कादंबरी- धमक (भाग 1)
साल 1999. साधारण वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांतील घटना;
ठिकाण- मुंबई:
दुपारचे चार वाजलेले. लोकल ट्रेन चिंचपोकळीला थांबली. किनाऱ्यावर वेगाने आदळणाऱ्या समुद्राच्या लाटांसारखी लोकलमधून माणसांची गर्दी स्टेशनवर आदळली. त्यात कुठलातरी पाण्याचा थेंब मी होतो. मी विहंग. पाठीवरची सॅक सांभाळत सांभाळत मी गर्दीतून मार्ग काढला आणि फुटओव्हर ब्रिज चढायला लागलो. खिशातून डायरी काढली आणि पत्ता वाचला, सिद्धी किराणा स्टोअर्स, स्टेशन रोड, चिंचपोकळी वेस्ट.
पश्चिमेकडच्या पायऱ्या उतरलो आणि सिद्धी किराणा स्टोअर्स शोधू लागलो. अंग घामेघुम झालेलं. पाणी प्यावंसं वाटलं. सोबत रुमवरून आणलेलं पाणी दिवसभरात संपलेलं होतं आणि नेहमी नेहमी मिनरल वॉटर विकत घेणं परवडत नव्हतं. आधीच उशीर झाला होता म्हणून दुकानात गेल्यावरच पिऊ असं ठरवून तहान भागवण्याचा विचार कॅन्सल केला आणि पाच मिनिटात दुकान सापडलं.
मी तुमच्या दुकानातल्या इलेक्ट्रॉनिक वजन काटा दुरुस्त करायला आलेला सर्व्हिस इंजिनिअर असे दुकानदाराला सांगताच तो माझ्यावर डाफरला. मला पाणी विचारायचे तर सोडाच, आल्या आल्या त्याने मला उशीर झाल्याबद्दल झापले आणि ताबडतोब दोन दिवसांपासून बंद असलेले मशीन दुरुस्त करायला सांगितले. दोन दिवस साध्या तराजूने मोजावे लागल्याने त्याला झालेला त्रास तो आरडा ओरडा करून मला सांगत होता. मी सुद्धा पाणी मागितलं नाही.
विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे असलेली पाठीवरची बॅग मी त्या मशीनवर ठेवली तर मशीन त्या बॅगचे 100 किलो वजन दाखवायला लागले. अर्थात ते चूक होते कारण मशीन बिघडलेले होते आणि तेच तर दुरुस्त करायला मी तिथे आलेलो होतो. पण खरंच हा जॉब मला या बॅगप्रमाणे जड झाला होता किंवा आहे त्यापेक्षा जास्त जड वाटत होता. जड म्हणजे यासाठी नव्हे की हे मी करत असलेले काम मी हलके वगैरे मानत होतो, तर यासाठी की माझ्या उपजत सृजनशीलतेला या जॉब मध्ये काही वावच राहिला नव्हता. मी प्रयत्न कायरचो तर ऑफिसमध्ये माझी सृजनशीलता दाबून टाकली जायची.
मी मशीन उघडलं. इलेक्ट्रॉनिक सर्किट चेक केलं. त्यातले रेझिस्टर, कपॅसीटर, ट्रान्झिस्टर तसेच आयसी चेक केल्या. मल्टिमीटर लावून ठिकठिकाणचे व्होल्टेज, करंट, इनपुट, आउटपुट चेक केलं. आयसीकडे सर्किट घेऊन जाणारा एक रेझिस्टर जळालेला सापडला, तरीही इतर समांतर रेझिस्टरमुळे सर्किट बायपास होऊन कनेक्ट होत होतं पण वजनाचे रिडींग खूप जास्त दाखवत होतं. योगायोगाने तीच व्हॅल्यू असलेला रेझिस्टर माझ्या बॅग मध्ये प्लास्टिकच्या डबीत होता. तो मी जुन्याऐवजी तेथे सोल्डर करून चिकटवला. मग बॅगचे भरले 2 किलो. मग दुकान मालकाने दोन किलोचं जुनं पारंपरिक वजन त्यावर ठेवलं ते दोन किलो असंच मशीनने दाखवलं आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
"पाणी मिळेल का जरा!", घशाची कोरड असह्य होत होती.
"हो हो, ए गण्या, पाणी आण रे जरा या मेकॅनिक पोरासाठी!"
"मेकॅनिक पोरगा? अहो बी. ई.(इलेक्ट्रॉनिक्स) आहे मी!", मनातच मी म्हटलं. किंमतच काढली याने आम्हा इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस इंजिनियर्सची! मी कोरड्या घशासह कसाबसा हसलो.
मग मशीन दुरुस्त झाल्याच्या समाधानाचं पाणी प्यालो आणि विचार केला, मशीन मधला फॉल्ट लवकर नसता सापडला तर? किंवा सापडलाच नसता तर? पाणी प्यायला तर नक्की नसतंच मिळालं आणखी वरून शिव्या मिळाल्या असत्या त्या वेगळ्या!
मशीन वॉरंटीच्या आत असल्याने सर्व्हिस चार्ज न घेता फक्त एका पुस्तकात सर्व्हिसची नोंद केली आणि त्यात दुकान मालकाची सही घेऊन बाहेर पडलो.
यानंतर आणखी एका ठिकाणचे वेईंग मशीन म्हणजे वजन काटा मला चेक करायचा होता. स्टेशनवर पोहोचलो. स्टेशनवर वडा पाव खाल्ला. त्याच्यासोबत तिखट आणि गोड चटणी खाल्ली आणि झोकून दिले स्वतःला माटुंग्याकडे जाणाऱ्या लोकल मध्ये. माटुंग्याला उतरलो आणि गेलो त्या एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्स मध्ये. तिथे आमच्या कंपनीचे पाच वजन काटे लावलेले होते. त्यापैकी एक पूर्ण बंद पडला होता. उघडून तो चेक केला. एक आयसीपूर्ण जळालेली होती.
"व्होल्टेज फ्लक्चुएशन म्हणजे विजेच्या प्रवाहात चढ उतार झाल्याने ही आयसी जळाली आहे. बदलावी लागेल!', मी म्हणालो.
"आणली आहे का सोबत आयसी?", तो दुकानातील एक सिनियर कर्मचारी म्हणाला.
"नाही. आम्ही सर्व्हिस इंजिनिअर लोक शक्यतो या आयसी स्पेअर घेऊन फिरत नाहीत. त्या मागवाव्या लागतात! महाग असतात", मी खरं ते सांगितलं.
"हो का? खर्च किती साधारण?', उपहासाने तो सिनियर कर्मचारी म्हणाला.
"2500 रुपये!", मी.
"जास्त होतात खूप. आम्हाला काय त्यातलं कळत नाही आणि तुम्ही इलेक्ट्रॉनिक वाले लुटतात आम्हाला नुसतं. हजार रुपयांची आयसी दुप्पट तिप्पट किंमत वाढवून विकतात दुसरं काय?", तो कर्मचारी.
"अहो तसं नाहीए...", मी काकुळतीने म्हणालो.
एवढ्यात जवळच एका काउंटरवर हिशोब करणारी एक स्मार्ट मुलगी आमचे संभाषण ऐकतांना मध्येच म्हणाली, "आहो सर, तो इंजिनिअर म्हणतो ते खरंय, आयसी महाग मिळतात."
"तुला कसं कळलं गं?', कर्मचारी.
"मी पण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे. पण नोकरी मिळाली नाही म्हणून या दुकानात काउंटरवर ग्राहकांचा हिशोब करण्याचं काम करत्येय! आणि हा बघा, हा सुद्धा दारोदार फिरतोय लोकांचे मशीन दुरुस्त करत!", ती डोळा मिचकावत माझ्याकडे बघत म्हणाली तसं मला हायसं वाटलं.
"एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर दुसऱ्याच्या मदतीला नाही धावून येणार तर मग दुसरं आणखी कोण?", मी मनात म्हटलं आणि तिला थम्स अप केलं.
करून सर्व्हिस रजिस्टर भरून बाहेर पडलो. जातांना काउंटरवर बसलेल्या मुलीला मी विचारलं, "बरं मला एक सांग, तुला इंजिनियरिंगला किती मार्क होते?"
"काय सांगू आता? चांगले ६२ टक्के होते! मी अनेक इंडस्ट्रीयल इस्टेटस पालथ्या घातल्या. जॉब नाहीएत. आधी केला एका ठिकाणी जॉब सहा महिने! पण हा असाच, तुझ्यासारखा! फिल्ड वर्क असलेला! नाही जमला. सोडून दिला! म्हणजे मुलगी आहे म्हणून नाही जमला असं नाही पण सारख्या फिरस्तीमुळे त्रास व्हायला लागला. ऑफिसमध्ये बसून करण्याजोगे इलेक्ट्रॉनिक फिल्ड मधले जॉब्स होते एक दोन ठिकाणी पण ती नवी टेक्नोलॉजी शिकायला पैसे नव्हते आणि घरी एक लहान बहिण आहे, तिचे शिक्षण बाकी आहे. माझेच शिक्षण वडिलांनी कसेबसे केले आता त्यांच्याने नाही होत. माझी आई नाहीये. वडिलांना हातभार लावावा म्हणून शेवटी ही नोकरी घेतली! किमान आता मी स्वत: कमावते तरी आहे!"
इंजिनियर्सना नोकरी नसणं किंवा नं मिळणं!! मी विचार केला. भारतातील कायमची एक समस्या!
"हो खरच आहे तू म्हणतेस ते! कुठे राहतेस बाय द वे?"
"सायन!"
"शिव म्हण की, मराठी माणूस म्हणजे सॉरी स्त्री आहेस ना!"
"हो सर! शिव! आणि स्त्री ही एक माणूसच असते हे कधी कळेल तुम्हा पुरुषांना?", ती गमतीच्या सुरात म्हणाली.
"ओके चुकलं! पण मी आणि सर? बरी आहेस ना? मी आपला दारोदार लोकांचे वजन काटे दुरुस्त करणारा माणूस! मी कसला सर?"
"मी गम्मत केली, पण खरं सांगू का? तुझ्या वागण्या बोलण्यातून तू सर नक्की वाटतोस! एखादा मॅनेजर वाटतोस! तुझं बोलणं प्रभावी आहे!"
"अरे वा! धन्यवाद, पण हीसुद्धा गम्मत नाहीए ना? एनीवे! तुझं नाव काय?"
"मी सायली, आणि तू?"
"विहंग!"
"वाव! नाईस नेम!"
"युवर टू"
"नाईस टू मिट यू!"
"सेम हियर! अरेरे! तुला सांगतो मराठी बोलायला आणि मी इंग्रजी बोलायला लागलो, 'तुला भेटून मलाही आनंद झाला' असे म्हणायला हवे होते नाही का? बरं आता आपली दोस्ती पक्की का? मी येईन पुढच्या वेळेस इथे तेव्हा पुन्हा भेटू! तुझा फोन नंबर मिळेल का?"
तिने तिचा टेलिफोन नंबर (अर्थातच लँडलाईन) नंबर मला दिला. आमच्या रूमवर मात्र फोन नव्हता.
"दोस्ती पक्की", ती म्हणाली आणि तिला बाय करून निघालो आणि थेट डोंबिवलीची लोकल पकडली. अर्थात बसायला जागा मिळाली नाही. उभाच राहिलो. माझ्या पाठीवरच्या सॅकच्या एका साईडला संपलेली पाण्याची बाटली आणि दुसऱ्या साईडला गोल वळकटी केलेला सकाळी विकत घेयलेला मिड-डे पेपर होता.
मला वाचायची भयंकर आवड. आलटून पालटून वेगवेगळी वर्तमानपत्र मी घ्यायचो. हात मागे करून "माय डे" हे इंग्रजी टॅब्लॉईड (उभ्या आकाराचे वर्तमानपत्र) ओढले आणि एक हात लोकलच्या कडीला आणि एका हाताने माय डे वाचू लागलो. त्यात अनेक लेख होते. लोक म्हणे आतुरतेने नवे सहस्त्रक सुरु होण्याची वाट बघत होते. लवकरच २००० साल सुरु होणार होते! प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी येत्या सहस्त्रकात त्यांना त्यांच्या क्षेत्रात काय बदल अपेक्षित आहेत, किंवा काय नवीन बदल घडू शकतात, पुढच्या सहस्त्रकाची आव्हाने वगैरे याबद्दल मतं मांडलेली होती. लेख वाचनीय होते. बरीच माहिती मिळाली. इलेक्ट्रोनिक क्षेत्राबद्दल पण काही लोकांनी बराच आशावाद मांडला होता.
मधल्या प्रत्येक स्टेशनवर लोकांचे कित्येक लोंढे चढले, उतरले. प्रत्येकाला लोकल पकडायची मरणाची घाई! लोकलमधून उतरायची पण घाई! घरी जायची घाई. पुन्हा सकाळी उठून लोकल पकडायची घाई. सामान्य चाकरमानी मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेली घाई!
थोड्यावेळाने खिडकीजवळ जागा मिळाली. आता पेपर ठेऊन दिला, सॅक मांडीवर ठेवली आणि खिडकीतून बाहेरचा अंधार आणि कृत्रिम उजेडाचा खेळ पाहू लागलो. ठाणे पार केल्यानंतर लागणारे पर्वत आणि त्यावरील वस्ती. एकूणच सतत धावणारी मुंबई. मधूनच डब्याला जोडलेला प्रचंड ट्रान्सफॉर्मर सुरू होण्याचा भयंकर आवाज आणि मग त्या आवाजाची कानाला होणारी सवय!
गेल्या काही महिन्यांतल्या घटना आठवत होतो. सध्याच्या जॉबला मी कंटाळलो होतो. कारण मला रिसर्च आणि डेव्हलपमेंट (R&D) मध्ये जायचे होते. डोकं तिकडे धावत होतं. कॉलेज जीवनापासून जीव की प्राण असलेलं माझं इलेक्ट्रॉनिक मॅगझीन "इलेक्ट्रॉनिक्स इन डेली लाईफ!" मधून प्रेरणा घेऊन मी अनेक उपयुक्त इलेक्ट्रॉनिक सर्किट बनवले होते आणि अजूनही बनवत होतो. नवे मासिकं परवडायचे नाही म्हणून स्टेशनच्या बाजूला कमी खर्चात मासिकं विकत घ्यायचो. सध्याच्या वेईंग मशीनच्या सर्किट मध्ये मी काही बदल आमच्या एका R&D टीम मधल्या एका लीडरला सुचवले होते पण त्याला ते पसंत नव्हते. ते बदल झाले असते तर कमी खर्चात हे मशीन बनवता आलं असतं. माझी कल्पना इतरांनाही पसंत पडली पण टीम लीडर ने हळूहळू माझा R&D मधला प्रवेश बंद केला. मला फिल्डवरच जास्त पाठवायचा. त्याला माझ्याबद्दल कसला कॉम्प्लेक्स होता माहिती नव्हतं. बहुदा त्याला इतरांना डावलून स्वत: लवकर वरच्या पोझिशन वर जायची घाई झाली असावी. पण, लीडर असा असतो का? नक्की नाही! तो टीम मधल्या प्रत्येक सदस्याचे म्हणणे ऐकतो. हा वेगळाच होता. प्रत्येकाचे म्हणणे धुडकावून लावत होता! कुणाचेच काही ऐकत नव्हता. पण त्यामुळे माझी क्रिएटिव्हिटी घुसमटत होती जसा लोकलच्या गर्दीमध्ये आपला श्वास घुसमटत असतो!
मला हा जॉब सोडायचा होता. पण मग सोडला तर पैसे थोडेसेच सेव्ह होते. मुंबई महानगरी मला काहीही करून सोडायची नव्हती. घरून काहीही मदत मिळणार नव्हती. माझ्या घरचे राजकारण आणखीनच वेगळे!
माझा मोठा भाऊ होता गावाकडे. वडिलांसोबत! त्यांना शेती आणि त्यांच्या व्यवसायात मदत करायला! त्याने आधीपासूनच ते ठरवले आणि मार्गी लागला. मी सुद्धा शेती किंवा व्यवसायात मुद्दाम लक्ष घातले नाही आणि हळूहळू त्यापासून दूर होत गेलो तसे ते माझ्या मोठ्या भावाच्या पथ्यावर पडत गेले. इलेक्ट्रॉनिक्समध्ये आकर्षण असल्याने मी त्यातच इंजिनिअरिंग केले.
मला शहराचे आकर्षण होते. मी लहानपणी खूप वाचन करायचो, वेगवेगळ्या विषयांवरची मराठी, इंग्रजी वर्तमानपत्रे मासिके वाचायचो! त्यातले वेगवेगळ्या कंपनीचे सूट, बूट, टाय, कोटातले कंपन्यांचे मालक, मॅनेजर, त्यांची लाइफस्टाइल वगैरे सगळे मला कायम आकर्षित करायचे.
मला आठवतं, यापूर्वी फक्त एकदाच माझ्या मामांसोबत मी मुंबईला आलो होतो. ते मला टॅक्सीने मरीन ड्राईव्ह वगैरे परिसर फिरायला घेऊन गेले होते तेव्हा एका सिग्नलला टॅक्सी थांबली. तेव्हा नुकतीच संध्याकाळ संपून रात्रीने ताबा घेतला होता. खिडकीतून एका उंच इमारतीकडे सहज लक्ष गेले.
अनेक मजली इमारत! काचेच्या खिडक्या! प्रत्येक मजल्यावरच्या छताला चौकोनी दिवे फिट केलेले! तिथे लोक टेबलासमोर गोल फिरणाऱ्या खुर्च्यांवर बसलेत. मनापासून काम करताहेत! अनेक स्त्रीया वेस्टर्न पोशाखात इकडे तिकडे पुरुषांच्या बरोबरीने वावरत होत्या! जणू काही एखाद्या मुर्तीकाराने जाणीवपूर्वक घडवलेल्या मूर्ती! वेस्टर्न कापड्यांतले कोट, टाय घातलेले पुरुष! काय लाईफ असेल ना यांची! बहुतेक सगळी खाजगी कंपन्यांची ऑफिसेस होती. कदाचित भविष्यात अशाच एका बिल्डींग मधल्या कोणत्यातरी मजल्यावर मी काम करत असेन का? मला प्रकर्षाने वाटून गेलं! त्या रात्री माझ्या मनातून ती इमारत गेलीच नाही.
आज मी मुंबईत होतो. आणि या शहरात टिकायचे तर पैसा हवाच. नोकरी सोडली तर पैसा कोठून आणणार? नाही सोडली तर सध्याच्या कामात मन लागत नव्हते. दुसरा जॉब कधी मिळणार हे नक्की सांगू शकत नव्हतो. दुसरी नोकरी शोधेपर्यंत पैसा आणणार कोठून? सहज प्रयत्न म्हणून गव्हर्नमेंटच्या परीक्षा देऊन पहात होतो पण मला त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता आणि अभ्यासाला वेळ पण मिळत नव्हता.
खिडकीतून मी बाहेर बघतच होतो. दिवा स्टेशन येण्यातच होते. दूर पर्वतावर एका विशिष्ट त्रिकोणी आकाराच्या झोपडीत एक पिवळा दिवा अचानक पेटला आणि माझ्या मेंदूतपण एक दिवा पेटला की स्वतःचेच एखादे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट काढले तर? मग हसू आले.
मुंबईसारख्या महानगरात स्वतःचा व्यवसाय??
तेही माझ्या सारख्या गावाकडून आलेल्या मराठी माणसाने??
इथे नोकरीची मारामार आणि बिझिनेस??
ही मनाची द्विधा मनस्थिती जर का मी घरी सांगितली असती तर आईची यात काही विशेष अशी ठाम भूमिका नव्हती वडिलांनाही यातलं विशेष काही कळत नव्हतं पण भाऊ म्हणाला असता, "अरे बाबा सगळे सोड, निघून ये गावाला! इथे गावात काहीतरी करू" आणि मला ते नक्कीच मान्य झालं नसतं!!
त्यापेक्षा दुसऱ्या नोकरीच्या शोधार्थ लागतो हे बरं!
रात्री दहाला डोंबिवलीत (ईस्ट) माझ्या रूमवर पोहोचलो.
माझा रूम पार्टनर जितेश नुकताच आलेला होता आणि चेतनची आज नाईट शिफ्ट होती म्हणून तो थोड्यावेळापूर्वीच निघून गेला होता. जितेशने भाजी बनवली होतो. मी आलो आणि फटाफट दहा छोटे फुलके बनवले. त्यानेही थोडी मदत केली. जेवत जेवत अकरा वाजले. झोपायला साडेअकरा! पुन्हा सकाळी उठून साडेसातची लोकल पकडायची, नऊ पर्यंत विक्रोळी येथल्या ऑफिसला पोहोचणे, तिथून रोजचे टार्गेट घेऊन दुकानांचे पत्ते घेणे आणि फिर्सातीवर निघणे! साधारण गेल्या एक वर्षांपासून असे रोजचे आयुष्य चालले होते!
पुढच्या वेळेस माटुंग्याला त्या दुकानात आयसी बदलावायला गेलो तेव्हा सायलीला घेऊन एका छोट्याश्या रेस्टॉरंट मध्ये चहा प्यायला गेलो. मागच्या आणि यावेळेस तिने त्या दुकानाचा युनिफॉर्म घातला होता म्हणजे बटनांचा पांढरा शर्ट आणि निळी पॅन्ट पण त्यातील ती खूप स्मार्ट वाटत होती. अंगाने भरलेली असल्यामुळे त्या शर्टमधून तिचं स्त्रीत्व आणि कुठे करपणे दिसून येतात पाहताक्षणी नक्कीच ती कुणाच्याही मनात भरेल आणि साठून राहील अशीच मुलगी होती.
एकूणच मला ती छान पोरगी वाटली. बोलायला मोकळी.
जास्त कसला गर्व नाही. मी मुलगी आहे अशा प्रकारचं काही कॉम्प्लेक्स तिच्यात नव्हतं. एखादा माझा पुरुष मित्र माझ्याशी बोलेल तशीच ती बोलत होती.
"मग कधीपर्यंत करणार हा जॉब? इलेक्ट्रॉनिक बेस्ड जॉब का नाही शोधत? आमच्या कंपनीत येतेस का R&D ला? ट्राय करून बघू का? देतेस का बायो डाटा?"
"ठीक आहे, पाठवते पोस्टाने कंपनीच्या अड्रेस वर!"
"ठीक आहे तर मग!"
त्यानंतर रात्री रूम मध्ये आल्यावर मी आठवायला लागलो की हा पहिलाच प्रसंग होता जेव्हा एखाद्या ठिकाणी मी सर्विसिंग करायला गेलो आणि मला चक्क एक मैत्रीण मिळाली, नाहीतर सर्विस इंजिनीरिंग च्या जॉब मध्ये शक्यतो सगळे कस्टमर हे अंगावर खेकसणारे मिळायचे.
बरेचदा मुंबईबाहेर दूरवरच्या खेड्यात सुद्धा मला सर्विस इंजिनिअरिंग या कामासाठी पाठवायचे खेडेगावात थोडे अनुभव वेगळे होते. अनेकदा खेडेगावात घर आणि किराणा दुकान शेजारी शेजारी असायचे.
एक किस्सा आठवतो जेव्हा एका खेडेगावात मी सर्विस साठी गेलो होतो तिथे घर आणि दुकान जवळ जवळ होतं. मी आल्यानंतर सरळ मशीन दुरूस्त करायला घेतले तर त्या घरातील आजीबाई यांनी मला प्रथम पाणी दिले चहा बनवला त्यानंतर मी मशीन वगैरे दुरुस्त केले, पण आश्चर्य म्हणजे मला त्यांनी तेव्हा दुपारच्या जेवणासाठी थांबवून घेतले. अगदी जवळचा पाहुणा आल्यानंतर आपण त्याचा पाहुणचार करतो अगदी तसंच! मी भारावून गेलो. एकूणच त्या घरातले सगळे सदस्य मंडळी खूप छान होती. त्या घरी मी खाल्लेली झुमका आणि भाकर आणि हिरव्या मिरचीचा ठेचा याची चव मी कधीही विसरू शकत नाही.
मात्र काही ठिकाणी इतकी अपमानास्पद वागणूक मिळायची की मी एकदा आमच्या फील्ड मॅनेजरला याबद्दल सांगितले की अशी वागणूक आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही जर का तुम्हाला तक्रार केली तर कमीत कमी तुम्ही फोन करून त्या कस्टमरला थोडे समजावून सांगून येणाऱ्या सर्विस इंजिनियर्सची नीट बोलण्यासाठी विनंती करावी. पण आमचा फिल्ड मॅनेजर ही गोष्ट ऐकत नव्हता. माझ्या म्हणण्याला माझ्या सारख्या इतर सर्विस इंजिनियर चा सुद्धा दुजोरा होता. परंतु फिल्ड मॅनेजर तयार नव्हता कारण कस्टमर हातातून जाण्याची त्याला भीती वाटायची. कारण गेल्या एक-दोन वर्षात वजन काट्याच्या कंपन्यांमध्ये खूप स्पर्धा निर्माण झाली होती त्यामुळे "कस्टमर इज किंग किंवा ग्राहक राजा आहे" यानुसार ग्राहक काही बोलला तरी ती निमूटपणे ऐकून घ्यायचे आणि सहन करायचे असा दंडक आमच्या फिल्ड मॅनेजरचा होता.
आमच्या रूमवर असलेल्या एका कपाटात अनेक छोटे-मोठे इलेक्ट्रॉनिक उपकरणं, रजिस्टर, कॅपॅसिटर, ट्रांजिस्टर, ब्रेड बोर्ड असे सगळे साहित्य पडलं होतं. थोडाही वेळ मिळाला की मी इलेक्ट्रॉनिक्सच्या मासिकातून बघून बघून अनेक प्रकारचे उपकरण घरच्या घरी तयार करायला सुरुवात करायचो. पण दिवसभराचा कामानिमित्त असलेला सतत प्रवास आणि तोही लोकल ट्रेनचा आणि तिथे मिळालेली विचित्र वागणूक यामुळे थकायला व्हायचं म्हणून माझे बरेच इलेक्ट्रॉनिक एक्सपेरिमेंट सुरु तर झाले होते पण ते अपूर्ण राहिले होते कधी वेळ मिळाला नाही म्हणून तर कधी काही गोष्टी आणायला पैसे अपुरे पडायचे म्हणून!
मध्यंतरी मी कॉइंन बॉक्स वरून सायलीला तिच्या घरी लँडलाईन वर कॉल केला असता तिने मला तिचा बायोडाटा आमच्या कंपनीच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवलेत सांगितलं होतं. पण मी कंपनीत आत मध्ये काही मित्रांचे मार्फत चेक केल्यानंतर कळलं की सध्या त्या सेक्शनमध्ये जॉब नव्हते. नाहीतरी आज-काल जॉब मिळणं थोडं अवघड झालं होतं. मिळाला तरी तो टिकवणं अवघड होतं आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात तर आणखीनच मुश्किल!
मी टिकून होतो कारण कस्टमर कसाही बोलला तरी मी उलटून उत्तर देणं टाळायचो. काही माझ्यासारखेच सर्विस इंजिनियर्स त्यांची चूक नसताना जर कस्टमर बोलला तर सरळ ते तोंडावर स्पष्ट बोलायचे त्यामुळे कस्टमर फोन करून आमच्या फिल्ड मॅनेजरला तक्रार करायचे आणि अनेकांना या कारणासाठी जॉब गमवावा लागला होता. मी टिकून होतो ते माझ्या मेहनतीमुळे, नॉलेज मुळे आणि माझ्या सहनशीलपणामुळे सुद्धा! समोरचा चिडला तरी त्याच्याशी नीट बोलून मी लवकर शांत करायचो. निदान तसा प्रयत्न तरी करायचो. सगळीकडे हे शक्य झालं नाही पण बर्यापैकी मी यशस्वी होत होतो आणि याच कारणामुळे काही कस्टमर्स माझे चांगले ओळखीचे झाले होते.
31 डिसेंबरला सकाळी सकाळी माझा रूम पार्टनर जितेश म्हणाला, "चल यार, आज मस्त पिऊ! थर्टी फर्स्ट एन्जॉय करू!"
मी म्हटलं, "हे बघ मी पीत नाही. मला कसलंच व्यसन नाही. तुला माहिती आहे. लागलंच तर मी तुला कंपनी देऊ शकतो, पण मला आग्रह करू नकोस! मला व्यसनांच्या नादी लागलेलं आवडत नाही!"
"काय यार विहंग, परत परत तेच तेच डायलॉग मारतोस. आजपासून तरी सुरुवात कर! अरे 1999 संपून 2000 सुरू होणार आहे. अरे वेड्या नवीन सहस्त्रक म्हणजेच मिलेनियम सुरू होणार आहे. एका मोठ्या बदलाचा तू साक्षीदार असणार आहेस! थोडीतरी घेतलीच पाहिजे!"
"अरे मित्रा मी पिणार नाही हे तुला माहीत असूनही दर वेळेस परत परत मला आग्रह करून करून का बरे आपली अमूल्य शक्ती आणि वेळ वाया घालवतोस? एक करू आपण! आज आम्हाला दुपारी 4 वाजेनंतर लवकर घरी जायला परवानगी मिळणार आहे. तू तर घरीच आहेस. चेतनचा प्रोग्राम काय आहे ते विचारलं होतंस का त्याला? तोही जर लवकर आला तर आपण सगळे मिळून गेटवे ऑफ इंडियाला जाऊ रात्री! मस्त मजा येईल! खूप धमाल असणार तिथे! नंतर मरीन ड्राईव्हला जाऊ, फिरू रात्रभर आणि सकाळी घरी येऊ! काय बोलतो, कशी वाटली आयडिया?"
"चेतन त्याच्या एका नातेवाइकाकडे गेला आहे, त्यालाही आज सुट्टीच आहे. तो पण बोलला येईल तो पाच वाजेपर्यंत संध्याकाळी रूमवर! मग खरच जाऊया आपण! चेतन आला की त्याला सांगतो आपला प्लॅन! तू पण तोपर्यंत संध्याकाळी येशीलच, मग जाऊ आपण तिघे!"
आमच्याकडे गावी घरी 31 डिसेंबर म्हणजे काही विशेष असणार नव्हतं. थोडीफार शेती ज्यात माझ्या काकांचा पण हिस्सा होता आणि माझ्या वडिलांचा व्यवसाय म्हणजे हार्डवेअर दुकान जी चालवायला माझा भाऊ बाबांना मदत करतो ते नेहमीप्रमाणे संध्याकाळपर्यंत चालणार. मग थोडेफार टीव्हीवर कार्यक्रम बघून सगळेच रात्री 10 वाजेच्या आत झोपून जाणार. त्यामुळे संध्याकाळी एखाद-दुसरा फोन घरी करायचा आणि मग रात्रभर या दोघांसोबत फिरायचा असा बेत.
अपेक्षेप्रमाणे चेतनही तयार झाला संध्याकाळी थोडेसे खाऊन मग आम्ही रमतगमत स्टेशनकडे निघालो.
रस्त्यात एका कॉइंन बॉक्स जवळ थांबून मी सायलीला फोन करण्याचा प्रयत्न केला. सहजच तिची आठवण झाली आणि ती आज आणि उद्या काय करणार आहे याची उत्सुकता मनात निर्माण झाली होती. अनेकदा फोन ट्राय केला रिंग वाजत होती पण कोणीच उचलत नव्हतं बहुदा घरी कोणी नसावं की काय मग मी प्रयत्न सोडून दिला. मग घरी फोन केला. आई, अप्पा आणि विशाल म्हणजे भावाशी बोललो. जुजबी बोलणं झालं.
दोघेजण विचारायला लागले, "काय रे घरी फोन करण्यापूर्वी आधी एवढा कुणाला फोन करत होतास? लोकल नंबर होता ना?"
"अरे काही नाही, आहे एक मैत्रीण!"
"अरे वा विहंग, मैत्रीण पण मिळवलीस! ग्रेट! ती पण मुंबईतली! मजा आहे बघा मला अजून नाही मिळाली एखादी मैत्रीण!" जितेश म्हणाला.
"अरे मैत्रीण म्हणजे फक्त दोन-तीन वेळा भेटलो आम्ही. सहजच आपली ओळख झाली कस्टमर प्लेसवर!" मी म्हणालो.
"पण मित्रा सांभाळून राहा बरं का! शक्यतो मुंबईच्या मुलींशी प्रेम करण्याच्या भानगडीत पडू नकोस. मुंबईच्या मुलींपासून सावध राहा!" चेतनने मला सल्ला दिला.
जितेश साधारण घरातला. त्याचे वडील गावाकडे प्राथमिक शिक्षक आणि आई हाऊसवाईफ. जितेश ठाण्याला जॉब करायचा. जरी आम्ही इंजिनिअरिंगला सोबत नव्हतो तरी जितेश माझा अकरावी आणि बारावीला मित्र होता.
चेतन मात्र बऱ्यापैकी घरचा श्रीमंत होता. महाराष्ट्रातल्या एका छोट्या शहरात त्याच्या वडिलांचे चार-पाच बिजनेस होते. त्याची आई पण गव्हर्मेंट जॉब मध्ये. त्याची लाइफस्टाइल आम्हा दोघांपेक्षा बरीच उच्च होती. पण अर्थात तसे तो जाणवून द्यायचा नाही. चेतन भारतातल्या नावाजलेला कॉलेजमधून शिकलेला होता. तो मेकॅनिकल इंजिनिअर होता. तो अंधेरीला एका मोठ्या कंपनीत जॉबला होता. विद्याविहारला उतरून तिथून त्याला कंपनीची बस घ्यायला यायची. जितेश आणि मला तिसरा रूम पार्टनर हवा होता मग जितेशच्या मित्राचा मित्र चेतन याला आम्ही विनंती केली तो तयार झाला.
आमच्या तिघांमध्ये मुलींच्या बाबतीत आणि एकूणच सेक्सच्या बाबतीत पण चेतन बऱ्यापैकी ऍडव्हान्स्ड होता. कदाचित त्याच्या त्यासंदर्भातल्या त्याच्या अनुभवामुळे तो आम्हाला सांगत असावा मुंबईच्या मुलीपासून दूर रहायला!
मी आणि जितेशने तर नक्कीच एखाद्या मुलीसोबत कोणत्याच प्रकारचा सेक्सचा अनुभव अजूनपर्यंत घेतलेला नव्हता, पण चेतनचं काय सांगावं कदाचित त्याने घेतला असेलही!
"यार चेतन, मी नक्की सांभाळून राहीन पण तुझं काय? तुला तर एखाद्या मुंबईकर मुलीने धोका दिला नाही ना?"
"कम ऑन यार, मला धोका देणारी मुलगी अजून जन्मली नाही, समजलास काय? आपण यु ओळखतो मुलींना. यू!", चुटकी वाजवत तो म्हणाला. एव्हाना आम्ही स्टेशनवर पोहोचलो आणि CST लोकल आली.
आता CST लोकलमध्ये दरवाज्यात उभे राहून आमच्या पुढील गप्पा सुरू झाल्या.
"यार चेतन, मला वैताग आलाय सध्याच्या जॉबचा. R&D त जायचं पण टीम लीड जाऊ देत नाही आणि सर्व्हिस इंजिनिअर जॉब मध्ये मला जास्त इंटरेस्ट वाटत नाही. अनुभव घेण्यापुरतं ठीक आहे, पण आता नको वाटतंय. झाला भरपूर अनुभव वर्षभर! मार्केट मध्ये जास्त जॉब नाहीत. प्लेसमेंट कन्सल्टंटवाले पण बोलतात की सध्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जास्त जॉब नाहीत. माझ्या माईंड मध्ये इलेक्ट्रॉनिकच्या नवनवीन आयडिया आहेत पण त्यासाठी वेळ मिळत नाही. वाटतं स्वतःच एखादं प्रॉडक्ट बनवावं आणि विकावं!"
"मग कर की! कोण रोखतंय तुला?"
"अरे सध्याचा जॉब सोडला तरच ते शक्य वाटतंय! आणि मला जॉब सोडायचा नाहीए."
"एखादा मध्यम मार्ग शोध. विचार कर. नक्की सापडेल."
CST येइपर्यंत मी मध्यम मार्ग काय असू शकेल त्याचा मी विचार करत होतो. दिवा स्टेशन वह्या जवळच्या त्या त्रिकोणी झोपडीतला तो दिवा दिसला आणि माझया मनात एक आयडिया आली. नवीन वर्षांपासून वर्तमानपत्रात युद्धपातळीवर R&D वाला जॉब शोधायचा का? त्यामुळे प्रवासाची दगदग कमी होईल आणि रूमवर मी नवनवीन एक्सपरिमेंट्स करू शकेन. किंवा असा एखादा ऑफिस मध्ये बसून करायचा जॉब ज्यात कमी कटकट असेल पण पैसे मिळतील? पण असा जॉब एक्सपरियन्ससाठी धोकेदायक असेल कारण एकदा नॉन इलेक्ट्रॉनिक अनुभव बायोडेटा मध्ये आला तर त्याचा पुढचा जॉब मिळण्यासाठी अडथळा येईल. सध्याचा आहे तो जॉब चालू ठेऊन त्यातच R&D साठी प्रयत्न करत राहिले तर? नंतरचं नंतर बघता येईल.
CST ला पोहोचून गेटवे कडे चालत असताना चेतन बोलला, "बघा रे तिकडे! त्या रस्त्यापलीकडे! एकांतात!काय सुंदर आंटी आहे!"
आम्ही दोघांनी तिकडे पहिलं. खरंच! खूप तोकडे कपडे घातलेली खरं तर सेक्सी म्हणावी अशी चाळीशीच्या घरातली ती महिला होती.पण पंचवीशीच्या तरुणीला लाजवेल अशी फिगर होती! तिच्या कार जवळ ती उभी होती. कारचे लाईट्स कायम ऑन ऑफ होत होते. थोड्याच वेळात तिच्याकडे हाताला लाल पट्टी बांधलेला एक दणकट शरीरयष्टीचा काळ्या रंगाचा तंग टीशर्ट घातलेला एकजण आला.
"चला रे येथून! तिचा नवरा आलाय, बदडेल तो आपल्याला पकडून! आपल्या वयाच्या पोरींना सोडून, कशाला आम्हाला आंटी वर लाईन मारायला लावतो रे", जितेश बोलला.
"नवरा?", असे म्हणून चेतन जोरजोरात हसायला लागला.
एव्हाना त्या कारवाल्या बाईचे त्या माणसाशी संभाषण होऊन तो गाडीत बसला. गाडीचे काच बंद झाले. लाईट्स बंद झाले.
"हसायला के झालं रे येड्या, नवरा असू दे नाहीतर काय असू दे आपल्याला काय करायचं?"
"आरे पण तो नवरा नाही तिचा, जिगोलो आहे तो!"
"ही काय आता नवी भानगड? आणि तुला कसं माहिती?"
"आरे हमको सब खबर होती है भाया! जिगोलो म्हणजे पुरुष वेश्या! त्याच्या हाताला तो लाल बँड असतो तो त्याला ओळखायला म्हणून लावला होता. खूण म्हणून!"
"काय?"
"हो. मुंबईतील अनेक एकेकट्या गर्भश्रीमंत महिला मागवतात त्यांना! फक्तच सेक्स साठी नाही तर अनेक वेळा त्यांना सोबत द्यायला ते त्यांच्या घरी सुद्धा जाऊन अनेक दिवस रहातात!"
"ऐकावं ते नवलच!"
"ही मुंबई महानगरी आहे भाऊ! तुझं धानगांव किंवा तरंगवाडी नाही! नवरे महिनोन्महिने, वर्षानुवर्षे घराबाहेर किंवा परदेशात असलेल्या बायका मागवतात अशे जिगोलो! दे टाळी!"
तिघांनी टाळ्या दिल्या.
"ही आहे मुंबईची काळी बाजू! पुरुष वेश्या असो की स्त्री वेश्या!", मी म्हटलं.
"या काळ्या बाजूमुळे पांढरी बाजू सेफ राहाते, आणि खरं म्हणजे काळं पांढरं असं काही नसतं. सगळं असतं ते ग्रे. कुणीच किंवा काहीच संपूर्ण वाईट किंवा संपूर्ण चांगलं नसतं. जे असतं ते काळ्या पंढऱ्याचं कमी अधिक मिश्रण!", चेतनने फिलॉसॉफी पाजळली.
"सोडा ना यार, काय लावलंय केव्हाचं ते! जरा एन्जॉय करा, समोर बघा, समुद्रात किती बोटी सजल्याहेत!"
मग आम्ही गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातली मजा पाहण्यात गढून गेलो.
लोकलमधून येतांना काही ठिकाणी झोपड्या पहिल्या. दोन वेळचं अन्न मिळण्याची भ्रांत पाहून वाटलं शेवटी काय अन्न, वस्त्र, निवारा हे मिळवण्यासाठी काहींचं आख्खं आयुष्य निघून जातं. पोटापाण्यासाठी रोजगार नाही. बेरोजगारी भरपूर!
मी तरी इथे त्याचसाठी आलोय, पोटापाण्यासाठी!
तसं बघितलं तर अन्न, वस्त्र, पाणी, झोप, निवारा आणि सेक्स या माणसाच्या मुलभूत गरजा, असं मास्लो याने 1943 साली सांगून ठेवल्याचं अनेक प्रकारच्या मॅनेजमेंटच्या थियरी मध्ये सांगितलं जातं. आणखीही काही नैसर्गिक गोष्टी त्यात येऊ शकतात. या सगळ्या गरजा शक्यतो शारीरिक पातळीवरच्या! पण मनाशी कुठे न कुठे जोडलेल्या! पण स्थळकाळानुसार माणसाची मुलभूत गरज कोणती आहे किंवा नाही यावर सुद्धा मतभेद आणि वादविवाद होतात, ते सुद्धा संस्कृतीच्या स्वतःच लादून घेतलेल्या काही काल्पनिक समजुतींपायी!!
माणूस कोणत्याही देशातला असो, तो माणूसच ना! त्याच्या गरजा सारख्याच! पण कोणत्यातरी अनामिक दडपणाखाली आपण भारतीय बरेचदा उघडपणे सेक्स ही माणसाची मुलभूत गरज आहे हे मान्य करायला तयार होत नाही. पण कोणत्याही शारीरिक नैसर्गिक गरजेचे जेवढे दमन जास्त तेवढी त्याबद्दल उत्सुकता जास्त आणि तेवढे ते जास्त वेगाने, चुकीच्या पद्धतीने उफाळून येण्याची शक्यता जास्त! जेवढे जास्त दमन तेवढ्या विकृती! काही देशांत उघडपणे तर काही देशांत लपून छपून पण शेवटी शरीराचे शमन केले जातेच!!
इथे या स्त्रीकडे पहिल्यावर वाटतं की तिच्या काही शारीरिक गरजा भागल्या आहेत पण सेक्सची गरज नाही पूर्ण होत! मग ती अशी पूर्ण करते आहे!
मास्लो यानेच पुढे असंही लिहिलंय की या सगळ्याच गरजा व्यवस्थित सतत पूर्ण झाल्या की मग आणखी इतर गरजा असतात जसे - स्वतःची, कुटुंबाची सुरक्षितता, सामाजिकता, स्वतःची प्रशंसा व्हावीशी वाटणे, स्वतःचे समाजात देशात जगात एक स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न आणि मग इतरांवर राज्य करणं, नेता बनणं आणि...मग?
मास्लो त्याच्या जागी बरोबर होता पण त्याला सुद्धा समजणार नाही किंवा तोही कल्पना करू शकणार नाही अशा नवनवीन थियरी आता मानवी मनात उगम पाऊ लागल्यात! एकेका प्रकारच्या गरजा पूर्ण होत गेल्या की नवनव्या गरजा वाढत जातात. त्या कुठपर्यंत जाऊ शकतील, सांगता येत नाही! मग व्हाईट एरियातून नकळत आपण ब्लॅक एरियात वाटचाल कधी करायला लागतो ते समजत नाही. मग आपला कलर ग्रे व्हायला सुरुवात होते! या खऱ्या जगात कुणीही बॉलिवूड चित्रपटांसारखं पूर्ण नायक किंवा पूर्ण खलनायक नसतो!
असतो तो मिश्रण!! ग्रे!!
इकडे तिकडे टाईमपास करत आम्ही रात्री अकरा वाजता पाव भाजी खाल्ली. मी दोघांना विनंती केली होती की आज कोणत्याच प्रकारची दारु न पिता आपण थर्टी फर्स्ट साजरा करू आणि माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी ते स्वीकारले सुद्धा होतं. मग न्यू इयर आणि न्यू मिलेनियम सेलिब्रेशन साठी आलेल्या लोकांचा उत्साह बघू लागलो. मित्र-मैत्रिणींचे ग्रुप, वेगवेगळ्या कंपन्यांचे कर्मचारी, सहकारी, आजूबाजूच्या हॉटेल्समध्ये बाहेर देशातून इतर राज्यातून आलेले लोक हे सगळे हळू गेटवे ऑफ इंडिया जवळ जमू लागले. समुद्रावरच्या बोटींवर काही बड्या लोकांचे सेलिब्रेशन सुरू होते मोठमोठ्याने म्युझिकचे आवाज येत होते. वेलकम Y2K, नवीन सहस्त्रकाचे स्वागत, मिलेनियम ड्रीम्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबिरंगी शब्दांनी सजवलेले मोठे फुगे आकाशात उडण्यासाठी तयार होते. काही फुग्यांवर भारताच्या झेंड्यातील तीन रंग होते.
बारा वाजले आणि नवीन वर्ष अवतरले, नवे सहस्त्रक अवतरले, न्यू मिलेनियम! सगळेजण एका नव्या युगाकडे वाटचाल करणार होते. आकाशात वेगवेगळे रंगीबेरंगी फटाके फुटू लागले. रोषणाईने आकाश भरून गेलं. वेगवेगळ्या कलर्सचे बलून आकाशात सोडण्यात आले. हॅपी न्यू इयर चा जल्लोष सुरू झाला. त्या रात्री आम्ही सकाळी चार वाजता लोकलने डोंबिवलीला पोहोचलो.
* * *
1 जानेवारी 2000 शनिवार, पुन्हा मी नेहमीप्रमाणे लोकलच्या गर्दीत स्वतःला झोकून दिलं. असेच अनेक आठवडे निघून गेले. पुन्हा पुन्हा तेच तेच! तोच जॉब, तीच लोकं, तेच ते चिडखोर कस्टमर!
एकदा माटुंग्याच्या त्या दुकानात एकदा सहज चक्कर मारला तर तिथे सायली नव्हती. तिथे दुसरीच कुणीतरी मुलगी बसली होती. दुकानाच्या मालकाला चौकशी केली तेव्हा तिने इथला जोब सोडल्याचे कळले. अनेक दिवसांपासून ती फोनही उचलत नव्हती. बहुदा तिने घर बदलले असावे. ते भाड्याच्या घरात राहत होते, पण तिने मागच्या भेटीत तसे काही सांगितले नव्हते की ती घर किंवा जॉब वगैरे बदलणार आहे म्हणून! तिला कॉइन बॉक्सवरून अनेकदा कॉल केला पण फोन कोणीच उचलला नाही. एकदा केव्हातरी फोन उचलला गेला तेव्हा फोन कोणीतरी अशा व्यक्तीने उचलला जी व्यक्ती अर्थातच सायली किंवा त्यांच्या कुटुंबीयांना ओळखत नव्हती. मी तिचा पत्ताच विचारला नव्हता पण मी कुठं राहतो ते मात्र तिला सांगितलं होतं.
एक मैत्रीण मिळाली होती ती पण काही न सांगता अशी कुठेतरी निघून गेली, पण मनात एक आशा होती ती कुठेतरी कधीतरी मला भेटेलच. मुंबईमधल्या या माणसांच्या महापुरात ती पुन्हा कधीतरी भेटण्याचे किती टक्के चान्सेस होते मला माहीत नव्हते पण मला मनात एक आशा होती.
रोज संध्याकाळी त्या त्रिकोणी झोपडीतला तो दिवा मला आठवण करून द्यायचा की मी सध्या च्या जॉब मध्ये खुश नाहीये, मला काहीतरी दुसरं करायचं होतं. दरम्यान मी R&D सेक्शन मध्ये जाण्याचे मी भरपूर प्रयत्न केले पण ते शक्य झालं नाही.
असेच एकदा एके ठिकाणी गावात फिल्डवर आम्हा दोघांना म्हणजे मी आणि अविनाश यांना चार-पाच मशीन दुरूस्त करायला पाठवलं होतं.
मी जवळच्याच एका दुकानात मशीन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होतो आणि अविनाश आणखी एका दुकानात.
अविनाश दुकानात मशीन दुरुस्त करत होता तिथे काही राजकारणी लोक पाहुणे म्हणून आले. त्या दुकानाचा मालक अविनाशला म्हणू लागला,
"ए जरा थांबव ते मशीन दुरुस्तीचं काम! हे पाणी नेऊन दे जा, पावणे बसलेत सोफ्यावर आतमध्ये!"
सहज एक माणुसकीच्या भावनेने अविनाशने ते काम केलं आणि पुन्हा मशीन दुरूस्त करायला लागला तर तो त्याला आणखी त्याची पर्सनल कामं सांगू लागला, तेव्हा अविनाश चिडला आणि त्या मालकाच्या अंगावर जवळपास धावून गेला.
"ए, आरे काय तुझ्या बापाचा नोकर समजला काय मला, च्यायला काय लावलंय, पाणी दे, चहा दे! नोकर आहेत ना दुकानात? सांग ना त्यांना, नायतर स्वतः दे पाणी तुझ्या पावण्याला!"
"ए दीड दमडीच्या मेकॅनिक पोरा!", पाहुण्यांसमोर अविनाशकडून अपमान झाल्यासारखे वाटल्याने तो मालकही चिडला, "हो घरी! नको दुरूस्त करू ते मशीन!"
असे म्हणून तो मी दुरूस्त करत असेलल्या मशीनच्या मालकाला पण म्हणाला, "ए बंद कर सांग त्या पोराला, पाठव दोघांना परत. फोन करून सांगतो या दोघांच्या मॅनेजरला, असले चुतिये पोरं नको पाठवत जाऊ म्हणून!"
शिवी ऐकून अविनाश त्याच्या अंगावर धावून गेला. मी पळत जाऊन त्याला थांबवलं आणि त्या मालकाला म्हटलं, "जाउद्या, चूक झाली त्याची!"
सोफ्यावर बसलेला तो पांढरा शुभ्र कुर्ता घातलेला पावणा कुणीतरी लोकल नेता वाटत होता, त्याने आम्हाला तिथून जाण्याची डोळ्यांनी खूण केली ते पाहून मी अविनाशला म्हटलं, "चल बाबा इथून! नको नादी लागू या सगळ्यांच्या! आपलं काम करायला आलोय आपण! काम करू देतील तर ठीक, नाही सांगितलं तर चल वापस! बघू आपण नंतर! करू दे कंप्लेंट यांना!"
अविनाशला घेऊन मी निघालो. त्या दिवशी आणखी चार-पाच ठिकाणी आम्ही मशीन दुरुस्त केले खरे, पण आमचा मूड लागत नव्हता. खरंच काय लाईफ झाली होती आमची! एवढे इंजिनीअरिंग केलं पण अशा पद्धतीचा अपमान सहन करून करून काम करणं अशक्य वाटत होतं.
आमची कम्प्लेंट खरच गेली होती. कंपनीचा नियम असा होता की कस्टमर कडून 10 कंप्लेंट आल्या तर त्या एम्पलोयीला काढून टाकण्यात येत होतं.
अविनाश पण खूप चिडला होता पण करणार काय? त्याला मी शांत केलं. फिल्ड मॅनेजरने आम्हाला ताकीद देऊन सोडलं पण त्यानंतर आम्हाला तिथे पुन्हा जायला मना करण्यात आलं. त्याऐवजी दुसऱ्या दोन इंजिनियरला तिथे पाठवण्यात आलं.
असेच दिवस जात होते. कालांतराने अविनाशने कंटाळून हा जॉब सोडून दिला. तो सरळ गावाकडे निघून गेला. दुसरी एखादी नोकरी शोधण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला नाही. या प्रकारच्या जॉब मध्ये कोणी जास्त टिकत नव्हतं. सहा महिने, एक वर्ष जास्तीत जास्त दोन वर्ष हा जॉब करून लोक सोडून जात होते. नाही तरी कंपनीला सुद्धा हे माहिती होतं की वर्षानुवर्षे हा जॉब लोक करणार नाहीत, पण सतत धरसोड वृत्तीमुळे प्रत्येक नवीन आलेल्या इंजिनिअरला जुन्या लोकांकडून नॉलेज द्यावं लागायचं, त्यामुळे बरेचसे पैसे आणि एनर्जी आणि वेळ वाया जायचे पण इलाज नव्हता.
मी मात्र जवळपास दोन वर्षे या जॉब मध्ये टिकून होतो. दरम्यान मी घरच्या घरी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवली होती निदान छोट्या स्वरूपात तरी, ज्याला आपण प्रोटोटाइप म्हणतो. पण खूप कमी वेळ मिळत प्लॅनिंग तीन-चार महिन्यात एक उपकरण अशा पद्धतीने मी प्रोटोटाइप बनवले होते. सोबतीला "इलेक्ट्रॉनिक्स इन डेली लाईफ" हे मासिक होतंच.
रोज इंग्रजी मराठी न्यूज पेपर मध्ये मी जाहिराती बारकाईने बघायचो. चार पाच ठिकाणी इंटरव्यू पण दिले पण मनासारखा जॉब नव्हता, शक्यतो सगळे सर्विस इंजिनीयरचे जॉब होते पण मी प्रयत्न सोडत नव्हतो.
घरी काही सांगायला गेलं तर भाऊ टर उडवायचा म्हणायचा,"दारोदार जाऊन लोकांची मशीन दुरुस्त करण्यापेक्षा गावात ये! गाई म्हशीचे शेण गोळा कर! त्यात पैसे मिळतील! सगळे पगाराचे पैसे त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवायला फालतू खर्च करत राहतो त्यापेक्षा माझ्याकरता काहीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू बनव, कामास येईल!"
मग मी त्याला म्हणायचो, "त्यापेक्षा शेणाच्या गोवऱ्या बनव आणि इकडे पाठव. मी विकतो शहरात. चांगला भाव भेटेल!"
म्हशीच्या दोन्ही शिंगांना चमचम करणारे LED लाईट्स, दोन शिंगांना सोल्डर केलेलं कॅपॅसिटर, म्हशीच्या अंगावर रेझिस्टर सारखे आखलेले कलर कोड, आणि त्यावर बसलेला माझा भाऊ विशाल मी त्याच्या हातात दिलेलं बटन घेऊन ते लाईट्स ऑन ऑफ करत मजेत म्हशीला हाकतो आहे असं मजेशीर चित्र माझ्या डोळ्यासमोर सहजच तरळून गेलं.
"मला मदत कर!" असं तो वर वर म्हणायचा पण त्यालाही मनातून मी गावात नाही होतो तेच ठीक वाटायचं, कारण मी गेलो तरी त्याने बाबांच्या व्यवसायात चांगला जम बसवून गावातही त्याची चांगली ओळख केली होती त्यामुळे मी त्याचा फक्त मदतनीस म्हणूनच काम करू शकलो असतो. माझी तिथे गावात वेगळी ओळख कधीच निर्माण झाली नसती आणि नाही तरी मला इथेच शहरात राहायचं होतं, काहीतरी वेगळं करायचं होतं! त्या उंच उंच काचेच्या खिडक्या असलेल्या बिल्डिंगमध्ये काम करत असलेल्या लोकांसारखं!
आता मात्र मी ठरवलं हा फिल्डवर्क जॉब बास झाला. आता कोणताही असो पण ऑफिसमध्ये काम असलेल्या जॉब करायचा आणि रूमवर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बनवायची, म्हणजे कमीत कमी सतत दिवसभरचा सतत प्रवास आणि त्यामुळे होणारी दगदग वाचेल, कदाचित पुढे यातूनही मार्ग सापडेल असे म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारच्या जॉब कन्सल्टंटला भेटू लागलो, तसेच आणखी बारकाईने न्युज पेपर मधल्या जाहिराती बघू लागलो.
एके दिवशी मला इलेक्ट्रॉनिक्स एक्सपो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे प्रदर्शन बद्दल एक जाहिरात दिसली. प्रदर्शनात ज्यांना ज्यांना आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवायच्या आहेत त्यांनी एका कॉन्टॅक्ट नंबर वर कॉल करा असे सांगितले होते. दोन-तीन आठवड्यातच ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे प्रदर्शन भरणार होते. मी विचार केला बघू ट्राय करून! त्यांना कॉल केला. प्रवेश फी भरून मी बनवलेले दोन-तीन उपकरणे त्यांना दाखवायला घेऊन गेलो, त्यापैकी एक उपकरण त्यांना आवडलं आणि ते मी त्या प्रदर्शनात ठेवायचं ठरवलं. प्रदर्शन रविवारी असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता.
तर हे जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मी बनवलं होतं त्याबद्दल सांगतो.
झालं असं की रोजच्या रोज न्यूज पेपर्समध्ये मी बातम्या वाचायचो की अनेक फ्लॅट्समध्ये डुप्लिकेट चावी बनवून किंवा कोणत्याही वेगळ्या पद्धतीने कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने लॅच तोडून फ्लॅट मधले सोने पैसे आणि इतर वस्तू भुरटे चोर चोरून न्यायचे.
याविषयी मी वेगवेगळे पुस्तक शोधायला लागलो यासाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बनवता येईल का याचा विचार माझ्या मनात घोळत होता, त्यासाठी अनेक नवीन मासिक विकत घेणे आवश्यक होते. पण नवीन मासिक महाग मिळते. एवढे पैसे माझ्याकडे नव्हते! मग मी जुन्या बुक स्टोअर्समध्ये जायला लागलो. कामानिमित्ताने वेगवेगळे ठिकाणी जात असतांना त्यातल्या त्यात वेळ काढून मी जुन्या भंगार रद्दी पुस्तकांची दुकाने शोधायचो आणि तिथली इलेक्ट्रॉनिक मासिक विकत घ्यायची, कमी किमतीत! काही महिने संशोधन करून चार-पाच प्रकारचे इलेक्ट्रॉनिक सर्किट मला पुस्तकात सापडले.
एक सर्किट मी फायनल केलं खरं ते अत्यंत उपयुक्त होतं म्हणजे लॅच आणि की या दोघांमध्ये विशिष्ट प्रकारचे सेन्सर आणि सर्किट बसवून त्या विशिष्ट चाबी व्यतिरिक्त इतर कोणतीही गोष्ट वापरून उघडण्याचा प्रयत्न केला तर अलार्म वाजायला सुरुवात होत होती.
पण एक मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्या सर्किट मध्ये एक आय सी म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट लागणार होती. ती आय सी नवीन विकत घ्यायचं तर फार महाग होती आणि तेही परदेशातून ती इम्पोर्ट करावी लागत होती ते माझ्याच्याने शक्य नव्हतं.
मग करायचं काय? भरपूर विचार केला आणि मुंबईतली काही भंगार किंवा चोरबाजार असलेली ठिकाणं शोधून काढली. खूप धुंडाळली! जुन्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू शोधल्या ज्यांच्यामध्ये ती आय सी असू शकणार होती. आतापर्यंत वाचून वाचून मला माहीत झालं होतं की त्या प्रकारची आय सी साधारण कोणकोणत्या प्रकारच्या डिवाइस मध्ये वापरली जाते, तशा प्रकारचे डिव्हाइस मी चोरबाजारात शोधू लागलो.
चोरांपासून रक्षण करण्यासाठी जे डिव्हाइस मी बनवणार होतो त्यासाठी लागणारी आय सी दुर्भाग्याने मी चोरबाजारातच शोधत होतो. किती मोठा विरोधाभास होता! पण करणार काय? इलाज नव्हता. म्हणतात ना "लोहा लोहे को काटता है" तसंच काहीसं हे होत होतं वाटतं! इतकही करून त्या वस्तू घरी घेऊन गेल्यानंतर त्यातल्या आय सी चालू असल्या तर ठीक नाहीतर माझे पैसे आणि मेहनत वाया! पण चान्स घ्यायला हवाच होता.
मोठी थैली भरून मी दहा पंधरा वेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोर बाजारातून घरी घेऊन आलो ज्यामध्ये त्या सगळ्या आयसी होत्या. त्या दिवशी मी ऑफिसला गेलो नव्हतो. खूप उत्सुकता होती. घरी आल्यानंतर थैली एका सतरंजीवर ओतली. गरमागरम चहा बनवला आणि चहा पीतपीत एकेक वस्तू स्क्रूड्रायव्हर ने उघडून बघितली.
एकूण आणलेल्या वस्तूंपैकी मला हव्या असलेल्या शेवटी 6 आय सी मिळाल्या. फक्त आता त्या चालू आहेत की नाही ते बघायचं होतं. मग मल्टीमीटर ने एक एक आय सी चेक केली. त्यापैकी दोन वाटत होत्या की कामात येतील. आता फक्त त्या दोन पैकी एकेक करून मी बनवलेल्या सर्किट मध्ये टाकून ते सर्किट हवा तसा रिझल्ट देतं की नाही, हे चेक करायच होतं.
येस! येस!!
दोन पैकी एक आय सी चांगली निघाली आणि माझं सर्किट चालायला लागलं. त्या दिवशी मला केवढा आनंद झाला होता ते मी शब्दात वर्णन करू शकत नाही. अक्षरशः मी रेडिओ ऑन केला आणि त्यातलं इंग्रजी गाण्यांचं स्टेशन निवडलं आणि जे गाणं लागलं त्यावर मी मोठमोठ्याने हातवारे करत डान्स करू लागलो. तुम्हाला सांगतो इतका चांगला डान्स मी आजपर्यंतच्या आयुष्यात कधी केला नव्हता!!
मग स्वस्तातले एक प्रिंटिंग प्रेसचे दुकान शोधून त्यातून मी 100 साध्या कागदावरचे पोम्प्लेट छापून आणले. या उपकरणाची माहिती देण्यासाठी आणि या उपकरणाची साधारण किंमत किती किती असू शकते हे सगळ मी त्यात नमूद केलं होतं.
आता फक्त प्रतीक्षा होती त्या दिवसाची, इलेक्ट्रॉनिक एक्सपो ची! पण त्या आधी चार दिवसांपूर्वी-
ज्या मेन ऑफिस मधून आम्ही नेहमी येत्या दोन-चार दिवसांच्या सर्विसच्या सूचना घेऊन बाहेर पडायचो त्या मेन ऑफिसमध्ये एकदा आर अँड डी डिपार्टमेंटचा लीड केतनने मला बोलावले.
"काय मग विहंग कसं काय चाललंय काम?"
"बरं आहे सर! चाललंय नेहमीप्रमाणे! सर तुम्ही मला का बोलावलं? काही विशेष कारण?"
खरं तर शक्यतो या लीड सोबत बोलणं मी टाळायचो. काम असेल तेव्हाच मी बोलायचो कारण पात्रता असूनही यानी मला राजकारण खेळून आर अँड डी मध्ये येऊ दिलं नव्हतं. कदाचित मला त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज असल्याने त्याची जागा हिरावून घेतो की काय अशी त्याला भीती वाटत असावी. अर्थात त्याने तसे बोलून दाखवले नसले तरी मला तसे नेहमी जाणवायचे, यामुळे त्याच्याशी बोलायची मला जास्त इच्छा व्हायची नाही. शक्य तितक्या लवकर आमचे संभाषण संपावे अशी माझी इच्छा होती म्हणून मी सरळ मुद्द्याला हात घातला की मला का बोलावलं?
"अरे इतकी घाई कसली? जरा बस की खुर्चीवर! आरामात बसून बोलू!"
मी खुर्चीवर बसलो.
"सांगा आता सर!"
"आजकाल तुम्ही चोरी बिरी करताय असं ऐकलं!"
"सर गरीबाची मजा नका करू. काय झालं ते सांगा!", आश्चर्य वाटले पण ते जास्त चेहऱ्यावर न दाखवता मी म्हणालो.
"आम्ही ऐकलंय आमचे विहंग साहेब आज काल स्वतःचं इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट काढत आहेत. आमची कॉपी करून आमच्यासारखे डुप्लिकेट प्रॉडक्ट बनवून आमच्याशी मार्केटमध्ये स्पर्धा बिर्धा करण्याचा विचार आहे की काय? की मग आमच्या प्रतिस्पर्धी कंपनी मध्ये जॉईन होऊन इथली वर्किंग प्रोसिजर, इथलं सर्किट डिझाईन आणि इतर गोष्टी त्यांना सांगून त्यांचा आणि पर्यायाने तुझा फायदा करून घ्यायचा आहे?"
समोरून अचानक आलेल्या अशा प्रश्नामुळे मी बऱ्याच हबकून गेलो. मनात पटकन विचार केला की मी इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोमध्ये भाग घेणार आहे आणि त्यासाठी उपकरण बनवतोय हे नक्की मी अॉफिसमध्ये कोणाला सांगितलं? मग मला आठवलं की उत्साहाच्या भरात अविनाश ऐवजी टीम मध्ये नवीनच जॉईन झालेल्या जिग्नेश याला सहजपणे मी बोलताना सांगितलं होतं पण अर्थातच मी कोणता प्रॉडक्ट बनवत आहे ही त्याला कल्पना दिली नव्हती. मी ऐकलं होतं की तो केतनाचा हस्तक किंवा खबर्या आहे आणि त्यानेच काहीतरी जुन्या राजकारणाचा आधार घेऊन केतनला माझ्याविरुद्ध उलटसुलट सांगितलं असावं.
ही परिस्थिती कशी हाताळायची याचा सारासार विचार करून मी तोंडावर हसू आणलं आणि म्हटलं, "सर हे बघा एक लक्षात घ्या. शेवटी मी तुमच्याकडे काम करतो. त्यामुळे असं काही चोरी बिरी करून इथल्या गोष्टी तिकडे देण्यात मला काही इंटरेस्ट नाही. मी आपलं सहज इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्रदर्शन बघायला जाणार होतो आणि मी सहजच एखादे प्रॉडक्ट तिथे ठेवता येईल का याचा विचार केला. खाल्ल्या मिठाला जागणारा आहे सर मी. निश्चिंत रहा मी असं कधी करणार नाही!"
त्याला ते पटल्यासारखं वाटलं खरं पण तो पुढे मला आणखी काहीतरी कारण काढून डिवचायला लागला, "पण विहंग गेल्या काही महिन्यात तुझी वागणूक काही आम्हाला पटत नाही आहे. सर्व इंजिनिअर्सच्या टीम मध्ये तू काही ना काही सांगून ती मला माझ्या विरुद्ध भडकवत असतोस. तुझ्या सोबत असलेले सर्विस इंजिनिअर जरा सेटल होतात आणि त्यांची वागणूक बदलते, तुझ्यामुळे! बरेचदा मी नसलो की तू R &D टीमच्या कामांमध्ये ढवळाढवळ करतो असं मी ऐकलं."
हा समोरचा माणूस सरळ सरळ आणि धादांत खोटे आरोप माझ्यावर करत होता. पण मी जास्त त्याच्याशी वाद न घालण्याचा निर्णय घेतला आणि बचावात्मक पवित्रा घ्यायचा ठरवलं. नंतर वेळ पडलीच तर डायरेक्ट याच्या मॅनेजरशी बोलाव का असा विचार माझ्या मनात आला पण सध्या मला फक्त माझ्या इलेक्ट्रॉनिक एक्सपो वर कॉन्संट्रेट करायचं होतं त्यामुळे आता हे संभाषण लवकरात लवकर संपावं अशी माझी इच्छा होती.
"अहो सर नाही! कदाचित तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती देत आहे! मी कसलीच ढवळाढवळ करत नाही उलट अनेकदा आर अँड डी टीमच मला बोलावून घेते आणि माझी मदत घेते आणि सर! सर्किटमध्ये बदल झाले की आम्हा सर्विस इंजिनीअरला आर अँड डी टीम कडून अपडेट घ्यावेच लागतात. असं काय करताहात सर?"
"बस झालं स्वतःचं कौतुक! म्हणे आर अँड डी टीम तुझी मदत घेते! उगाच माझ्यासमोर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न करू नकोस. असे सांगितल्याने तुला वाटतंय की मी आपल्या मॅनेजरला सांगून तुझा पगार बिगार वाढवेल किंवा मग तुला मी आर अँड डी टी मध्ये घेईल अशी स्वप्ने पाहू नकोस!"
"नाही सर मी काही तशी स्वप्ने बघत नाही आहे तसे मला झोपायला उशीर होतो आणि फार कमी वेळ झोप घेता येते!" अशी कोपरखळी मारल्याने त्याने तोंड तिरपे केले.
मी पुढे सांगू लागलो, "अहो सर! आणि सर्व्हिस इंजिनियर्स बद्दल बोलायचं झालं तर, उलट मी अनेक जणांना कस्टमरची चांगलं बोलावं हे शिकवलं, बऱ्याच लोकांना कस्टमरशी भांडण करण्यापासून वाचवले सुद्धा. आपल्या कंपनीची पॉलिसी आहे ना की कस्टमर इज गॉड. कस्टमरने कितीही आरडाओरडा केला, काहीही म्हटलं, कशाही शिव्या दिल्या तरी सहन करायचं आणि..."
मला बोलताना मध्येच थांबवून तो म्हणाला, "नाही पण एकंदरीत पाहता तुझं रेकॉर्ड जरा खराब झालेला आहे. सध्या तू कामात लक्ष देत नाहीस. बरेचदा लवकर घरी जातो. आज मी तुला मी वार्निंग देतो. असं काही पुन्हा आठवलं ना आणि जास्त काही झालं तर तुला टर्मीनेशन लेटर देईल लक्षात ठेव! तू तुझा जॉब गमावून बसशील"
"ओके सर! ठीक आहे सर! मी काळजी घेईन! यापुढे अशी चूक होणार नाही!" असं म्हणून माझा पारा चढण्याआधी मी केबिनमधून बाहेर पडलो. पाच-दहा मिनिटे डेस्क बसून विचार करत बसलो. मग पुढच्या एक-दोन दिवसांच्या सर्विसिंगच्या सूचना घेतल्या आणि बाहेर पडलो. एक बरं होतं की सतत या टीम लीड सोबत बसावं लागत नव्हतं, बाहेर फिरावे लागत होतं, नाहीतर रोजची वादावादी झाली असती! पण हा प्रसंग मी विसरून जायचं ठरवलं कारण आता सध्या एक्सपो!! जिग्नेशला सुध्दा नंतर बघावा असा मी विचार केला. अशा प्रकारे खबऱ्यांच्या ऐकीव माहितीवर अवलंबून राहणारा हा माझा टीम लीड! कसं होईल याचं?
मी केतन ला अनेकदा R & D मध्ये मला एकदातरी चान्स देण्याची विनंती केली होती पण माझ्या आधी अनेक अनुभवी लोकं लाईन लाऊन उभे आहेत, तेव्हा त्यांना आधी चान्स अशी किंवा आणखी इतर काही कारणं सांगून त्याने मला टाळलं होतं.
पण हे नक्की होतं की आता दुसरीकडे कुठेतरी जॉब शोधावा लागणार होता. ते नंतर बघू, आधी एकस्पो!
आताशा आम्ही रूमवर स्वयंपाक बनवणे कमी केलं होतं. कारण संध्याकाळी आल्यावर सगळे थकून जायचे. त्यामुळे पोळी भाजी केंद्रातून, तर कधी टिफिन मागवयचो. एखाद्यावेळेस नेहमी नेहमी बाहेरचे परवडले नाही तर एक वेळ फक्त नाश्ता किंवा उसळ पाव, पोहे असे काहीतरी मागवायचं.
त्या दिवशी रविवारी सकाळी पाच वाजताच उठलो. सकाळी उठून पटकन तयारी केली. छापलेली माहितीपत्रक आणि इतर गरजेच्या वस्तू, वेगवेगळी मेजरींग इक्विपमेंट, प्रोटोटाइप हे सगळं बॅगमध्ये भरलं पाण्याची बाटली घेतली. तसे मी चेतन जितेशला काही दिवस आधी कल्पना दिली होती त्यांचे समोर मी तिथे लोकांना माहिती देतांना ठिकाणी काय बोलायचं याची रिहर्सल म्हणजे रंगीत तालीम करत होतो. त्या दोघांनी मला काही सजेशन, सूचना दिल्या. बेस्ट ऑफ लक केले. आणि मी रूमच्या बाहेर पडलो.
खाली आल्यावर मिसळपाव आणि पोहे असं नाश्ता केला आणि झोकून दिलं स्वतःला लोकलमध्ये! मला जायचं होतं गोरेगाव.
दादर वरून लोकल बदलून गोरेगावला आलो. मग काही अंतर पायी आणि काही रिक्षा असं करून शेवटी त्या एक्जीबिशन सेंटर मध्ये पोहोचलो.
सुरुवातीच्या डेस्कवर नोंद केली. काही फॉरमॅलिटीज कम्प्लीट केल्या आणि मला एक छोटेसे युनिट मिळालं होतं जिथं मला आपलं सेटअप करायचचं होतं. इतर व्यक्तींच्या युनिटच्या तुलनेने माझं युनिट खूपच लहान होतं. तसंच मी एकटा होतो. काही युनिट मोठे होते आणि त्यांची टीम सुद्धा होती. माझ्यासारखे एकटे फार थोडे लोक होते. थोड्यावेळाने गर्दी व्हायला सुरुवात झाली काहीजण फक्त टाईमपास, सुंदर मुलींवर लाईन मारण्यासाठी, तर काहीजण खरोखर माहिती मिळवण्यासाठी किंवा कुतूहल म्हणून येथे येऊ लागले. भारतातलेच नाही तर परदेशातील अनेक पाहुणे तिथे आवर्जून येत होते. बहुतेक टाईमपास करणाऱ्यांची गर्दी मुलींच्या युनिट मध्ये होती.
बरेच तरुण मुलं इलेक्ट्रॉनिक्स मधलं काहीएक कळत नसताना मुलींच्या युनिटमध्ये उभे राहून विनाकारण उलटेसुलटे प्रश्न विचारत होते. थोड्याफार प्रमाणात ठीक आहे पण आता ते जास्त व्हायला लागल होतं.
दोन मुलींचं एक युनिट अगदी माझ्या युनिटच्या समोर होतं. सेलीना आणि सविता. अशाच मुलांच्या टारगट ग्रुपला सेलीना कंटाळून डोळ्यांनी मला मदत करायला खुणावत होती.
मी त्याप्रमाणे तिच्या युनिटकडे गेलो आणि त्या प्रश्न विचारणारया ग्रुपला म्हणालो, "बाबांनो, मला एक सांगा ट्रांजिस्टरची डेफिनेशन काय? कपॅसिटर कशासाठी वापरतात? ब्रेड बोर्ड लोणी लावून खायचा असतो की जाम लावून?"
त्यातला एक अति हुशार मुलगा मला म्हणाला, "ए तुला काय करायच आहे रे? तुला माहितीये काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं?"
त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी दुसऱ्या हाताने जवळच उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डकडे बोट दाखवलं आणि म्हटलं, " हे बघ त्या सिक्युरिटी गार्डला या सगळ्या प्रश्नांची उत्तर माहिती आहेत. तुला अजून इलेक्ट्रॉनिकबद्दल माहिती हवी असेल तर तो सिक्युरिटी गार्ड सांगू शकेल! तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तो अगदी व्यवस्थित दिल! बोलवू का त्याला?"
माझा इशारा तो ग्रुप बरोबर समजला आणि त्या ग्रुपने तिथून काढता पाय घेतला. यावर सेलिना आणि सविता दोघीजणी हसायला लागल्या आणि आमची दोस्ती झाली. सेलिना सोबत मग मी अनेक गप्पा मारल्या. आणखी एका युनिट मध्ये चारपाच मुलांच्या ओळखी झाल्या.
माझे मॉडेल हे तर फक्त प्रोटोटाइप होते. हे असेच्या असे आपल्याला दरवाज्यात बसता येणार नव्हते, पण यात थोडा बदल करून नीट बनवल्यास ते नक्की दरवाज्याच्या लॉकमध्ये वापरता येणार होते.
मधील रिकाम्या वेळेत अनेक युनिटकडे जाऊन मी त्यांची माहिती विचारली. अनेक जणांच्या ओळखी झाल्या. काहींकडे मोबाईल होते, मोबाईलचा शिरकाव नुकताच झालेला होता. पण त्यावेळेस मोबाईल महाग होते. बहुतेक सर्व सामान्य लोक एसटीडी बूथ आणि कॉइन बॉक्स यावर अवलंबून राहत होते आणि लँडलाईनची अर्थातच चलती होती. अनेक लोकांची विजिटिंग कार्डस् मी घेतली. अनेक लोकांचे पोम्प्लेट जमा केले. बरेच जणांना माझे उपकरण आवडले. काहीतरी जाणकार होते त्यांनी मला त्यात बदल सुद्धा सुचवले ते खरोखरच उपयोगाचे होते. तर काहींनी अनेक प्रश्न उपस्थित केले, त्यातील त्रुटी, एरर दाखवून दिल्या त्या मी नोंद करून घेतल्या. माझ्या युनिटलाही परदेशी पाहुण्यांनी भेट दिली होतीच.
तसं तिथे मी अनेकांशी बोललो पण समीर, सेलीना आणि सुभाष हे तिघे दिवसभरात माझे चांगले मित्र झाले.
(क्रमश:)

Comments
Post a Comment