बाळापूर फाइल्स: डायपर गँगचा दरोडा
बाळापूर हे जगातील एकमेव असं शहर होतं, जिथे 6 वर्षांच्या वरच्या माणसांना "नो एन्ट्री" होती. या शहराचा कारभार कडक होता. शहराचे मुख्यमंत्री 5 वर्षांचे होते, जे दुपारच्या झोपेबद्दल खूप कडक होते. म्हणजे दुपारी सर्वजण 1 ते 4 झोपलेच पाहिजे. शहरात सगळं काही होतं. मॉल, सिनेमा, हॉस्पिटल, स्कूल, आणि अर्थातच बँका!
पण इथे चलनामध्ये नोटा चालत नाही, इथे चालतात, 'कॅडबरी जेम्स' आणि 'किंडर जॉय' आणि 'ला बू बू'
आजचा दिवस बाळापूरच्या इतिहासात गाजणार होता. कारण शहराच्या मध्यभागी असलेल्या 'स्टेट बँक ऑफ चॉकलेट्स' वर दरोडा पडणार होता.
दुपारी 3:00 वाजता, बँकेत शांतता होती.
बँक मॅनेजर 'सिया' (वय ४ वर्षे) आपल्या केबिनमध्ये बसून "अ ब क ड" च्या फाइलवर सह्या करत होती. बाहेर कॅशियर 'चिंटू' (वय 3 वर्षे) खुर्चीवर बसल्या बसल्या लॉलीपॉप चघळत डुलक्या घेत होता.
अचानक बँकेचा दरवाजा धाडकन उघडला आणि आत शिरले बाळापूरचे कुख्यात बाल दरोडेखोर! 'बंटी' (वय 5 वर्षे) आणि त्याचा साथीदार 'पिल्लू' (वय अडीच वर्षे).
"हँड्स अप! जो जिथे आहे तिथेच स्टॅच्यू!"
बंटीने डोळ्यावर काळा गॉगल लावला होता जो त्याच्या चेहऱ्यापेक्षा मोठा होता. त्याने हातात 'वॉटर गन' (पाण्याची पिस्तूल) धरली होती. पिल्लूच्या कमरेला दुधाची बाटली लटकलेली होती आणि त्याने तोडक्यामोडक्या भाषेत ओरडण्यास सुरुवात केली.
बंटी: (दमदार आवाजात) "ए चिंटू, शहाण्या मुलासारखं लॉकर उघड! नाहीतर मी या बलक पिचकारीने तुझे कपडे आणि डोळे ओले करीन. मग तुला आईचा मार खावा लागेल!"
पिल्लू: बलक पिचकारी म्हणजे पाण्यामध्ये अंडे फोडून त्यातला बलक टाकला आहे. त्रिपिका त्रिपूकोण आणि मनवीर टापूर यांच्या सिनेमातले गाणे आहे ना ते. बलक पिचकारी, जो तुने मुझे मारी, तो सिधी साधी रोटी ऑमलेट हो गयी!"
बँकेत एकच खळबळ उडाली. एका कोपऱ्यात बसलेला 1 वर्षाचा ग्राहक घाबरून जोरात "कर थैया थैया थैया थैय्या" करत रडू लागला. त्याचा थयथयाट बघून इतर दोन दूध पिणारे बाळ ग्राहक भयभयाटाने सू ssss करत थरथराट करू लागले.
बँकेतले सगळे लाइट्स भगभगाट करू लागले.
कॅशियर चिंटू: (घाबरत) "बंटी भाई, प्लिज कपडे ओले नका करू. मी आताच नवीन शर्ट घातलाय. आणि लॉकरची चावी मॅनेजर सियाकडे आहे."
बंटी धावत मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. टिल्लू दारावर पहारा देत होता (म्हणजेच तो तिथे बसून नुकताच लॉलीपॉप खाल्यानंतर अंगठा चोखत होता). त्याला हलकेच चापट मारून बंटी आत शिरला.
बंटी: "सिया मॅडम, मला 100 किंडर जॉय आणि 5 किलो लॉलीपॉप आत्ताच्या आत्ता पायजेल!"
सिया: (रागात) "बंटी, तुला माहित नाही का? आता बँकेची 'लंच टाईम' आहे. माझा हॉर्लिक्स पिण्याचा वेळ झालाय. तू संध्याकाळी ये."
बंटी: "हा दरोडा आहे! दरोड्यात लंच टाईम नसतो! लवकर माल काढ, नाहीतर मी तुझ्या ला बू बू बाहुलीचे केस कापून टाकेन!"
बाहुलीच्या धमकीने सिया घाबरली आणि बाहुली बू बू करत स्फंदू लागली. सियाने रडवेल्या चेहऱ्याने तिजोरी उघडली. आत सोन्याचे नाणे नसून रंगीबेरंगी चॉकलेट्सचे डोंगर होते. बंटी आणि पिल्लूने आपल्या पाठीवरच्या छोट्या 'डोरेमॉन' बॅगेत माल भरला आणि बाहेर पळाले.
दरोडेखोर बाहेर आले. त्यांची पिवळ्या रंगाची तीन चाकी सायकल (ट्रायसिकल) तयार होती.
बंटी ड्रायव्हर सीटवर बसला (म्हणजे उभा राहिला) आणि पिल्लू मागे उभा राहिला.
बंटी: "पिल्लू, घट्ट पकड! आज आपण सुसाट पळणार!"
बंटीने ट्रायसिकल पायाने जोरात ढकलायला सुरुवात केली. सायकलचा स्पीड होता - ताशी 2 किमी!
दोघेजण गाणे म्हणू लागले.
"पोटात होती गडबड, भूक ओठांवरी आली. आलं अंगात दरोड्याचं वारं, भीती आता पळाली. आता किंडर जॉय खायला अधीर झालोया, पिंग पिंग पिंग पिंग पिंगाट!"
तेवढ्यात मागून सायरन वाजला. "भों भों भों. पॉ पॉ पॉ"
हा आवाज सायरनचा नसून स्वतः छोटे पोलिसच तोंडाने काढत होते.
"पॉ पॉ पॉ...! पॉ पॉ पॉ कँडी! पॉप अप डी जेम कँडी. ओ जाना कँडी. चोरों के नखरे, मेहेंगे लगदे!"
बाळापूरचे इन्स्पेक्टर 'सिंघम शौर्य' (वय 6 वर्षे) आपल्या बॅटरीवर चालणाऱ्या जीपमधून आले. त्यांनी खाकी रंगाची चड्डी आणि शर्ट घातला होता.
इन्स्पेक्टर शौर्य: "बंटी, थांब! नाहीतर मी तुझ्या सायकलचे चाक पंक्चर करीन!"
बंटी: "शक्यच नाही! माझी सायकल 'ट्यूबलेस' आहे. तुला आम्हाला पकडता येणार नाही!"
आता रस्त्यावर थरार सुरू झाला. पुढे बंटीची तीन चाकी सायकल आणि मागे शौर्यची बॅटरी जीप. रस्त्यातले इतर नागरिक (खुळखुळे खेळणारी मुले) बाजूला पळाले. काही छोटे नागरिक रस्त्यावर रांगत रांगत जात होते, ते गडबडा लोळत बाजूला झाले.
पिल्लू: (मागे वळून) "ओये पोलिस! जवळ येऊ नकोस! ये तेरा पोलिस स्टेशन नाही हैं. ये बाळापूर का रास्ता हैं, तेरे बाप का नहीं!"
पिल्लूने त्याच्याजवळचे सीक्रेट वेपन काढले: 'टॅल्कम पावडरचा डबा'. त्याने डब्याचा स्प्रे जोरात दाबला आणि इन्स्पेक्टर शौर्यच्या जीपच्या काचेवर पांढरा धूर पसरला आणि उघड्या खिडकीतून आत गेला. इन्स्पेक्टरचा चेहरा पांढरा पिठारू झाला.
इन्स्पेक्टर शौर्य: (खोकलत) "अरे! मला काही दिसत नाहीये! हवालदार गोलू, रस्ता सांग!"
हवालदार गोलू खाऊगुल्ला (वय 4) जीपच्या मागच्या सीटवर बसून कुरकुरे खात होता. तो मोबाईलच्या स्क्रीनवर मॅपमध्ये पाहून म्हणाला, "साहेब, सरळ जा, पुढे रंगीत घसरगुंडी आहे! तिथून गाडी घसरा"
बंटीची सायकल पार्कमध्ये पोहचली. पण तिथे एक संकट आलं. पार्कच्या गेटवर 'बिंदी आजीबाई' (म्हणजे 6 वर्षांची एक कडक मुलगी जिने साडी नेसली होती आणि ती गेटकीपिंग करत होती) वाट अडवून उभी होती. तिने आपली लांब लिपस्टिक म्हणजे ओठकाठी गोल भिरकावून बंटीच्या सायकल समोर फिरवली.
बंटीने ब्रेक लावले. "क्रीईईईच!" आणि धडपडून तो आणि पिल्लू खाली पडले.
दूध सांडले. बाजूची गारफील्ड मांजर ते गार झालेले आणि फील्डवर सांडलेले दूध पिऊ लागली.
तेवढ्यात मागून इन्स्पेक्टर शौर्यची जीप आली आणि त्यांनी बंटीला घेरले.
इन्स्पेक्टर शौर्य: "खेळ खलास बंटी आणि पिल्लू! तुझी चॉकलेट्स आता सरकारी खजिन्यात जमा होणार."
बंटी घाबरला नाही. त्याने खिशातून एक 'झंडू बाम' काढला. त्यावर झेंडूच्या फुलांची नक्षी होती.
बंटी: "जवळ येऊ नका, नाहीतर डोळ्याला हा जहाल बाम लावून देईन! मग खूप आग होईल!"
पोलीस दल एक पाऊल मागे सरकले. वातावरण तणावपूर्ण होते.
पिल्लू रडायच्या तयारीत होता. बंटी बाम उघडून तयार होता. शौर्यने आपली पिस्तूल (जी बुडबुडे सोडायची) ताणली होती.
तेवढ्यात, आकाशवाणी झाली. आकाशातून एक भयानक आवाज आला. "बंटी... ए बंटी!!!"
सगळे थबकले. हा आवाज बाळापूरचा नव्हता. हा आवाज सीमेपलीकडून, म्हणजे 'मोठ्यांच्या' शहरातून आला होता.
तिथे कुंपणापलीकडे बंटीची खरी आई प्रचाराचा भोंगा घेऊन त्यातून ओरडत उभी होती.
आई: (कडक आवाजात) "बंटी, दुपारचे 4 वाजले. तुझी दूध पिण्याची वेळ झालीये. आणि तो पिल्लू कुठेय? त्याला डायपर बदलायचा आहे. चला लवकर घरी!"
क्षणात सगळा माहोल बदलला. कुख्यात डॉन बंटीचा चेहरा पडला. इन्स्पेक्टर शौर्यने आपली जीप बंद केली.
बंटी आणि पिल्लू (लाडात) "आई, 5 मिनिटं प्लीज! आम्ही पोलिसांशी फायटिंग करतोय ना!"
आई: "काही नाही! आताच्या आता घरी यायचं. नाहीतर टीव्ही बंद!"
टीव्ही बंद! ही धमकी ऐकताच बंटीने आपली वॉटर गन खाली टाकली. पिल्लूने आपली दुधाची बाटली उचलली. दूध पिणारी मांजर मुसमुसली आणि म्हणाली, "मुसुमुसू हासी देव मलाई लाई! मुसुमुसू हासी देव!"
इन्स्पेक्टर शौर्यने बंटीच्या खांद्यावर हात ठेवला.
शौर्य: "जाऊ दे बंटी, आज तू वाचलास. उद्या शाळेत भेटू. माझा डबा तू खाल्लास तरी चालेल."
बंटी आणि पिल्लू निमूटपणे तीन चाकी सायकल सोडून आईकडे गेले. 'स्टेट बँक ऑफ चॉकलेट्स' चा माल (किंडर जॉय) तिथेच रस्त्यावर पडला होता, ज्यावर आता हवालदार गोलूने ताव मारला.

Comments
Post a Comment