आइस्क्रीम वेड्या देशमुखांची स्वित्झर्लंडवारी!


 'जंगफ्राऊजोक' (Jungfraujoch) हे युरोपमधील सर्वात उंचावरील ठिकाण. तापमान: उणे १५ अंश. चारी बाजूला फक्त बर्फ आणि बर्फ. हाडे गोठवणारी थंडी होती. आबा (विनायकराव देशमुख) वय ६५ यांना थंडी असो वा उकाडा, जेवणानंतर आईस्क्रीम/कुल्फी लागतेच. आई (सुमित्रा) वय ६० ही सतत औषधांच्या गोळ्या आणि लोणच्याच्या बरण्या सोबत बाळगणारी आणि बंड्या (दोघांचा मुलगा) वय ३०, बिचारा इंजिनिअर. आई वडिलांच्या हट्टापायी हैराण.


आबांची भूक पेटली. देशमुख कुटुंब पाच-पाच स्वेटर, कानटोप्या आणि मफलर गुंडाळून एखाद्या चालत्या-फिरत्या कापसाच्या गाद्या दिसत होते. एकदम बर्फाच्या वाऱ्याचा सोसाटा असा आला की, बंड्याचा चष्मा उडून जाता जाता वाचला.


बंड्या: (कुडकुडत, दातांवर दात वाजवत) "ककक... कटकट... आबा, चला हॉटेलमध्ये जाऊया. माझे नाक, कान आता थिजून वजन वाढून गळून पडतील असं वाटतंय."


आबा: (उत्साहात, नाकाच्या लाल शेंड्यावर पांढरा बर्फ जमा झालेला असतानाही) "अरे भित्र्या! ही काय थंडी आहे? आमच्या लहानपणी पहाटे ४ वाजता विहिरीवर अंघोळ करायचो, तेव्हा यापेक्षा जास्त थंडी असायची."


आई: (मफलरमधून फक्त डोळे बाहेर काढत) "अहो, ती विहीर माथेरानची होती, हे स्वित्झर्लंड आहे! इथे पाण्याचं बर्फ नाही, तर माणसाचं फ्रीज होतंय."


आबा: (डोळे चमकावत) "फ्रीज? अरे हो! आठवलं. बंड्या, ए बंड्या... इथे आसपास एखादी आईस्क्रीमची गाडी बघ रे."


आधीच थंडी त्यात आबांच्या आलेल्या अशा स्टेटमेंटमुळे बंड्या आणि आई जागीच थिजले. 


बंड्या: "काय? आईस्क्रीम? आबा, लोक इथे हॉट चॉकलेट पितात. आइस्क्रीम खाल्ले तर तुम्हाला न्यूमोनिया होईल!"


आबा: (तात्विक आवाजात) "अरे मूर्खा, विज्ञानाचा नियम आहे. बाहेर थंडी असेल तर पोटातही गारच जायला पाहिजे, म्हणजे 'बॉडी टेम्परेचर' मॅच होतं. लोहा लोहे को काटता है, तसं 'बर्फ बर्फाला मारतं'. चल शोध."


कसा-बसा एक छोटा कॅफे सापडतो. तिथे एक वेटर ल्यूक उभा असतो. आबा सरळ काउंटरवर जातात.


आबा: "ए ल्यूका! एक मटका कुल्फी. विथ फुल फालुदा."


ल्यूक: (गोंधळून) "Excuse me, Sir?"


आबा: (बंड्याकडे बघत) "अरे याला मराठी येत नाही वाटतं. बंड्या, ट्रान्सलेट कर."


बंड्या: (डोक्याला हात लावून) "Baba, they don't have Kulfi here. Even they don't use Matka. This is Switzerland. "


आबा: "अरे मग काय उपयोग यांचा 'डेव्हलप' देश असून? थांब, मी समजावतो."


आबा: (वेटरच्या तोंडासमोर हात नाचवत) "आईस्क्रीम... पण स्टिक वाली." 


आबांनी स्वतःची जीभ बाहेर काढून चाटण्याची म्याँव म्याँव अशी ॲक्शन केली.


ल्यूक: (घाबरून मागे सरकतो) "Sir, are you okay? Any Doctor needed?"


आबा: (चिडून) "डॉक्टर नाही रे बाबा! मटका! मटका!" 


आबांनी हाताने मडक्याचा आकार केला आणि ते फोडल्याची ॲक्शन केली.


ल्यूक: "Ah! Smash? Break? You mean you will smash me?"


आई: (मध्येच पडत, पर्समधून एक स्टीलचा डबा काढत) "No no. He will not smash you. अहो, त्याला नका सांगू. मी पुण्याहून येताना 'चितळेंचा बासुंदी मिक्स' आणलंय. ते गोठले आहे. तेच खा."


आबा: (चिडून) "नाय. मला आईस्क्रीमच पाहिजे. मटका फालुदा"


शेवटी, आबांच्या हट्टापायी बंड्याने ल्यूकला विनंती करून व्हॅनिला आईस्क्रीम तयार करायला सांगितले. 


आता त्या कॅफे मध्ये बाहेर बर्फाचे वादळ सुरू होते, खिडकीच्या काचांवर बर्फांची थर साचले होते आणि आत मध्ये बसून आबा देशमुख आईस्क्रीम खात होते. आबा थरथरत्या हाताने चमचा तोंडात नेण्याचा प्रयत्न करू लागले. हात इतका हलत होता की आईस्क्रीम नाकाला लागले.


"वा! काय चव आहे!" नाकाला लागलेले आईस्क्रीम पुसता पुसता आबा म्हणाले. "जरा साखर कमी आहे, पण चालून जाईल."


बंड्या: "आबा. माझं डोकं आणि ब्रेन फ्रीझ झालंय! तुमचा हट्ट पाहून!"


तेवढ्यात आबा खुर्चीवरून उठून आईस्क्रीम खाता खाता खिडकीबाहेर बर्फाची मज्जा मागायला गेले आणि पाय घसरून वेटर ल्यूकला धडकून तो खाली पडला आणि ते त्याच्या अंगावर पडले.


ल्यूक: "Oh My God!" 


त्याच्या हातातली गरम कॉफीची ट्रे हवेत उडाली.


आबा पडल्या पडल्या ओरडले: "सांभाळ रे! माझी आईस्क्रीम सांडली नाही ना?"


बंड्या: "आबा, तो वेटर भाजला गेलाय आणि तुम्हाला आईस्क्रीमची पडलीय?"


आबा: "अरे तो कधीतरी बरा होईल, पण हे आईस्क्रीम वितळलं तर अनर्थ होईल"


ल्यूकच्या अंगावर पडलेल्या आबांनी उठण्याचा प्रयत्न केला, पण बर्फाळ फरशीवर पाय घसरत होते. एकदा उठले, दुसऱ्यांदा पडले, तिसऱ्यांदा ल्यूकच्या पायाला मिठी मारूनच उठले. ल्यूकचा गरम कॉफीचा ट्रे जो हवेत उडाला होता तो थेट बंड्याच्या डोक्यावर कोसळला. गरम कॉफी बंड्याच्या कानावर, गालावर, आणि सर्वात वाईट म्हणजे त्याच्या नवीन खरेदी केलेल्या मॉन्स्टर ब्रँडच्या जॅकेटवर!


बंड्या: (कर्कश ओरडत) "आबा! माझी जॅकेट! ही तर १५००० ची होती! आता कॉफीची स्मेल येऊन 'हॉट चॉकलेट जॅकेट' झालीय!"


आबा: (हसत हसत, अजूनही ल्यूकच्या पायाशी) "अरे वा! तुझी जॅकेट तर आता 'स्विस स्पेशल' झाली. विक्रीला ठेव, लाखात जाईल."


आई: (घाबरून ल्यूककडे बघत) "सॉरी सॉरी! आमचे आबा असेच आहे." 


पर्समधून पुन्हा तोच स्टीलचा डबा काढत ती ल्यूकला देते.


"घे रे बेटा, हे बासुंदी मिक्स. थोडं गरम करून घे. तुझ्या हाताला लागलंय का? हळद लावून देते."


ल्यूक: (अजूनही घाबरलेला, पण हसू दाबत) "No... no problem madam. But... your husband... he is... very crazy!"


तेवढ्यात कॅफेमधले इतर पर्यटक हे सगळं पाहून हसू दाबत होते. एक जपानी जोडपं फोटो काढत होतं, एक चिनी टूर ग्रुप मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. 


एका मुलीने इंस्टाग्राम स्टोरी लावली: 


"When your grandpa orders ice cream at -15°C and then body-slams the waiter. 


#TopOfEurope #DeshmukhDrama"


आबा मात्र अजूनही आईस्क्रीमचे बाऊल शोधत होते. ते उलटे पडले होती, पण आतली व्हॅनिला आईस्क्रीम खाली साचलेल्या बर्फावर पडून अजूनही थोडी थरथरत होती. जणू काय तीही थंडीने हादरत होती.


आबा: (वाटी उचलून) "अरे वा! अजून शिल्लक आहे! बंड्या, चमचा दे रे."


बंड्या: "आबा, तुम्ही नुकतंच वेटरला खरपूस भाजलंत, माझी जॅकेट खराब केलीत, आणि आता अजून आईस्क्रीम मागताय? तुम्हाला खरंच पुण्यात 'आइसक्रीम वेडे' म्हणतात ते काही खोटे नाही"


आबा: (गंभीरपणे) "हो, आणि तू 'थंडी भित्र्या' आहेस." 


आबांनी उरलेली आईस्क्रीम एका चमच्यात घेतली आणि तोंडात टाकली.


तेवढ्यात कॅफेचा मॅनेजर धावत आला. त्याने ल्यूकला विचारलं, "What happened here?"


ल्यूक: (हसत) "Sir... this gentleman... he wanted kulfi... in matka... then he demonstrated smashing... then he fell... then ice cream everywhere... but he is happy!"


मॅनेजर: (देशमुख कुटुंबाकडे बघत) "You all... from India?"


आबा: (उत्साहात) "हो हो! पुणे! तिथे आम्ही रोज कुल्फी खातो. इथेही खाल्ली. स्विस कुल्फी! फक्त साखर कमी आहे. मटका मिसिंग आहे"


मॅनेजर हसला आणि म्हणाला, "Okay okay... From today I announce that we will start making one more ice cream. Swiss Matka Kulfi!"


 मॅनेजरने तीन नवीन प्लेट्स भरून आईस्क्रीम तयार करून आणले. स्विस मटका कुल्फी. तिन्ही आबांनी घेतल्या.


तेवढ्यात बर्फाचे वादळ थांबले. खिडकीतून सूर्यकिरण आले. 


आबांनी आईस्क्रीम संपवली, उठले, आणि मोठ्याने म्हणाले:


"चला आता... स्प्हिंक्स टॉवरवर जाऊया! तिथेही आईस्क्रीम मिळेल का? नाहीत इथून पार्सल घेऊन जाऊ!"


बंड्या आणि आई एकदम ओरडले: "नकोoooo!"


आणि कॅफेमधले सगळे पर्यटक एकदम हसले. देशमुख कुटुंब पुन्हा चालू लागले. आबा पुढे, आई मागे, बंड्या मधे, आणि त्यांच्या मागे ल्यूक हात हलवत "Come again for kulfi!" म्हणत होता.


लेखक: निमिष सोनार, पुणे

Comments

Popular posts from this blog

कथा: ताऱ्यांचे गांव

कर्माची ढाल