चारोळ्या

अनंत क्षितिजावर रंगते

सूर्याची सोनेरी छटा 

स्वच्छंद होतात समुद्राच्या लाटा

आणि तुझ्या केसांच्या बटा

समुद्र खळाळतो

आणि तुझे हास्य झळकते

अथांग सागराच्या साक्षीने

आपले प्रेम बहरते

-

सहवास तुझा 

कायम राहावा 

नकोच तुझ्याशी 

कधी दुरावा

-

नाजूक फुल हातात धरुनी, 

कोणत्या स्वप्नात दंग आहेस तू? 

तुझ्या सौंदर्याने घायाळ मला, 

देशील का तुझ्या स्वप्नात जागा तू?

-

तुझा सहवास जणू स्वर्गीय सुखाचा ठेवा,

तुझ्या हसण्यातच लपला सारा जगाचा गोडवा,

हृदयाला पडतो तुझ्या सानिध्याचा भुलावा 

तू जवळ असताना वाटे काळच आता थांबावा

-

कामाच्या ढिगाऱ्यात फुलते नाजूक कळी,

आकडे आणि अहवालाच्या गर्दीत स्वप्ने होतात खरी.

कधी सहकारी तर कधी असते ती मार्गदर्शिका,

तिच्या कुशलतेने टीमला मिळते नवी दिशा.

-

नाजूक तू सुंदर तू 

कोमलतेची परिभाषा तू 

फुलांच्या पाकळ्यात लपलेल्या 

गोड स्वप्नांची मधुर भावना तू

-
हास्य तुझे मोहक जणू चंद्रासारखे
ओठ तुझे नाजूक जणू गुलाबासारखे
हालचाल तुझी भुलविते मनाला
जसे पाणी खुणावते तहानलेल्या जिवाला
काही स्वप्नं डोळ्यात राहिली, काही ओठांवरच विरून गेली,
कधी नशिबाची साथ सुटली, कधी वेळेनं दगा दिला.
पण वाटचाल सुरू आहे अजून, थोडं थांबून थोडं चालून,
कारण स्वप्नं तुटली तरीही, हौस उराशी आहे बाळगून!
तुझ्या आठवणींची 
चाहूल लागली 
दिशा नजरेची 
शोधते तुझी सावली
तिला पाहुनी मन 
हर्षित झाले 
क्षणभर तरी जगणे 
रंगीत झाले
-
कधीतरी ती दिसायची 
बघता बघता लाजायची 
हौस तिला पाहण्याची 
मनात नेहमी असायची 
-
शब्दांत थोडा 
फेरफार करून बघ 
तू बघून न हसता 
माझेकडे हसून बघ 
-
तुझे नाजूक गुलाबी ओठ, आणि हळवी नजर 
जणू आहेस तू स्वर्गातील, अप्सरा सुंदर 
तुझ्या कायेच्या दाट वळणदार वाटा 
हास्यात तुझ्या नितळ निरागसता 
-
तुझ्या हास्याच्या तुषारांत 
सप्तरंगाची नक्षी उमटते 
माझ्या नजरेच्या फक्त कटाक्षाने 
तुझ्या शरीराची कळी खुलते 
-
स्वप्न तुझे ते 
जग माझे
रूप तुझे ते 
नेत्र माझे  
-
पाण्याशी खेळते ती धारा बनून हसते 
शिंपल्याच्या कवेत तिचे रूप चमकते 
लाटांतून उधळते ती मोती ओल्या हास्याचे 
पाण्यात मिसळते रूप तिच्या सौंदर्याचे 
-
आपल्याच मस्तीत भिरभिरणारी तुझी नजर 
वाऱ्याशी स्पर्धा करणाऱ्या तुझ्या केसांच्या लाटा 
तुझे सुंदर मुखमंडल बागेतील फुलांनाही लाजवणारे 
तुझे अलौकिक रूप सूर्यालाही तेज देणारे   
-
गार गार वाऱ्यासंगे
पावसाच्या धारासंगे 
हळवे हळवे स्वप्न दिसे 
आस तुझ्या भेटीची असे  
-
तुझ्या नजरेची जादू, आणि गालावरची लाली.
तुझ्या हास्याची मोहिनी, उमटवते मोहक खळी.
नाक तुझे चाफेकळी, अन् ओठ नाजूक गुलाबी.
तुझी कोमल काया, अन् आकर्षक छबी 
तू आहेस निखळ सौंदर्याची, एक अनुपम कहाणी.
तूच आहेस या जगातली, सुंदरतेची खरी राणी.
-
पावसात ती भिजते, मोत्यांच्या थेंबात हरवते 
सृष्टीच्या कुशीत ती, आनंदाने बहरते 
नभाच्या सावलीत, स्वप्ने तिची खुलतात 
निसर्गाच्या अंगणात, बंध मनाचे उमलतात 
 -
तुझ्या हृदयात गुंतले मी
प्रेम वचनात बंधले मी
तुझ्या प्रेमाच्या साखळीतील
एक अतूट कडी बनले मी
-
तो येईल या आशेने, मी एकटी वाट बघते आहे 
जंगलातील ओलसर मातीवर, त्याच्या मिठीची वाट पाहत आहे 
पानांच्या स्पर्शात, त्याच्या असण्याची चाहूल आहे 
त्याच्या पावलांचा आवाज, माझ्या कानात गुंजत आहे 
-
हाताशी सागराच्या लाटा 
नेत्रात रुळणाऱ्या बटा 
लाटेसोबत येते त्याची आठवण 
सागर बनतो प्रेमाची साठवण 
-
तुझ्या शब्दांत दडलेले अर्थ,
मी हळूच उलगडतो 
तू वाचतेस जगाला, 
मी मात्र तुलाच समजून घेतो 
-
तुझ्या शोधक नजरेतील 
सुंदर भाव मी शोधतो,
तू हरवतेस पुस्तकात 
मी मात्र तुझ्या सौंदर्यात हरवतो 
-
कधी येईल प्रियकर, मन माझे वाट पाहते 
त्याच्या भेटीच्या आशेने, हृदयात प्रेमाची लाट उठते 
दिसला जरी तो दूरवरून, हृदय माझे धडधडते 
मिलनाच्या उत्साहात, माझे शरीर मोहरते 
-
अथांग समुद्रातील जहाजाला
किनारा दिसत कसा नाही?
गहिऱ्या प्रेमाच्या सावलीला
प्रकाश पुरत कसा नाही?
-
रात्रीच्या आकाशात भरला
शुभ्र चांदण्यांचा मेळा
त्याच्या मनात शिरला
तिच्या आठवणींचा हिंदोळा
-
वाढू दे प्रेमाचे रोपटे
आकाशभर!
पसरू दे सहवासाचे घरटे
क्षितिजभर!
-
लढता लढता हरलो
तर कसलीही खंत नाही
पण लढलोच नाही
तर पश्र्चातापाला अंत नाही
-
तू जवळ असतांना ओला चिंब करायचा
प्रेमाचा पाऊस
तू दूर असतांना अश्रूंनी चिंब करतोय
आठवणींचा पाऊस
-
विसरण्याची तुला
वेळ येते तोवर
का नियती आणते तुला
माझ्या समोर
-
पाणीच नसेल तर,
जाळते तहान
श्वासच नसेल तर,
कळते जीवन
-
पावसा पावसा ये लवकर
तळं साचू दे अंगणभर
पड तू चांगला मुसळधार
ओसाड मन कर हिरवेगार
-
भग्न वाड्यात रोज मध्यरात्री
सूडाच्या स्वप्नात मग्न, तो बसलेला असतो
मृत्यू लादला गेलेला हा मृतयात्री
भूतकाळाचे भूत, मानगुटीवर घेत "जगतो"
-
बेकारीला कंटाळून त्याने,
गुन्हेगारीची कास धरली.
त्याच्या मनातील रावणाने शेवटी,
रामावर मात केली.
-
एका वेड्याला शहाण्यांनी दगडं मारून पिटाळलं
वेड्याचं शहाणं मन वेड्याला सांगू लागलं,
या सगळ्या वेड्यांच्या जगामध्ये,
माझ्यासारख्या शहाण्यांना जगणं कठीण झालं
-
मंदी आणि संधी,
यांची कधी होत नसते 'संधी'
मंदी चुकवता येत नाही,
संधी चुकली की परत येत नाही
-
मौन असते म्हणतात
शब्दांपेक्षा असरदार
आठवण असते म्हणतात
सहवासापेक्षा बहारदार
-
श्वासात श्वास आहे तोवर
आयुष्य मुक्तपणे जागून घ्या
हृदय धडधडते आहे तोवर
प्रेमाची उधळण करून घ्या
-
मध्यरात्री ती आली, पायवाटेवर बसली,
डोळ्यात 'त्या'ची अतृप्त आशा घेवून!
त्या रात्री 'तो'ही आला, तीच्यासोबत जगायला,
स्वतःच्या जीवाला पारखा होवून!
-
महागाईने केले
जनतेला भलतेच त्रस्त
'स्वस्त' हा शब्दच केला
शब्दकोशातून फस्त
-
आपल्या दोन आयुष्यांचे
क्षण एकमेकांत मिसळून जाती
झालो मी तुझ्या आयुष्याच्या
प्रत्येक क्षणाचा सोबती
-
प्रेम म्हणजे काय
रात्रभर तुझ्या आठवणीने जागणं
ओढ म्हणजे काय
दिवसभर तू येण्याची वाट पाहणं
-
पावसाच्या संथ धारांमध्ये
मदनाच्या मंद वाऱ्यामध्ये
मादक गंध तुझ्या शरिराचा
लावी मनाला छंद मिलनाचा.
-
नाही मी अजून थकलेलो
नाही मी अजून हारलेलो
आयुष्यातील आव्हानांच्या जंगलात
मी तर हिंमतीचे पाणी प्यायला झुकलेलो
-
मनात माझ्या रंग तुझे
सुरात तुझ्या तरंग माझे
ह्रुदयात माझ्या प्रेम तुझे
उमलले फूल आपल्या प्रेमाचे
-
ऊनपावसाच्या खेळात
इंद्रधनुष्याची असते संगत
रुसव्या फुगव्याशिवाय
प्रेमात येत नाही रंगत
-
आशेच्या एका सकाळी
ती पाहा आली दिवाळी
घेवूनी प्रकाश ओंजळी
लख्ख करूनी आभाळी
-
सावलीला कधीच
घाबरायचे नसते
कारण प्रकाशाच्या अस्तित्वाची
ती एक खूण असते
-
स्वातंत्र्य मिळाले आपल्याला,
नावापुरते
गरिबांच्या तोंडाला मीठही नाही,
चवीपुरते
-
जेव्हा भूतकाळ बोलवतो
जाऊ नका
त्याचे ठराविक गाणे असते
ते गाऊ नका
-
शब्दांनी जुळलो
शब्दांनीच घडलो
शब्दांच्या पोकळीत
अर्थांना भिडलो
-
नावेत निघाले मी एकटी
भेटायला तुला रे
तू दिसत नाहीस तोपर्यंत
अंगावर रोमांच अन शहारे
-
प्रेम असावे झाडासारखे,
दिवसेंदिवस वाढत जाण्यासाठी
एकमेकांना आयुष्यभर
सुखाची सावली देण्यासाठी
-
प्रेम असावे फुलासारखे,
नाजूक हळूवार फुलण्यासाठी
एकमेकांना साथ सोबत करत
जीवापाड जपण्यासाठी
-
नाही कुणी आस पास
लागला प्रेमाचा ध्यास
लागली मिलनाची आस
मिसळला श्वासात श्वास
-
प्रेमात तुझ्या गुंतलो मी
माझाच नाही उरलो मी
प्रेमाच्या खेळात जिंकलो मी
हृदयात तुझ्या व्यापून उरलो मी
-
भेटलीस तेव्हा हरखलो मी
हसलीस तेव्हा हर्षलो मी
रुसलीस तेव्हा हुरहुरलो मी
निघालीस तेव्हा हिरमुसलो मी
-
जेव्हा वाद बनतो दहशतवाद
करतो सगळ्यांना बरबाद!
जेव्हा वाद बनतो सुसंवाद
बनतो सगळ्यांचा मदतीचा हात!
-
जेव्हा मान बनतो अपमान
घालतो मनात सूडाचे थैमान!
जेव्हा मान बनतो सन्मान
जागवतो मनात प्रेमभावना महान!
-
चालत होतो त्या पायवाटेवर
आज मी पुन्हा
आठवत होतो त्या वाटेवरील
प्रेमाच्या पाऊलखुणा
-
आलाय, नवा प्रहर
टाकून, जुनी कात
उगवलाय, नवा दिवस
घेवून, नवी पहाट
-
सुखातही कधी कधी रडावे
दु:खातही कधी कधी हसावे
जीवनात ही सुख दु:खे येत राहतात
नवनवे अनुभव देत राहतात
-
सहवासाच्या वेलीवर
प्रीतीचे फूल
दोघांच्या ओठांवर
भेटीची चाहूल

Comments

Popular posts from this blog

स्टार प्लस महाभारतातील भगवदगीता

पडक्या बंगल्यातील रात्र

नियतीची सावली