ऑपरेशन 'खल्लास': आजार इथे, उपचार तिथे

शहराच्या एका कोपऱ्यात 'खातमा क्लिनिक' नावाची एक इमारत होती. तिथे बसत होते, जगातील आठवे आश्चर्य - डॉ. दर्द बहालकर. त्यांचे मेडिकल सायन्स जगाच्या पलीकडचे होते. 

त्यांचे ब्रीदवाक्य होते: "जसे झाडाच्या मुळाला पाणी घातले तर शेंड्याला फुल येते, तसेच पोटातील आतडे दुखून जास्त वळवळ करत असले तर, डोक्यावरचे केस ओढले की आपोआप बरे वाटते!"

त्यांच्या मेडिकल सायन्सचे असे अनेक तिरपागडे नियम होते.

एका दुपारी डॉ. दर्दच्या दवाखान्यात दोन 'हेवीवेट' पेशंट एकाच वेळी धडकले. 

एक होते इन्स्पेक्टर तांडे (ज्यांना भयंकर दातदुखी होती) आणि दुसरे होते कुख्यात गुंड बबन बावळा (ज्याचे डोळे लाल झाले होते आणि स्पष्ट दिसत नव्हते).

दोघेही एकमेकांचे कट्टर वैरी, पण आज 'वेदना' या कॉमन फॅक्टरमुळे शांत बसले होते.

डॉक्टर आले. त्यांनी इन्स्पेक्टरला खुर्चीत बसवले.

इन्स्पेक्टर तांडे: "डॉक्टर, अरे मरतोय मी! माझी उजवी दाढ सडली आहे, खूप ठणकतेय. काहीतरी करा!"

डॉ. दर्द (गंभीर चेहऱ्याने): "हं! दाढ दुखतेय? म्हणजे नक्कीच तुमच्या दृष्टीदोषामध्ये गडबड आहे. रेटिना हलला असणार!"

इन्स्पेक्टर ओरडला, "अहो, दाढ दुखतेय, डोळे नाही!"

डॉक्टर हसले, "तुम्ही पोलीस असून तुम्हाला 'अंडरकव्हर ऑपरेशन' समजत नाही? अरे, वेदना डोळ्यात लपून बसली आहे, ती दाढेतून सिग्नल देतेय. दांडग्यांनो, यांचे डोळे उघडा आणि त्यात 'मिरची ड्रॉप्स' टाका!"

इन्स्पेक्टरने प्रतिकार करायचा प्रयत्न केला, पण दोन धष्टपुष्ट कंपाउंडर्सनी त्यांना पकडले आणि डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्यात जळजळीत ड्रॉप्स टाकले. 

इन्स्पेक्टर "आई ग!!" करून ओरडला, पण डोळ्यांच्या जळजळीमुळे त्याला दातदुखीचा विसर पडला.

डॉक्टर खुश झाले. "बघा, दातदुखी गायब! आता पुढचा पेशंट."

आता नंबर होता बबन बावळा याचा. बबन चाचपडत पुढे आला.

बबन: "डॉक्टर, मला समोरचं नीट दिसत नाहीये. डोळे खूप जड झालेत."

डॉ. दर्द: "अरेरे! क्रिटिकल केस आहे. तुझे स्वरयंत्र सुजले आहेत म्हणून डोळ्यांना दिसनासे झाले आहे. डोळ्याच्या नसांचे ट्यूनिंग घशातून करावे लागेल."

बबन घाबरला, "म्हणजे?"

डॉक्टरांनी टेबलवरचा एक मोठा स्टीलचे भांडे साफ करायचा ब्रश उचलला. "तोंड उघड! घसा साफ केल्याशिवाय तुला दृष्टी परत येणार नाही."

बबनच्या घशात डॉक्टरांनी तो ब्रश घालून असा काही फिरवला की बबनला आपल्या पूर्वजांचे दर्शन होऊ लागले. सर्व पूर्वज त्याच्या दुर्दशेवर फिदीफिदी हसू लागले. त्याला नंतर डोळ्यांनी फक्त ताऱ्यांची चमचम दिसू लागली.

इतक्यात इन्स्पेक्टर तांडे डोळे चोळत ओरडले, "डॉक्टर, आता माझा घसा दुखायला लागला!"

डॉक्टर उत्साहाने म्हणाले, "घसा दुखतोय? अरे वा! म्हणजे इन्फेक्शन डोक्याकडे सरकले आहे. सिस्टर, तो लोखंडी हातोडा आणा. डोक्यावर दोन फटके दिले की घसा मोकळा होईल!"

दुसरीकडे बबन म्हणाला, "डॉक्टर, तुमच्या त्या ब्रशमुळे आता माझी पायाची हाडे दुखायला लागली. बहुतेक तुटली की काय?"

डॉक्टर आनंदाने नाचू लागले. 

"परफेक्ट! हाडांचे दुखणे म्हणजे यकृतावर सूज! बबन, तुझा शर्ट वर कर, तुझ्या लिव्हरवर (पोटावर) दोन बुक्के घाव मारले की हाडे जुळतील!"

पुढच्या पाच मिनिटांत दवाखान्यात जे घडले ते कल्पनेच्या पलीकडचे होते.

डॉक्टर हातात हातोडा घेऊन इन्स्पेक्टरच्या मागे धावत होते (घसा बरा करण्यासाठी डोक्यावर मारायला) आणि कंपाउंडर बॉक्सिंग ग्लोव्हज घालून बबनच्या मागे धावत होता (हाडे बरी करण्यासाठी लिव्हरवर बुक्के मारायला).

आंधळे झालेले इन्स्पेक्टर आणि घसा सुजलेला बबन एकमेकांवर आदळले.

इन्स्पेक्टरला वाटले बबनने हल्ला केला आणि बबनला वाटले इन्स्पेक्टरने पकडले. दोघेही वेदना विसरून एकमेकांना दे दणादण मारायला लागले आणि डॉक्टर कंपाऊंडर त्या दोघांच्या मध्ये घुसून, "थांबा! ट्रीटमेंट पूर्ण होऊ द्या!" असे ओरडत होते. 

कोणाच्या तरी डोक्यावर हातोडा बसला आणि कोणाच्या तरी पोटावर स्टेथोस्कोपचे फटके बसले.

शेवटी, जीव वाचवण्यासाठी इन्स्पेक्टर तांडे आणि गुंड बबन यांनी एकमेकांचा हात पकडला आणि खिडकीतून उडी मारून पळ काढला.

आणि दवाखान्यात डॉ. दर्द समाधानाने म्हणाले, "पाहिलंत? पेशंट कसे धावत पळाले! माझा उपचार म्हणजे १००% गॅरंटी!"

इन्स्पेक्टर आणि गुंड खिडकीतून पळून गेल्यावर, दवाखान्याच्या दारात काठी टेकवत, 'कटकट' आवाज करत ७५ वर्षांचे पेंडसे आजोबा आले. त्यांना साधे उभेही राहता येत नव्हते.

आजोबा: (कण्हत) "डॉक्टर... ओ डॉक्टर... गुडघे जाम झालेत हो! वाटी सरकल्यासारखी वाटतेय. एक पाऊल टाकता येत नाहीये. काहीतरी करा!"

डॉ. दर्द (चष्मा वर करत): "गुडघे जाम झालेत? वाटी हलली?हम्म! सिम्पल केस आहे. जीभ बाहेर काढा!"

आजोबा (गोंधळून): "अहो डॉक्टर, गुडघे दुखतायत, जीभ नाही! मला संधिवात आहे."

डॉ. दर्द: "अहो आजोबा, हीच संधी आहे, सरकलेली वाटी खिळा ठोकून फिट्ट करण्याची पण मी तसे करणार नाही. माझे मॉडर्न सायन्स आहे! AI वर आधारित. शरीराचा तोल जसा गुडघ्यावर असतो, तसाच शब्दांचा तोल जिभेवर असतो. तुमच्या गुडघ्याची मुख्य नस जिभेच्या शेंड्याला कनेक्टेड आहे. म्हातारपणामुळे तुमची जीभ सैल पडलीये, म्हणून गुडघ्याचे नट-बोल्ट ढिले झालेत. जीभ ओढून 'टाईट' केली की गुडघे एकदम कडक होतील! स्टीलची वाटी एकदम सोनेरी होईल!"

आजोबांनी काही बोलायचा प्रयत्न केला, पण त्याआधीच डॉक्टरांनी घरून पत्नीच्या नकळत आणलेला टेबलावरचा पापड भाजायचा चिमटा उचलला.

"आ करा!" असे म्हणत त्यांनी चपळाईने आजोबांची जीभ त्या चिमट्यात पकडली आणि ती स्प्रिंगसारखी जोरात बाहेर खेचली.

डॉक्टर ओरडले, "कंपाउंडर, ती कपडे वाळत घालायची क्लिप आण रे लवकर! ही नस इथेच फिक्स करावी लागेल नाहीतर परत गुडघे लचकतील."

कंपाउंडरने धावत येऊन आजोबांच्या लोंबकळणाऱ्या जिभेला एक मोठी निळ्या रंगाची प्लास्टिकची चिप्टी लावली.

आता खरी गंमत झाली!

ज्या आजोबांना मगाशी पाऊल टाकता येत नव्हते, ते आता जिभेला लागलेल्या चिमट्याच्या वेदनेमुळे 'ऑ... ऑ... म्म्म... म्म्म...' असे विचित्र आवाज काढत जागेवरच ५-५ फुटांच्या उड्या मारू लागले.

हे दृश्य पाहून डॉक्टर टाळ्या वाजवत म्हणाले, "बघा! काय इन्स्टंट रिझल्ट आहे! जे आजोबा मघाशी रांगत रांगत आले होते, ते आता चक्क 'हाय जंप' आणि 'भांगडा' करतायत. याचा अर्थ गुडघे १००% बरे झाले!"

क्षणार्धात, आजोबांनी वेदनेने पिसाळून आपली काठी उगारली. ते पाहून डॉक्टर टेबलखाली लपले. मग जे आजोबा डॉक्टरांच्या मागे धावले, त्यांचा स्पीड पाहून ऑलिम्पिकचा धावपटूही लाजेने मान खाली घालेल. डॉक्टरने दवाखान्याच्या खिडकीतून खाली उडी मारली आणि त्या मग आजोबांनी पण उडी मारली.आजोबा काठी घेऊन मागे आणि डॉक्टर "ट्रीटमेंट यशस्वी झाली!" असे ओरडत पुढे. असे हे दृश्य पहायला पूर्ण कॉलनी गोळा झाली होती!

लेखक: निमिष सोनार, पुणे

Comments

Popular posts from this blog

कथा: ताऱ्यांचे गांव

कर्माची ढाल