एकही ब्रेक नसतो. सुरुवातीचे तीन एपिसोड झकास जमून आले आहेत. पहिल्याच तीन भागात मराठीतले कसलेले कलाकार आपला सुंदर अभिनय सादर करत आहेत. मनोज जोशी चाणक्य बनलाय. समीर धर्माधिकारी बिंदुसार झालाय, पल्लवी सुभाष धर्मा/शुभ्रदंगी झालीय. अधून मधून चाणक्यला स्वप्नातून किंवा शकून म्हणून दर्शन देणारा आणि मार्गदर्शन करणारा सिंह (सम्राट चंद्रगुप्ताचा आत्मा) ही संकल्पना झकास जमून आलीय. तसेच चाणक्य मेल्यानंतर बहुतेक त्याचा आत्मा सूत्रधारा सारखा त्याची "चाणक्य नीति" आपल्याला सांगत राहाणार आणि गोष्ट पुढे नेणार असे वाटते आहे, जसे कृष्ण महाभारतात सांगायचा तसेच! अर्थात अजून सिरीयल मध्ये चाणक्य जिवंत आहे. नितीन देसाई चा सेट छान आहे. पुन्हा एकदा! श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत.
स्पेशल इफेक्ट छान आहेत.थोडे नाट्य जास्त आहे पण ठीक आहे, त्याने मनोरंजन मूल्यही वाढते आणि सोबत आपल्याला अशोकाची जीवनकथा सुद्धा कळते.

यात शुद्ध हिंदी बोलणारी जर्मन अभिनेत्री सुद्धा आहे ,जिने हेलेना चे काम केले आहे.
हेलेना हि सेल्युलस निकेटर ची मुलगी आणि चंद्रगुप्त मौर्य ची पत्नी. बिंदुसार ची सावत्र आई. सेल्युलस निकेटर हा अलेक्झांडर चा सेनापती असतो. खुरासन नावाचे एक पात्र आहे जे नूर या आपल्या मुलीचा विवाह बिन्दुसार शी करून मगध हडप करण्याच्या मार्गावर असतो.

आतापर्यंत ची कथा:

हेलेना (सम्राट अलेक्झांडर च्या सेनापतीची मुलगी) आपल्या जस्टीन या मुलाच्या मदतीने बिंदुसारला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करते. सुभद्रांगी त्याला वाचवते जिच्याशी लग्न करून बिंदुसारला काही कारणास्तव पुन्हा मगध मध्ये परतावे लागते. बिन्दुसार ला त्याचेवर हल्ला कुणी केला/करवला हे कळत नाही. मगध चा राजा जस्टीन ला बनवण्याचा हेलेनाचा डाव फसतो. दरम्यान चाणक्यवर बिंदुसार च्या आईवरच्या विष प्रयोगाबद्दल शंका घेतली गेल्याने तो दूर राहून अर्थ शास्त्र लिहितो. सुभद्रांगी (धर्मा) चा मुलगा अशोक मोठा होतो. दरम्यान एका युद्धात जखमी झाल्यावर बिंदुसार वर उपचार चालू असताना पुन्हा हेलेना त्याचेवर विषप्रयोग करते....तेव्हा चाणक्य असे योगायोग घडवून आणतो की सुभद्रांगी चा बिंदुसार बद्दलचा गैरसमज दूर व्हावा (जो खुरासन या राज्यकर्त्याने निर्माण केला असतो - तिला आणि पोटातल्या अशोक ला मारण्याचा प्रयत्न बिन्दुसारच्या नावे करून!) आणि तिचा मुलगा अशोक हा सम्राट व्हावा. बिंदुसार बरा झाल्यावर अशोक त्याच्या काही छोट्या अपराधांसाठी दंड म्हणून पाटलीपुत्रात तबेल्यात सेवक म्हणून राबत आहे. अजून बिंदुसार ला माहित नाही की अशोक त्याचा मुलगा आहे आणि धर्मा (सुभद्रांगी) जिवंत आहे. आता सियामा आणि सुशीम यापैकी कुणाला युवराज घोषित करायचे याबाबत खल सुरु आहे. सध्या एक दानव पण तेथे धुमाकूळ घालतोय.

सर्वांनी ही मालिका बघावी अशी माझी इच्छा आहे. विनंती आहे. बाकी आपली मर्जी. जे बघतील त्यांनी आपली मते मतांतरे येथे मांडावीत ही अपेक्षा!

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली