क्रांतीकारी कुटुंब

भारतात एक क्रांतीकारी कुटुंब आहे.

त्या कुटुंबाची, त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात सर्वांना माहिती व्हावी म्हणुन या लेखाचा प्रपंच.

त्या कुटुंबाचे प्रमुख म्हणजे वडील यांनी अनेक कुटुंबांना पोलीओ चे महत्त्व समजावून सांगितले आहे.
अनेक जाहिरातीत सुद्धा ते अधून मधून विविध वस्तूंचे महत्त्व लोकांना समजावतात.

तसेच सध्या एका कार्यक्रमाद्वारे अनेकांना करोडो रुपये वाटत आहेत.

खुप साधे सोपे सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारुन विचारुन ते अनेकांना श्रीमंत बनवत आहेत.

तिथे जायचा कंटाळा असेल तर घरीच बसून तुम्ही लखपती सुद्धा होवू शकता बरे का, लोकांनो!

याहून पैसे मिळवणे सोपे ते कसे असू शकेल बरे?

म्हणजे एक प्रकारे देशाची गरिबी मिटण्यास हा एक हातभार आहे, नाही का?

हळू हळू हा देश जगातील सर्वात श्रीमंत देश होईल यात शंकाच नाही!
आता सांगा याला भारतातली नवी क्रांती नाही म्हणणार तर काय, मित्रांनो?

तसेच त्या कार्यक्रमात नेहेमी येणार्‍या जाहिरातीत त्या कुटुंबातला त्यांचा मुलगा अनेक भारतीयांच्या समस्या एका "चुटकी सरशी" सोडवतो आहे.
तेही न बोलता.

आजवर अनेकांना प्रश्न भेडसावत होता की एका राज्यातल्या व्यक्तीला दुसर्‍या राज्यात नोकरी मिळाली तर काय करायचे?

तसेच, भारतातल्या एका राज्यातल्या व्यक्तीचे दुसर्‍या राज्यातल्या व्यक्तीवर प्रेम बसले तर करायचे तरी काय?

कारणः डिक्शनरी चा शोध तर अजून लागायचा आहे.

दुभाषे सुद्धा अलिकडे मिळेनासे झालेत.

आणि इंटरनेट वर पण तशी मदत नाही.

आणि भाषा शिकवणारे पुस्तके तर अस्तित्वातच नाहीतच नाहीत.

अरे देवा? काय करावे तरी काय भारतीय लोकांनी?

तुच सोडव रे बाबा आम्हाला या समस्येतून....

अशा परिस्थितीत, या मुलाने म्हणजे त्या कुटुंब प्रमुखाच्या मुलाने एक "कल्पना" सगळ्यांना दिली.

तुमच्या जवळ "कल्पना" चा नंबर असला की झाले बरं का मित्रांनो...

फक्त एकच (खर्चीक!) कॉल करा आणि भाषा शिका.

आणि त्यातून आणखी नवीन कल्पना अस्तित्वात आली आणि नसानसांत भिनली:
"बोलण्यासाठी भाषेची गरज नसते बर का मित्रांनो."

तुम्हाला हे माहित होते का?

नाहि बुवा. आजपर्यंत आम्ही बोलण्यासाठी भाषाच वापरत होतो.

ग्रेट ती कल्पना. ग्रेट तो मुलगा.
आता सांगा याला भारतातली नवी क्रांती नाही म्हणणार तर काय, मित्रांनो?

कुटुंबातली सून म्हणजे त्या मुलाची बायको अधून मधून लोकांना स्वच्छ राहाण्याची प्रेरणा देते.
आंघोळ केल्यावर लपंडाव कसा खेळावा, मजेत कसे जगावे हा संदेश त्यातून मिळतो आणि सारा देश स्वच्छतेत न्हावून निघतो.

तसेच सुंदर कसे बनावे याचेही ती अखिल भारतीय मुलींना प्रशिक्षण देते. कोणकोणते क्रीम वापरून तिच्यासारखी गुळगुळीत त्वचा मिळते हे रहस्य ती सर्वांसोबत शेअर करते.

तसेच लग्न केल्याचे दुष्परिणाम सुद्धा ती एका चित्रपटाच्या गाण्याद्वारे लोकांना समजावून सांगत असते.
लग्न ही एक आयुष्यभराची गुलामगिरी असून ज्याने जगात सर्वप्रथम लग्न केले त्याला "शरिराच्या अशा जागेवर" मारण्यास ती उद्युक्त करते की तो पुन्हा प्यायला पाणी मागणार नाही.
यात तीला एका लांब केस वाढवलेल्या "चिरंतन" कुमाराची मदत मिळते आहे.

आता सांगा याला भारतातली नवी क्रांती नाही म्हणणार तर काय, मित्रांनो?

आणि हे कुटुंब क्रांतीकारी कुटुंब म्हणून मान्यता पावेल यात शंकाच नाही.

* * * 

ऑफिसचा कॉन्फरन्स कॉल होता पण घरचे वायफाय अचानक बंद झाले म्हणून सेवा पुरवठादाराच्या (सर्व्हिस प्रोव्हायडर) ऑफिसमध्ये फोन केला. आधी अमिताभ कोविडबद्दल हिंदीत बोलायला लागला. मग इंग्रजीत. 

तोपर्यंत वायफाय आपोआप चालायला लागले. 

अजूनही अमिताभचे कोविड लेक्चर संपलेच नव्हते. फोन केला आहे हे पण मी विसरून गेलो होतो. तेवढ्यात - 

"हॅलो सर!", फोनमधून आवाज आला.

"आँ? कोण? ओके ओके! तुम्ही आहात होय? अच्छा! वायफाय बंद पडले होते म्हणून मी फोन केला होता, पण अमिताभमुळे दुरुस्त झाले!", मी म्हणालो आणि फोन कट केला.

* ** 
आजकाल बक्षीस देण्यासाठीच्या काही रेडीओ/टि. व्ही वरच्या कार्यक्रमांत असे काही प्रश्न विचारतात (आणि उत्तरासाठी असे हास्यास्पद पर्याय देतात) की हसावे की रडावे ते कळत नाही. 

बक्षीस दिले जाते आणि वस्तूची जाहिरात पण होते. 

नमस्कार! आम्ही आपल्याला काही प्रश्न विचारणार आहो. 

नीट उत्तरे द्या. 

सगळी उतरे बरोबर देणाऱ्याला जगप्रसिद्ध महागडा टि. व्ही. मोफत. 

पहीला पश्न : अमिताभ कोण आहे? मनुष्य २. प्राणी ३. अभिनेता ४. परग्रहवासी ५. नृत्य दिग्दर्शक 

दुसरा प्रश्न : पृथ्वी चा आकार कसा आहे? 1. त्रिकोणी २. षटकोनी ३. गोल ४. सांगता येणार नाही ५. डोळ्याने दिसू शकत नाही 

तिसरा प्रश्न : चंद्रावर गेलेल्या पहिल्या माणसाचे नाव काय? 1. निळकांत भुजबळ २. नील आर्मस्ट्रॉंग ३. रोबोट ४. माहीत नाही 

चौथा प्रश्न : सगळयात चपळ प्राणी कोणता? १. गोगलगाय २. अमीबा ३. हरीण ४. बाण ५. हवा ६. प्रकाश 

पाचवा प्रश्न : तुमचा आवडता टि. व्ही. कोणता? १. माकोडा २. मुंगळा ३. शांत सुई ४. हवाई
 

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली