भयानक विहीर हॉटेल (मॅड कॉमेडी)
गुंटूर नगर गावाच्या वेशीवर एक 'भयानक विहीर' होती. तिथे जायला गावकरी घाबरायचे, कारण त्या विहिरीतून नेहमी 'कटिंग चहा आणि वडापाव' मागितल्याचे आवाज यायचे. पण 13 वर्षाचा चिंटू मात्र भारी निर्भय! तोंडात च्युईंगम चघळत तो नेहमी तिथेच भटकायचा. तो कुणाला घाबरत नव्हता.
विहिरीतून वडापाव, चहा मागितला की चुईंगम चघळत "संपला! समोसा देऊ का? कॉफी देऊ का?" असे विहिरीत वाकून म्हणायचा. विहिरीतल्या भुताला समोस्याची आणि कॉफीची चीड होती, त्यामुळे ते पाण्यात पाय आपटत आपटत चरफडायचे. विहिरीचं पाणी खळखळलं की चिंटू पण खळखळत हसायचा.
इतर लोक मात्र भीतीमुळे विहिरीजवळच येत नव्हते.
विहिरीच्या अगदी जवळच एक महाकाय वडाचं झाड होतं. 'तात्याराव'. तात्याराव हे साधंसुधं झाड नव्हतं; ते माणसासारखं वागायचं! फांद्यांची बोटं करून कान (म्हणजे झाडाची ढोली ज्यात पक्षी घर करून होते) खाजवायचं, जोरजोरात टारझन सारखं ओरडून ओरडून खोकायचं आणि नेहमी तक्रार करायचं, "अरे कुणीतरी माझ्या गळ्याला झंडू बाम लावा रे! कालपासून खूप दुखतायत!" कान खाजवल्यामुळे ढोलीतील पक्षी टराटारा उडायचे.
एक दिवस चिंटूला विहिरीजवळ एक भलतीच चमचमती 'जादूची अंगठी' सापडली. त्याने ती स्टाईलमध्ये बोटात घातली.
एकदा रात्री भारताचा स्टार क्रिकेटर 'सिक्सरराव शेंडे' पॅड आणि हातमोजे घालून तिथे आला कारण तो रस्ता चुकला होता. चिंटूने त्याला लगेच ओळखले.
"अरे मुला, माझा लकी बॉल या भयानक विहिरीत पडलाय! उद्या वर्ल्ड कपची फायनल आहे, त्या बॉलशिवाय मी शून्यावर आऊट होईन रे!" सिक्सरराव लहान मुलासारखा भोकाड पसरून रडत होता.
चिंटूने कॉलर उडवली.
"घाबरू नकोस सिक्सरभाऊ! हा चिंटू आणि ही जादूची अंगठी आता कमाल करेल!" चिंटूने अंगठी विहिरीकडे केली आणि मोठ्याने ओरडला, "आब्रा का डाब्रा, विहिरीतून बॉल दे बाहेर रबरा!"
जादूची अंगठी जोरात चमकली. पण विहिरीतून बॉल बाहेर आला नाही. त्याऐवजी एकदम धूर आला आणि "छम... छम... छम..." असा आवाज करत एका बॉलीवूड अभिनेत्रीचं भूत बाहेर आलं!
भूताने पांढरी साडी नेसली होती, ओठांवर लालभडक लिपस्टिक होती आणि तिथे हवा नसतानाही तिचे केस 'स्लो-मोशन'मध्ये हवेत उडत होते.
"मैं माया मंगोलिया, मेरी अधुरी चाहत हैं. तुम मुझे वडा पाव और चाय दो, मैं तुम्हे बॉल दुंगी..." भूताने एकदम फिल्मी डायलॉग मारला आणि तिची नजर सिक्सरराववर पडली.
"ओ माय गॉड! माझा हिरो! मी तुझ्यासोबत 'टिप टिप बरसा पानी'वर डान्स करणार!"
सिक्सररावची भीतीने पँट ओली झाली. त्याने संरक्षणासाठी आपली क्रिकेटची बॅट भूतावर उगारली.
तेवढ्यात तात्याराव (झाड) अचानक मध्ये पडले. त्यांनी आपल्या लांबलचक फांदीने सिक्सररावची बॅट हिसकावून घेतली.
"ए सिक्सरड्या! ती बॅट खाली ठेव. माझ्या सख्ख्या चुलत भावाच्या- म्हणजेच काश्मिरी विलोच्या लाकडापासून बनवलीये ती! माझ्या भावावर हात उगारतोस होय?" झाडाने बॅटनेच सिक्सररावला फटका दिला.
चिंटूने घाईघाईत अंगठी परत घासली.
"अरे अंगठी, काहीतरी कर आणि या भूताला पळव!"
पण अंगठीची बॅटरी डाऊन झाली होती की काय कुणास ठाऊक, तिच्यातून एक निळा किरण बाहेर पडला आणि त्याने सिक्सररावच्या हेल्मेटचं अचानक 'टरबूज' बनवलं!
आता दृश्य असं होतं: डोक्यावर टरबूज घातलेला भारताचा स्टार क्रिकेटर जीवाच्या आकांताने गोल गोल पळत होता. त्याच्या मागे बॉलीवूडचं भूत "आजा मेरे साजना, वडापाव चाय दे सजना" म्हणत डान्स करत पळत होतं. आणि तात्याराव (झाड) एका फांदीने स्वतःची पाठ खाजवत त्यांना चीअर करत होतं, "क्या बात है! जरा जोरात पळ सिक्सरड्या! पाय लाव स्टम्पला!"
चिंटूने आपलं 13 वर्षांचं चतुर डोकं चालवलं. तो एका दगडावर उभा राहिला आणि दिग्दर्शकासारखा ओरडला, "कट! कट! कट! अरे काय चाललंय हे?"
सगळे अचानक थांबले. भूत स्लो-मोशन मधून नॉर्मल मध्ये आलं.
चिंटू भूताकडे बघून म्हणाला, "मॅडम, तुम्ही इथे काय करताय? धरण जोहरचा मला आत्ताच मेसेज आलाय. 'फेल स्टुडंट ऑफ द इयर १०' चं शूटिंग चालू होतंय. आणि तुमची लीड हिरोईन म्हणून निवड झालीये! तिथे वडा पाव, चहा सगळं भेटेल! जा बरं. विहिरीतून छान छान कपडे घालून या अभिनेत्री बाई."
हे ऐकताच बॉलीवूड भूताचे डोळे चमकले.
"काय सांगतोस? माझा कमबॅक? फायनली!" तिने एक जोरदार फ्लाइंग किस दिला आणि "पॅकअप!" म्हणत ती खुश होऊन 'डायव्ह' मारून थेट विहिरीत घुसली.
सिक्सररावला त्याचा लकी बॉल शेवटी तात्याराव झाडाच्या एका ढोलीतच सापडला (तो विहिरीत पडलाच नव्हता!).
डोक्यावरचं टरबूज तसंच ठेवून तो "वाचलो रे बाप्पा!" म्हणत स्टेडियमकडे पळत सुटला.
तात्याराव झाडाने एक मोठी जांभई दिली आणि म्हणाले, "बरं झालं बाबा गेली कटकट... ए चिंट्या, जाताना नाक्यावरून एक कटिंग चहा आणि पारले-जी बिस्कीट पाठवून दे रे, लय भूक लागलीये!"
चिंटूने हसत हसत जादूची अंगठी खिशात टाकली, नवीन च्युईंगम तोंडात टाकलं आणि कॉलर उडवत तो गावाकडे चालू लागला!
चिंटू गावाकडे चालला होता, पण त्याच्या डोक्यात आधीच नवीन प्लॅन तयार होत होता.
"आज तर मजा आली... पण ही जादूची अंगठी अजून काय काय करू शकते ते बघायलाच पाहिजे!" तो स्वतःशीच म्हणाला.
तेवढ्यात, त्याच्या खिशातली अंगठी “टिंग-टिंग!” असा आवाज करू लागली!
चिंटू थबकला.
"अरे वा! नोटिफिकेशन आलं का काय?"
त्याने अंगठी बाहेर काढली. अंगठीवर छोटे छोटे LED दिवे लागले आणि एक आवाज आला, "आपली जादूची अंगठी 10% चार्ज झाली आहे. नवीन अपडेट इंस्टॉल करायचं आहे का?"
चिंटूने डोळे मोठे केले.
"काय भारी! जादूची अंगठी की मोबाईल फोन?"
तो लगेच म्हणाला, "इंस्टॉल कर! Full version दे!"
अंगठी चमकली आणि अचानक.
"डिंग डोंग!"
त्याच्या समोर एकदम झोमॅटो डिलिव्हरी बॉय प्रकट झाला!
"चिंटू सर, तुमचं ऑर्डर – 2 वडा पाव, 1 कटिंग चहा, 1 पारले-जी!"
चिंटू चकित!
"अरे मी काही ऑर्डर दिलंच नाही!"
डिलिव्हरी बॉय म्हणाला, "अंगठीवरून ऑटो-ऑर्डर झालं सर. COD आहे… 499 रुपये!"
तेवढ्यात मागून आवाज आला, "ए चिंट्याssss! माझा चहा कुठेय???"
तात्याराव झाड दूरवरून ओरडत होतं.
चिंटूने लगेच डिलिव्हरी घेतली आणि म्हणाला,"बाकीचं उधारीत लिहून ठेव!"
डिलिव्हरी बॉय: "सर, आमच्याकडे उधारी नाही. पण… तुम्ही ‘भयानक विहीर’चे VIP कस्टमर आहात, म्हणून चालेल!"
तेवढ्यात, "छम… छम…" आवाज आला.
माया मंगोलिया परत आली!
"अरे शूटिंग कॅन्सल झालं! दिग्दर्शक पळून गेला!"
ती विहिरीत परत गेली आणि जोरजोरात वडापाव आणि चहा मागू लागली.
चिंटू डोकं धरून बसला.
तात्याराव म्हणाले, "चिंट्या, आता या विहिरीजवळ आपण‘हॉटेल’ काढूया का?"
चिंटू ने तात्याराव च्या एका फांदीला टाळी दिली, हसत हसत तोंडांत चुइंगम टाकली आणि वडापाव चहा घेऊन विहिरीत उतरला.

Comments
Post a Comment